
सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या डिसले सरांनी आता नवा प्रयोग हाती घेतला. हा प्रयोग होता ‘व्हर्चुअल फिल्ड ट्रिप’चा. ही कल्पना अत्यंत अफलातूनच. समजा इतिहासाचे पुस्तक आहे. चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. हा इतिहास शब्दरुपाने पुस्तकात दिला आहे. पण फक्त पुस्तक वाचून छत्रपती शिवरायांचे कर्तृत्त्व मुलांच्या नजरेत कसे भरेल? मग त्यांनी त्या गड, किल्यावरील स्थानिक नागरिकांना संपर्क करून स्काइपच्या माध्यमातून तो इतिहास जिवंत केला. सरांनी शिकविले ते आणि त्यापेक्षा अधिक माहिती विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह ऐकली. अनंत प्रश्न विचारले आणि आपले ज्ञान वाढवून घेतले. हे फक्त शिवनेरी पुरते मर्यादीत राहीले नाही. पेग्वीन पक्षाची माहिती अभ्यासताना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील सॅनकॉबचा गाईड, आयफेल टॉवरची माहिती सांगायला पॅरीसमधला गाईड, समुद्राच्या तळाचं जग पाहताना सर्बियाच्या अंडरवॉटर लॅबचा गाईड, अमेरिकेतील फक्त कासवांच्या हॉस्पिटलचे डॉक्टर अशा जगभरातील ८८ देशांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परितेवाडीच्या मुलांशी लाईव्ह संवाद साधलाय. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केलेय. अशा पध्दतीने ज्ञानदान करणारा भारत आठवा देश आणि भारतात परितेवाडी ही पहिली शाळा होती. याच साधनांचा वापर करुन सोलापूरच्या विज्ञान केंद्रात बसून त्यांनी आपल्या शाळेसह ३०० शाळांच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे शेकडो प्रयोग दाखविले आहेत. याच प्रयोगाची दखल घेऊन मायक्रोसॉफ्टने त्यांना चौथ्यांदा ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटेड एज्युकेशन एक्सपर्ट’ हा पुरस्कार घोषित केला आहे.
मुलांना ज्ञानदान करताना हे वेगवेगळे प्रयोग करुन त्यांनी वेगळेपण दाखवून दिलेच, शिवाय पालकांनाही एका उपक्रमातून सामावून घेतले. त्या उपक्रमाचे नाव आहे ‘अलार्म आॅफ टीव्ही’ याकरिता शाळेत एक भोंगा बसविला आहे. हा अलार्म रोज रात्री सात वाजता वाजवला जातो. हा अलार्म वाजला की गावातील घरा-घरातील टीव्ही बंद होतात. कारण पालकांना या अलार्ममुळे ही वेळ मुलांच्या होमवर्कची आहे हे कळते. पालकसभा घेऊन आमचा अभ्यास तुम्ही घरी घ्यायचा हे डिसले सरांनी पालकांवर जबाबदारीने सोपवून दिले. शिवाय अभ्यास कसा घ्यायचा यासाठी पालकांच्या मोबाईलची मदत घेतली. प्रत्येक मुलाच्या पालकाचा मोबाईल नंबर त्यांनी रजिस्टर करुन घेतला असून दुपारीच त्या मोबाईलवर मुलांचा कोणत्या विषयाचा काय अभ्यास आहे याचा संदेश जातो. उदा. होमवर्कमध्ये कविता असेल तर मुलगा घरात कविता वाचेल किंवा म्हणेल. पालकांनी ऐकायचे, चुका सांगायच्या. शुध्दलेखन असेल तर पालकांनी अक्षरे वळणदार येत आहेत का, चुका होत आहेत का हे पहायचे. सरांच्या अशा उपक्रमांमुळे परितेवाडीत बदल घडू लागला आहे.
- गणेश पोळ.
No comments:
Post a Comment