Friday 21 September 2018

मीचि मज व्यालो

मीचि मज व्यालो 
...आणि प्रतीक्षा संपते! मुलगी झाल्याचं सांगितलं जातं. मी माझी बायको – रमा कशीये विचारतो आणि समोरच्या पाळण्यातल्या त्या बाळाकडे पाहतो. तिचे डोळे नितळ असतात. ती वर असलेल्या दिव्याकडे टुकूटुकू पाहत असते. मी हळूच तिच्या कानात सांगतो, तुझे डोळे नदीसारखे आहेत. म्हणून तुझं नाव रावी!
मी रात्री उशिरा घरी परततो. घरातले सगळे दिवे लावतो. तेव्हा जाणवतं, आज आपल्या आतलं काहीतरी बदललंय आणि मनात शब्द येतात –
घरातल्या अंधाराला सांगितलं,
तू आली आहेस...
मग चप्पलस्टँडला, टीव्ही-पलंगाला
आणि बुक शेल्फला.
किचनमधे धूळसाचल्या डब्यांना
आणि न धुतलेल्या भा़ड्यांना
वॉशिंग-मशीन, फ्रीज, गीझर -
सगळ्या गॅजेट्सना.
बादल्यांना, संडासातल्या कोंदट हवेला
अख्ख्या घराला.
त्यांना समजलं का नाही
मला माहीत नाही
पण मी मला समजण्यासाठी
त्यांना सांगितलं –
तू आली आहेस
कुंड्यांमधल्या मलूल झाडांना
पाणी घालत सांगितलं,
तू आली आहेस
त्यांनाही समजलं नसावं
तरी सांगितलं, कारण –
जसं पानांच्या देठात नवं पान
असतं वाढत
तसंच यूटरसमधून आणखी एक गर्भाशय
घेऊन तू आलीस आहेस.

रावीच्या जन्माआधी दोन-तीन वर्षं मी आणि रमाने मूल हवं की नको, यावर खूप विचार केला होता. लग्न झालंय, म्हणजे आता ‘बाय डिफॉल्ट’ मूल जन्माला घालायला हवं, असं आम्हा दोघांना वाटत नव्हतं. कारण मूल जन्माला घालणं आणि ते वाढवणं हे जबाबदारीचं काम आहे. त्यासाठी मनाची-शरीराची तयारी लागते, असं आमचं मत होतं. अखेरीस बराच काथ्याकूट करून आम्ही हो असा निर्णय घेतला. तेव्हाच मी ठरवलं की, शारीरिकदृष्ट्या जरी आपण रमाला होणारे त्रास शेअर करू शकत नसलो, तरी निदान मानसिकदृष्ट्या आपण तिच्यासोबत राहायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं, सोनोग्राफी करणं यासाठी मी रमासोबत प्रत्येक वेळी गेलो. आम्हाला तर सोनोग्राफी सारखी करायला सांगावी असंच वाटायचं, कारण बाळ पाहण्याचा तेव्हा तो एकमेव मार्ग होता!
अगदी पहिल्या दिवसापासून (भीत भीत. कारण याबद्दल कधीच कोणी शिकवत नाही) मी रावीला हाताळू लागलो आणि थोड्या सरावाने ते सहज जमलं. सिझेरियन झालं असूनही रमाने दीड महिन्यात घरी यायचा निर्णय घेतला. मग आम्ही दोघं मिळून रावीचं सगळं करू लागलो. अर्थात त्यासाठी सासू-सासर्‍यांची मदत घेतली.
बाळाला आई-बाबाचा जितका जास्त स्पर्श होईल तेवढी त्याची वाढ चांगली होते असं आम्ही वाचलं होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून रावीला अंघोळ घालायची असा निर्णय घेतला. असंही सुरुवातीच्या काळात खसाखसा घासणं, चोळणं इ. गोष्टींची काहीही आवश्यकता नसते असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे रावीला तेल लावण्याचा भाग मी आवडीने माझ्याकडे घेतला. हळूहळू मसाज करणं, हातापायांचे व्यायाम करणं इ. गोष्टी मी व्हिडिओज पाहून करू लागलो. यातून रावी आणि माझ्यात एक वेगळं बाँडिंग तयार झालं. हाता-पायाचे व्यायाम करताना विशिष्ट आवाज काढला की ती खिदळायची. आता तेल लावायचंय हे तिला कळलं की, मस्तपैकी पडून राहायची. माझ्याकडून सगळं नीट करून घ्यायची! आता हा आनंदसोहळा घरभर फिरत करावा लागतो!
रावीला झोपवणं हादेखील आमच्यातला एक महत्त्वाचा बाँड आहे. हॉस्पिटलमध्ये असल्यापासूनच मी तिला गाणी ऐकवत झोपवायला सुरुवात केली. थोडी मोठी झाल्यावर मग आम्ही गोष्ट सांगू लागलो, तेव्हा रमा आणि माझा एक खेळच सुरू झाला. गोष्टीसाठी आम्ही एकमेकांना विषय द्यायचो आणि तत्काळ त्यावरून गोष्ट रचून सांगायचो. आणि बरेचदा असं व्हायचं की, गोष्ट इंटरेस्टिंग वळणावर यायची, तेव्हाच बरोब्बर रावी झोपी जायची!
रावी दोनेक महिन्यांची झाल्यापासून आम्ही तिला पुस्तकं दाखवत आहोत. तिला हाताळू देतो आहोत, फाडू देत आहोत, एका मर्यादेपर्यंत तोंडात घालू देत आहोत. रावीला यथेच्छ तोंडात घालता यावं म्हणून रमाने तर तिच्यासाठी खास कापडी पुस्तक तयारही केलंय.
मान धरायला लागल्यावर, मी आणि रमा तिला नेमाने बाहेर नेऊ लागलो. थोडी मोठी झाल्यावर तिला पानं, फुलं अशा गोष्टी मुद्दाम हाताळायला देऊ लागलो, पक्षी दाखवू लागलो. आता आम्ही तिला भाजी आणायलाही नेतो. तिथले वेगवेगळे रंग पाहून तिला खूप आनंद होतो. आम्ही तिला भाज्या, कागद, कुरकुर वाजणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या/रॅपर्स आणि लहानसहान रिकामे डबे अशा वस्तू देखरेखीखाली मुद्दाम हाताळू देतो. जेणेकरून तिला वेगवेगळे रंग, आवाज आणि टेक्श्चर्स समजावीत. महागड्या, खूप आवाज करणार्‍या खेळण्यांपेक्षा या घरातच असणार्‍या साध्या वस्तूंशी ती वेगवेगळ्या प्रकारे खेळते. नजर लागू नये म्हणून तीट लावणं किंवा जिवती वगैरे गोष्टींनाही आम्ही फाटा दिला.
आता जेव्हा रावी नऊ महिन्यांची होईल, तेव्हा आम्हीही नऊ महिन्यांचे पालक होऊ. आमच्या पालकत्वाच्या प्रवासाची नुकतीच कुठे सुरुवात झालीये. आजवरचा हा प्रवास खूप ऊर्जा मागणारा आणि तेवढीच ऊर्जा देणारा असा आहे. ‘मीचि मज व्यालो’ असं जे तुकाराम म्हणतो, त्याचा अनुभव या प्रवासात मला सतत येतो. रांगता येऊ लागल्यापासून रावीला घरभर फिरून कोपरान् कोपरा पाहायचा असतो. पण दरवेळी ते शक्य नसतं. मग ती हट्ट करते, रागावते. आणि मग कधीकधी मलाही राग येतो. तो व्यक्तही होतो. पण पुढच्या काही क्षणांत ती तिचा राग आणि माझं रागावणं विसरून जाते. मग नेहमीच्याच निर्मळपणाने माझ्याकडे पाहून हसते! अशा वेळी मला प्रश्न पडतो, की कोण कोणाला वाढवतं आहे, मी रावीला की रावी मला?
बाबाचं मनोगत: प्रणव सखदेव, लेखक-कवी

No comments:

Post a Comment