Monday 3 September 2018

दिवसाला २० लाख लिटर पाणी वाचविणारी पालिका

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका. शिरपूर नगरपालिकेने २०१३ साली एका अभिनव योजनेवर काम सुरु केले. नागरिकांना पायाभूत सुविधा चांगल्या मिळाव्यात यासाठी, केंद्र सरकारच्या छोट्या आणि मध्यम शहरासाठी असलेल्या 'नागरी पायाभूत विकास योजने'चा लाभ या पालिकेने घेतला. योजनेच्या अटी शर्ती पूर्ण केल्या आणि शहरात दुतर्फा ८२.५२ किलोमीटर जलवाहिनी टाकली. शहराचे सात विभाग केले आणि आवश्यक जलकुंभ उभारून प्रत्येक घराला वॉटर मीटर बसवले. जानेवारी २०१८ पासून या वॉटर मीटरच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रत्येक सेकंदाच्या पाणी वापराचा हिशोब हे वॉटर मीटर ठेवतात. सुरुवातीला शहराला दररोज दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करून पालिकेला १ कोटी ३० लाख लिटर पाणी लागायचे, आता वॉटर मीटर बसविल्यानंतर ते एक कोटी १० लाखांवर आले आहे. दररोज २४ तास पाणी देऊनही दिवसाकाठी २० लाख तर महिन्याला सहा कोटी लिटर पाण्याची बचत करते. भर उन्हाळ्यातही २४ तास दिले तरी पाण्याची बचत होत असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल सांगतात.
शहरातील सर्व १३ हजार ५०० घरांना वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. ८० हजार नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध करून दिले जात असताना, नागरिकांवर पाणी पट्टीचा अतिरिक्त भार पडू नये याचीही काळजी घेण्यात आल्याचे नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल सांगतात. सरासरी प्रत्येक घरात ६०० लिटर पाणी दिवसाला वापरले तर वर्षाला त्यासाठी फक्त दीड हजार रुपये मोजावे लागतात. यात कुठलीही आगाऊ रक्कम नागरिकांकडून घेण्यात आलेली नाही. इतकंच नव्हे तर २०५० पर्यंत शिरपूरकरांची पाण्याची तहान भागू शकेल अशी शाश्वत योजना अमलात आणल्याचेही पटेल सांगतात.
शहरातील प्रत्येक नागरिकाला आणि घराला समान दाबाने आणि हवे तेवढे पाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे पालिकेची स्वतःची पाणी चाचणी प्रयोगशाळा आहे. वॉटर मीटरने पाणीपुरवठा केला जात असल्याने पाणी सांभाळून ठेवायची गरज राहिलेली नाही. तिसऱ्या मजल्यापर्यंत पालिकेच्या जलवाहिनीचे पाणी पोहचत असल्याने पाणी भरायला मोटर लावावी लागत नाही, पाणी भरण्याचा वेळ वाचतो आणि पाणी काटकसरीने वापरण्याची सवय लागली असल्याचे गृहिणी वर्षा पाटील सांगतात.
निसर्गाचा वाढता लहरीपणा आणि पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शिरपूर शहरात दररोज ५० लाख लिटर पाणी बचतीचा प्रयत्न असल्याचे आमदार अमरीश पटेल सांगतात. नागरिकांना सुरुवातीला नवी पाणीपुरवठा योजना आणि त्यातून होणार त्रास नको वाटत होता मात्र आता वेळ, पैसे, वीज आणि पाण्याची होणारी बचत लक्षात नागरिक समाधानी आणि आनंदी असल्याचेही आमदार पटेल आवर्जून सांगतात. पालिकेच्या याच शानदार कामगिरीमुळे देश आणि राज्य पातळीवर शिरपूर पालिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- कावेरी परदेशी.

No comments:

Post a Comment