Friday 7 September 2018

बाबाच्या खांद्यावरून...


"हॅलो बाबा, कसे आहात? तब्येत कशी काय तुमची?" अशी काही प्रश्नोत्तरं.
... काही वर्षांपूर्वी ही जाहिरात बघितली होती. त्यामध्ये नोकरीला लागलेला एक मुलगा परगावी राहायला गेलेला आहे. तो घरी फोन करतो. बाबा फोन उचलतात. ते त्याच्याशी बोलायला तितकेच उत्सुक असतात, पण औपचारीक संवाद साधल्यानंतर तो सहजपणे 'आईला फोन द्या ना' असं म्हणतो. ते आईला फोन देतात आणि मग तो मुलगा तिच्याशी खूप वेळ आणि खूप गप्पा मारतो. बाबांशी गप्पा मारायच्या असतात, हे वळणच नसल्याने असं घडतं.
मुलांना शिस्त लावण्यासाठी, धाक दाखवण्यासाठी, मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात आणि त्याच्या हातून चुका घडू नयेत यासाठी पूर्वीच्या बाबाकडे सोपवलेली ही एक जबाबदारी असायची. त्यामुळे बाबा एक अंतर ठेवायचे. त्याचं कदाचित मनातून काही बाबांना वाईट वाटत असेलही. परंतु हे वास्तव बाबांनी स्वीकारलेलं होतं.
आताच्या काळातला बाबा मात्र बदललेला दिसतो. एक नुकताच घडलेला प्रसंग. सचिन आणि सुगंधा यांची पहिलीतली लेक शिवानी. शिवानीचं आईशी खूप छान नातं आहे, याचा आनंद
सचिनला आहे. पण लेक आईशी जेवढं बोलते तेवढं माझ्याशी बोलत नाही, ही खंतसुद्धा त्याच्या मनात आहे. आता जर बाबा अशी खंत करायला लागला असेल, तर ती किती चांगली गोष्ट आहे. आपला बाबा बदलायला लागला आहे हे खरं !
बाबाने बदलायला हवंच आहे. आपल्या भारतीय घरामध्ये एक गोष्ट हमखास घडते. ती म्हणजे बाळाच्या आसपास आई, आजी अशा स्त्री वर्गाचा गराडा जास्त असतो. विशेषतः दोन्ही आज्या. यात नव्या आईला तिच्या जबाबदाऱ्या शिकवल्या जातात, पण नव्या बाबाला मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं. बाबाला त्रास नको, त्याला जमणार नाही, असंच म्हटलं जातं. काही घरांमध्ये तर, या नव्या बाबाला त्याची आई सांगते की, 'तू कशाला करतोयस? तुझ्या बायकोला करूदे.' अशा, नव्या बाबाला काम करण्यापासून वाचवणार्‍या आज्यांच्या हे लक्षात येत नाही की, यात बाबाचंच नुकसान आहे. बाबा आणि बाळ यांच्यात पुरेसा बंध निर्माण होणं हे ही तितकंच गरजेचं. नाही का?
एका संशोधनातून असं दिसून आलेलं आहे की बाळाचे सामाजिक संबंध सुधारणं, वाढवणं आणि टिकवणं यासाठी बाबाशी असलेल्या जवळीकीची मदत होते. याची सुरुवात कधीपासून व्हायला हवी? तर अगदी जन्मापासून. बाळाला हाताळणं, त्याची सगळी कामं करणं आणि मुख्य म्हणजे बाळाशी बोलणं हे सगळं बाबांनी वेळ काढून करायला पाहिजे. वय वर्ष 0 ते 2 हा बाळाच्या आयुष्यातला फार महत्वाचा वेळ असतो. या वयात आईएवढाच बाबाही मुलांच्या आसपास राहिला तर. मुलांच्या मेंदूविकासासाठी ते खूपच छान! थोडं मेंदूच्या भाषेत बोलायचं तर बाबाचा आवाज, त्याचा स्पर्श, केलेली गंमत याविषयीचे बाळाच्या मेंदूतले न्यूरॉन जुळतील. मग बाबांशी पण भरपूर गप्पा मारता येतील. जाहिरातीतल्या त्या बाबासारखं होणार नाही. याची सुरुवात बाळांच्या जन्मापासून किंवा शक्य तितक्या लवकर करायला हवी.
बाबाची भूमिकाच फार स्पेशल असते. एखाद्या खूप गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर सहजपणे बाबा स्वतःच्या खांद्यावर उचलून घेतो. तेव्हा त्या लेकराला इतर सर्वांपेक्षा उंच असल्याचा आभास होतो. इतर कोणाहीपेक्षा आपल्याला जास्त दिसतं आहे, इतर कोणाहीपेक्षा आपण आता खूप आनंदात आणि मजेत आहोत, आत्ता आपणच 'भारी' आहोत, एका भक्कम खांद्यावर आहोत, आपल्याला कोणाचा तरी आधार आहे, ही सगळी जाणीव मुलांना होत असते. ही जाणीव बाबाच करून देणार, दुसरं कोण? 

- डॉ. श्रुती पानसे, बालमानसतज्ञ

No comments:

Post a Comment