Sunday 9 September 2018

बाबाचं मनोगत :मुलींच्या रूपाने स्वतःचे बालपण अनुभवले

मी पेशाने पत्रकार. त्यामुळे नेहमी फिरस्ती. महाविद्यालयीन दशेपासून लिहित असलो तरी लग्‍न झाल्यानंतर पूर्णवेळ पत्रकारितेत आलो. एका वर्षात घरात पहिलेच अपत्य जन्माला आले. कन्येच्या रूपाने घरात लक्ष्मी आल्याचे सर्वांनाच आनंद झाला. माझ्यासाठी सुरूवातीची काही वर्षे करिअरच्या दृष्टीने संघर्षाची होती. परंतू मला परभणीत राहून काम करता येत असल्याने पहिली मुलगी साक्षी हिच्या संगोपनातील आनंदाचे क्षण मला पुरेपूर अनुभवता आले. सर्वांची लाडकी असल्याने तिला सांभाळायला आजी-आजोबा, काका होतेच. शिवाय मी व पत्नी अनिता तिची संपूर्ण काळजी घेत असू. लहान असताना तर अक्षरशः रात्रभर जागून पहाटे कधीतरी झोपायचो. बाप म्हणून पार पाडायच्या कर्तव्यांचा हा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नव्याने अनुभवास मिळाली. ती पहिलीत जाईपर्यंत मी सोबत होतो. नंतर मात्र जॉबसाठी मला एकट्याला हिंगोलीत रहावं लागलं. तरीही मी 6 महिन्यांच्या काळासाठी कुटुंबाला सोबत नेलं. त्यानंतर थेट उस्मानाबादला बदली झाल्याने तिकडे एकट्यालाच जावं लागलं. साक्षी आता आठवीत शिकतेय. तिच्या जन्मानंतर पाच वर्षांनी आमच्या घरात दुसरी कन्या सिध्दीचे आगमन झाले. तिचा जन्म परभणीत झाला असला तरी साधारणतः 8 महिने कुटुंब उस्मानाबादला नेल्याने सिध्दीच्या संगोपनात मला पूर्णतः सहभागी होता आलं. अवघ्या 5-6 महिन्यांची असल्यापासून ती खूप गोड हसायची. तिच्या हसण्यामुळेच शेजारी-पाजारी मला ओळखायला लागले. नंतरच्या काळात दारात उभी राहून ती रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना काका म्हणून हाक मारायची.
माझ्या दोन्ही मुलींची जबाबदारी मी माझ्या परीने पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. स्वतःचं घर सोडून साधारणतः 9 वर्षे मला कधी एकट्याला तर कधी कुटुंबासोबत भाडेतत्त्वावर परगावी रहावे लागले. मुलींना आंघोळ घालण्यापासून ते गंध-पावडर लावण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी मी अगदी मनापासून केल्या. त्यांच्यासाठी नवनवीन कपडे आणून अगदी बाहुलीप्रमाणे सजवून त्यांना फिरायला नेत असे. त्यांचं हसणं, रडणं, रूसणं, कधी-कधी लाडात येऊन हट्टीपणा करणं या सर्व गोष्टी मला आवडायच्या. माझं बालपण मी त्यांच्या रूपात बघायचो. दिवसाचा पूर्ण वेळ जरी मला त्यांच्यासोबत व्यतीत करता येत नसला तरी जो काही वेळ मला मिळे तो मी त्यांचे लाड करण्यात, त्यांच्याशी खेळण्यात घालवत असे.
मुलींची आबाळ होऊ नये, त्यांना चांगले शिक्षण घेता यावं म्हणून मी बाहेरगावाहून ये-जा करणं पसंत केलं. पण पुन्हा घर हलवले नाही. दोन्ही मुलींचे फोटो काढण्याची मला खूप आवड आहे. लहानपणापासून ते आता तिसरीत जाईपर्यंत सिध्दीचे आणि आठवीत गेलेल्या साक्षीचे अनेक दुर्मिळ क्षण मी कॅमेर्‍यात कैद केले आहेत. सिध्दीला आपणहून दुसर्‍यांशी बोलायला खूप आवडते. तर साक्षीचा स्वभाव याच्या अगदी विरूद्ध आहे. सिध्दी शाळेत घडलेल्या सर्व गोष्टी आधी मम्मीला अन् नंतर मला सांगते. तिच्या अभ्यासातील अडचणी दूर करणं, वही-पेन, चित्रकलेचे साहित्य अशा अनेक गोष्टींना तत्काळ प्रतिसाद मिळत असल्याने ती माझ्यावर जास्तच प्रेम करत असावी. तिचे सर्व हट्ट पुरवताना मी माझ्या बालपणात पुन्हा गेलो आहे असंच वाटत राहतं. दोघींनाही रांगोळी, चित्रकलेची खूप आवड आहे. सिध्दीचे कधी कधी मला फार कौतुक वाटते. बालवाडीपासून अभ्यासात ती अव्वल असते. मी स्वतः पैसे कमवून मोठेपणी विमानाने फिरायला जाणार, मोठमोठ्या पर्यटनस्थळांना भेटी देणार असे जेव्हा ती बोलू लागते ना तेव्हा या छोट्या पिल्‍लाचं मला खूप कौतुक वाटतं. आईपेक्षाही तिला माझाच जास्त लळा आहे. सुटीच्या दिवशी बागेची सैर ठरलेलीच असते. दोन्ही मुली जेव्हा मनसोक्‍त खेळतात आणि तितक्याच चढाओढीने अभ्यास करतात तेव्हा खरोखर मला खूप छान वाटते. आयुष्यात दोघींनाही खूप खूप शिकायचं आहे. खूप कामं करायची आहेत. सुहृदयी बाप म्हणून, मित्र म्हणून मी त्यांच्यासोबत नेहमीच असेन.
बाबाचं मनोगत : बाळासाहेब काळे. पत्रकार, परभणी

No comments:

Post a Comment