Friday 21 September 2018

बाप म्हणून मीही तिच्यासोबत हळूहळू वाढतो आहे

 नऊ महिने आईच्या पोटात वाढून, तिला पोटात लाथा मारुन, जन्माला येताना ही ठमी आईला चकवून आली ती बाबाचाच चेहरा घेऊन. डोळे मात्र आईसारखे, टपोरे. क्षणभर मी स्वतः लाच हातात घेतल्याचा भास झाला. प्रसूती नंतरच्या दहाव्या मिनिटाला तिला माझ्या हातात दिले. तिची आई अजूनही OT मध्ये होती. आईला पाहण्याआधीच तिने डोळे किलकिले करून बाबाला पाहिलं. हृदयाचा ठाव घेणारी तिची नजर, नवीन जग बघतानाचा तान्हा निरागसपणा थेट काळजाला भिडला. आणि माझ्या पापण्या ओलावल्या. डोळ्यातून दाटलेल्या पाण्याने मला जाणीव करून दिली, मी बाप झालोय. Love at first sight हे माझ्या बाबतीत दुसऱ्यांदा घडलं होतं. 
पहिल्या miscarriage नंतर ह्या वेळी आम्ही जरा जास्तच काळजी घेत होतो. 'एकच अपत्य' जे होईल ते, मुलगा वा मुलगी. आयुष्यात हा क्षण एकदाच येणार, पुन्हा नाही. त्यामुळे ते भरभरून जगायचे हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. आम्ही दोघांनी करिअरच्या नवीन वाटा चालण्याआधी एक ब्रेक घ्यायचं ठरवलं. हिला नववा महिना लागल्यावर मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला. कंपनीच्या HR मॅनेजरला तर विश्वास बसेना की मी बायकोच्या डिलिव्हरी साठी जॉब सोडतोय. पण तोपर्यंत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याच्या माझ्या प्रसूती कळा एव्हाना सुरू झाल्या होत्या. योग्य आर्थिक नियोजन आणि कुटुंबातील सर्वांचे पाठबळ यामुळे निर्णयापर्यंत येणं सोपं झालं होतं. आता मी पूर्ण वेळ येणाऱ्या बाळासाठी उपलब्ध होतो.
बाळाने पहिल्यांदा शी केली ,नर्स मावशींनी तिला साफ करून दुपट्यात बांधली. नंतर मी मावशींकडून दुपटे बांधण्याची कला शिकून घेतली आणि माझ्यातल्या बाबाचा प्रवास सुरु झाला. बाळाची शू-शी साफ करणे, कपडे बदलणे, मालिश, तिच्या बाललीलांकडे तासन् तास पहात राहणे ह्या सर्व गोष्टींचा मी मनापासून आनंद घेतला. बाळाचं दूध पिऊन झालं की तिला ढेकर काढण्याचं काम माझाच झालं, दिवसा, रात्री, अपरात्री अगदी कधीही. बाळाची नखं कापण्याचं नाजूक काम पण माझ्याकडेच. पेज, भात, केळं भरवणे, गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे न संपणारी यादी. मला माझ्या मुलीला भरपूर वेळ देता आला. त्यामुळे आमच्यातील नातं छान मुरलंय. "ए बाबा" शिवाय आमचा दिवस सुरूच होत नाही. मुलीला वाढवताना आम्ही उभयतांनी खूप गोष्टी तिच्याबरोबर नव्याने अनुभवल्या, खूप गोष्टी नव्याने शिकल्या. नुकतेच आम्ही दोघे बापलेक पोहायला शिकलो आहोत. पेटी आणि गायनाचे प्राथमिक धडे दोघे गिरवतोय. सध्या मुलीला सायकल शिकण्याची ओढ लागलीय. रोज रात्री बाबाच्या कुशीत गोष्टी ऐकता ऐकता तिला पुस्तकांची गोडी लागलीय. आता बाईसाहेब स्वतःतः पुस्तके वाचतात. नवीन नवीन अफलातून प्रश्न विचारतात. उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करतात
आज सुश्रुता 6 वर्षांची आहे. बाप म्हणून मीही तिच्या सोबत हळूहळू वाढतो आहे. तान्ह्या बाळापासून ते एक स्वतंत्र व्यक्ती होण्याच्या तिच्या या प्रवासातील प्रत्येक क्षणाचा शारीरिक, मानसिक, भावनिक आनंद घेत आहोत. तिच्यासोबत आम्हाला आमचं बालपण पुन्हा नव्याने जगायची संधी मिळतेय. हे क्षण जगायला मिळत आहेत हेच बहुदा बापपणातील सुख असावं.
- दिलीप कानडे.

No comments:

Post a Comment