Sunday 2 September 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 12


माझ्या अवतीभोवतीचं वातावरण एकूणच ब्राह्मणी, संघीय. बहुतेक सर्व शिक्षक ब्राह्मण. मी खेळायला तालमीबरोबर शाखेतही जायचे. संस्कृत श्लोक, उच्चार वगैरे सर्व पाठ. आश्रमातील वातावरण पण 'पाठक' अडनावाला जागण्यासाठी पोषक. अवांतर वाचन, भाषेचे संस्कार, स्वच्छतेचे संस्कार, कर्मकांड, देवदेव करण्याचेही संस्कार, तरीही मैत्रिणी जरा वेगळ्या वाटेने जाणार्‍या. मी मानलेल्या नात्यांचे अनेक वैचारिक पदर मला प्रत्येक गोष्टींचा खोलात जाऊन विचार करायला भाग पाडत होते.
माझी खरी ओळख कुणाला नव्हती, तेव्हा 'पाठक' आडनावाचे मला फायदेच झाले आहेत. ते आजही होतात. संस्थेतल्या पाठकांची ही कन्या असं कळल्यावर बऱ्याच लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हीन वृत्तीचा आणायचा. याच रागाच्या भरात 'जात नसणं हे शाप की वरदान' असा लेख मी लिहून काढला. आमच्या संस्थेतल्या वृद्धाश्रमातल्या माझ्या एका आवडत्या आजीला, जिला माँ म्हणायचे मी, तिला दाखवला होता. तिने मला मिठी मारून माझं कौतुक केलं. ती तत्त्वज्ञान खूप भारी सांगायची. माणूस म्हणून पाहायला समाज का आणि कसा तयार नसतो, याची मला पटेल, रुचेल अशा गोष्टींची उदाहरणंही द्यायची. मी बऱ्याचदा शाळा सुटल्यावर तिच्याकडेच जाऊन बसायचे. वृद्धाश्रमातील काही निराश्रित वृद्धांशी, नववीच्या दरम्यान एक वेगळं नातंही तयार झालं होतं. फेव्हरेट आजीआजोबा आणि आम्ही मुलं असं एक प्रकारचं अनोखं मैत्र आजही टिकून आहे. मला संगीताचं,लेखनाचं अंग आहे हे कळायला आणि त्या कलेला आकार द्यायला आमच्या वृद्धाश्रमतल्या माँ कारणीभूत ठरल्या. माझ्या वाचन, गायन, लेखन, भाषा, श्लोक पाठांतराच्या आवडीलाही त्यांनीच सपोर्ट केला. मात्र, माझ्या या आवडीचं कौतुक 'आश्रमा’तील मुलगी हे करतेय - असं असायचं. एक व्यक्ती म्हणून शुद्ध कौतुक आजही अभावानेच पहायला मिळतं. अजूनही लोकांना माझं कुळ शोधण्यात, जातीची लेबलं लावण्यात इंटरेस्ट असतो. अशी लेबलं लावण्याऱ्या माणसांची 'लेव्हल' आता कुठेशी मला समजायला लागली आहे.
18 वर्षांनंतर जेव्हा मी शिक्षणासाठी पुण्यात आले तेव्हा मोजक्याच लोकांना माझा इतिहास माहीत होता. अनेकदा, माझ्या अपूर्ण नावामुळे मला नाईलाजाने माझा इतिहास सांगावा लागायचा.
मी चांगल्या विचारांकडे आहे म्हणजे ही ब्राह्मणांचीच आहे, (जे मलाही माहीत नाही आणि माहीत करायचीही गरज वाटत नाही) असा काहीसा समज लोकं करून घेतात. फुकाचा वर्चस्ववाद कुणाला नको असतो? तेव्हा मलाही उगाच जादाचे पंख लागायचेच की ! मग मी कशी ब्राम्हण आहे, याच्या, मनातल्या मनात माझं कुटुंब म्हणून रंगवलेल्या, अनेक लॉजिक नसलेल्या गोष्टी मैत्रिणीत सांगायचे आणि हवा करायचे. जेव्हा या वर्चस्ववादाची हवा काढून घेतली जायची तेव्हा सगळा फालतूपणा आहे, याची जाणीवही अधोरेखित व्हायची. गायत्री बहुदा ब्राम्हणांची असावी, असा विचार मनातल्या मनात नुसतं न करता बोलून दाखवणारेही अनेक जण मला आजही भेटतात. तेव्हा मी ममतेने 'बिच्चारे' म्हणून त्यांच्याकडे पाहते.
आता समजून जाते लोकांची मानसिकता कुठंवर बदलायची आपण? म्हणून मग माझी दिशा बदलत राहते; आणि मी चालत राहते न थांबता.
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment