Friday 7 September 2018

बाबाचं मनोगत:आमच्या ‘संगोपन विद्यापीठा’ची कधी कधी तीही ‘कुलगुरू’ असते!

माझ्या आयुष्यातल्या दोन मुलींनी गेल्या चार वर्षांत माझ्यातल्या ‘भारतीय पुरुषी परंपरे’त लहानाचा मोठा झालेल्या ‘पुरुषा’ला छान ‘माणसाळवलं’ आहे. बायको, भाग्यश्री. आणि आमची मुलगी, मुद्रा.
आम्ही आई-बाप होणार आहोत, ही ‘गूड न्यूज’ समजली, तेव्हापासून मला आमच्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट करण्याची मोहीम बायकोनं उघडली. खरं सांगू का, मूल बायकोच्या पोटात होतं. त्यामुळे ती ते प्रत्यक्ष अनुभवत होती. मी अतिशय उपरा होतो.
शेवटी तो दिवस आला. नुकतंच माणसांच्या जगात प्रवेश केलेली, लुकलुकत्या नजरेनं पाहणारी आमची मुलगी माझ्या हातात दिली गेली. त्या क्षणापासून माझा ‘बाप’ म्हणून नवा जन्म सुरू झाला. मी मोहरून गेलो. सारखं मुलीला हातात घ्यावंसं वाटत होतं. इतर काहीच करावंसं वाटत नव्हतं. कशातच लक्ष लागत नव्हतं. असा बदल कसा घडून आला किंवा येतो, याचं कोडं मला आजही सुटलेलं नाही.
तसं २०१६ हे वर्षंच माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. मी मुद्रित माध्यमातील पत्रकारितेतून ऑनलाईन पत्रकारितेत गेलो. मला घरूनच काम करता यायला लागलं. याचा परिणाम असा झाला की, मी पूर्णवेळ पालक झालो. (आणि बायकोही घरूनच काम करत असल्यानं तीही).
यामुळे आम्हा दोघांपैकी एकजण तिला एका वेळी सांभाळतो, तर दुसरा ऑफिसचं काम किंवा घरकाम करतो. बायकोचा तिच्या भाचरांना सांभाळण्याचा समृद्ध पूर्वानुभव, आमच्या डॉक्टरांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन आणि आमचं तारतम्य, एवढ्याच भांडवलावर आमचं ‘संगोपन विद्यापीठ’ आकाराला आलं आहे.
मुद्रा आता पावणे दोन वर्षांची आहे. सुरुवीतापासून तिची दुपटी बदलणं, सू-शी धुणं, तिला कपडे घालणं, अशी कामं मी आनंदानं करत आलो. ती सहा महिन्यांची असल्यापासून पुस्तक उघडून तिला चित्रं पाहण्याची सवय लावल्यामुळे ती कुठलंही पुस्तक काळजीपूर्वक उघडते, उचलते. ती तिच्या घरच्या गोष्टीच्या पुस्तकाची पानं कधीकधी फाडते. आम्हीही तिला फाडू देतो. पण हा प्रकार ती कधीच पुस्तकाच्या दुकानात करत नाही.
एरवी आपल्याला निरर्थक वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी मुलीला हव्या असतात. त्यात ती खूप वेळ रमून जाते. ती दिवसातून शंभर वेळा तर्कविसंगत वागते-बोलते. निष्फळ कृती करते आणि निरर्थक बडबडही. आणि त्यात मीही सामील व्हावं असा तिचा हट्ट असतो. तिच्यासाठी हे सारं महत्त्वाचं आहे आणि गरजेचंही. त्यामुळे त्यांच्याकडे उदारपणे पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं. माझा हा ‘आध्यात्मिक’ प्रवास केवळ मुलीमुळेच होऊ शकला.
काही महिन्यांपूर्वी, ती नऊ-साडेनऊला झोपेतून उठली की, रात्री तिच्यासोबत झोपलेला तिचा बाबा तिला दिसत नसे. मग ती झोपेतून उठल्यावर पहिला प्रश्न आईला करी – ‘बाबा?’ मग मी जाऊन तिला ‘भॉक’ करी. मग ती खूश होई.
मुलीला प्रत्येक गोष्टीत आम्ही दोघंही लागतो. आमच्या दोघांपैकी कुणीही नजरेआड झालेलं चालत नाही. ती लगेच जो दिसत नाही, त्याच्या नावानं धावा करते.
सुरुवातीला आंघोळ केल्यानंतर मुलगी केस पुसताना खूप रडायची. मी ते काम माझ्याकडे घेतलं आणि केस पुसण्याची पद्धत बदलली. त्याचा योग्य परिणाम होऊन मुलीचं केस पुसताना रडण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत बंद झालं. आंघोळ करताना तिला डोक्यावर पाणी टाकलेलं अजिबात चालायचं नाही. मग मी आंघोळ करताना कसा डोक्यावर पाणी टाकतो, डोक्याला साबण लावतो आणि डोकं धुतो हे तिला दाखवलं. त्यामुळे हळूहळू तिची भीती कमी झाली. ती आता डोळे बंद करून छान डोकं धुवू देते. आणि मीही तिच्या डोळ्यात चुकूनही साबण जाऊ न देता तिचं डोकं धुतो. आंघोळ झाल्यावर ती टबात बसून खेळते आणि मी बाथरूमच्या दारात बसून तिच्याशी गप्पा मारतो. हा खेळ तिला खूप आवडतो. खेळून झाल्यावर तिचं अंग पुसायचं कापड कधी साडीसारखं, कधी बौद्ध भिक्कूसारखं, कधी धोतरासारखं नेसून ते आधी आईला दाखवायचं आणि मग अंग पुसून कपडे घालायचे असा आमचा ठरलेला कार्यक्रम असतो.
आमच्या बेडरूमची एक संपूर्ण भिंत पुस्तकांनी भरलेली आहे. काचेच्या पारदर्शक कपाटांतून दिसणाऱ्या पुस्तकांविषयी तिला आकर्षण निर्माण व्हावं, यासाठी मी काही पुस्तकं समोरून दिसतील अशी ठेवली. त्यामुळे आमची मुलगी त्यावरील चित्रं ओळखायला शिकली. विनोदकुमार शुक्ल, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, नाना पाटेकर, मॅनेजर पांडेय, अमर्त्य सेन, हिटलर या लेखकांची नावं सांगून ती पुस्तकं ओळखायला तिला आम्ही शिकवलं. हल्ली ती वर्तमानपत्रातली चित्रं ओळखायला लागली आहे.
माझ्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती बोलायला लागली, तेव्हा सर्वांत पहिल्यांदा ‘बाबा’ म्हणायला लागली. अजूनही दिवसभर तिचं सतत ‘बाबा, बाबा’ चालू असतं. तिला प्रत्येक वेळी, प्रत्येक खेळात आणि प्रत्येक गोष्टीत बाबा हवा असतो. कधी कधी त्याचा राग येतो, कंटाळा येतो, वैतागही येतो. पण पोर एवढुशी. बरं तिला रागावलं की, ती एवढुसं तोंड करून रडते. ते पाहवत नाही. मग तिला प्रेमानं जवळ घ्यावं लागतं.
विशेषत: ती आजारी पडते तेव्हा तिचा मलुल चेहरा पाहवत नाही. तिला होणारा त्रास सहन होत नाही. जीवाची तगमग होते. तिला कधी एकदाचं बरं वाटेल असं होतं. अशा वेळी तहान-भूक, झोप, कामाचं शेड्यूल सगळं काही बिघडतं. पण आपल्या मुलीला लवकर बरं वाटावं ही एकमेव गोष्ट इतर कशाहीपेक्षा मोठी वाटते.
हल्ली आम्हा दोघांचा एक नवीन आवडता खेळ आहे. ती वेगवेगळ्या अॅक्शन करते. त्यानुसार मी त्या करतो. मी त्या कृती न चुकता करू लागल्यावर ती आता विचार करून करून वेगवेगळ्या गोष्टी करते आणि त्या तशाच मी करतो की नाही ते पाहते. अर्थात आमच्यातल्या उंचीच्या फरकामुळे कधी कधी मी तिच्या परीक्षेत नापासही होतो. तेव्हा ती मला उदार मनानं माफ करून दुसरी अॅक्शन करायला सांगते.
तिला अजून पूर्ण वाक्यं बोलता येत नसली तरी आम्ही दोघं नवरा-बायको काय बोलतो, हे तिला बरोबर कळतं. किंवा तिच्यासमोर एखादी कृती केली की, ती कृती ती न चुकता करते. त्यामुळे हल्ली मला आणि बायकोला विचार करून किंवा इंग्रजीत बोलावं लागतं. (तिला इंग्रजी समजायला लागेल त्या दिवसापासून आम्हाला नवीन भाषा शिकावी लागेल किंवा एखादी ‘क’ची भाषा.) कृती तर फारच सावधपणे कराव्या लागतात.
आम्ही जसं तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो, तसंच तीही आम्हाला शिकवते. तिला हवं ते आमच्याकडून करून घेते. विशेषत: माझ्याकडून. तेही हट्ट करून, खोटं रडून, गळ्यात पडून. त्यामुळे हल्ली आमच्या ‘संगोपन विद्यापीठा’ची कधी कधी तिची आई कुलगुरू असते, कधी कधी मी असतो; तर कधी कधी तीही असते.
मुलीमुळे माझ्या स्वभावाची, ‘पुरुषीपणा’ची बरीचशी टोकं बोथट झाली आहेत. मी बाप झाल्यापासून इतरांचा जास्त विचार करणारा, जास्त समजूतदार आणि मुख्य म्हणजे हळवा, संवेदनशील आणि उदार झालोय. 
 राम जगताप, संपादक, www.aksharnama.com

No comments:

Post a Comment