Friday 21 September 2018

बापपणातलं सुख: अजून काय हवं असतं एखाद्या बापाला?

दीड वर्षांपूर्वी मी ऑपरेशन थिएटरबाहेर आतुरतेने वाट बघत बसलो होतो, डॉक्टर बाहेर आले, बाळाचे बाबा कुठे आहेत विचारलं. मी आहे सांगितल्यावर म्हणाले, “अभिनंदन, मुलगी झाली!”
आठ महिन्यांची प्रतीक्षा संपली होती. मला मुलगीच हवी होती आणि झालीही, त्यामुळे काय करू आणि काय नाही असं झालं होतं. बातमी द्यायला पहिला फोन आईला केला. पहिला हुंदका दाबून धरला आणि घरी निरोप दिला. मला खूप भरून आलं होतं, आनंद शब्दात व्यक्त करता येत नव्हता. बाप झाल्यावर कळेल, असं घरात बोललं जायचं. तेच अनुभवत होतो. ही भावनाच माझ्या बापपणातल्या सुखाची सुरुवात होती.
तिला बघत राहणं, तिला हातात घेणं, तिला मांडीवर घेऊन बसणं, तिची सर्वतोपरी काळजी घेणं चालू झालं. तिच्याजवळच बसून राहावंसं वाटायचं. चार दिवसाच्या पिटुकलीची नखं मी पहिल्यांदा काढली. तिला नीट पकडण्यासाठी नर्सने दाखविल्याप्रमाणे दुपट्यात गुंडाळणं मला चांगलं जमायचं. ती रडली की हातावर झुलवणं, झोपली की तिच्याकडं बघत राहाणं, उठली की खेळत बसणं चालायचं.
ती कधी एकदा मला ओळखेल, माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपेल, माझ्याकडे येण्यासाठी झेपावेल असं झालं होतं. तेवढं दूध पाजायचं सोडलं तर बाकी तिची सगळी कामं मी एन्जॉय करतो. ती आजारी पडली किंवा अस्वस्थ झाली की खूप गलबलायला होतं, तिचा त्रास बघवत नाही. सध्या तर मला वेळच वेळ असल्याने जमेल तेवढा वेळ तिच्यासोबत घालवतो. बायकोला तिच्या कामानिमित्ताने बाहेर जावं लागत असल्याने बऱ्याचवेळा आम्ही दोघंच घरी असतो. तिला आईची आठवण येणार नाही एवढी काळजी मी घेतो, ती पण फुल्टू एन्जॉय करते. आम्ही दिवसभर मस्ती करू शकतो. हल्ली त्रासही देते पण मी एन्जॉय करतो. बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टींवर चिडणारा मी तिच्याबाबतीत पेशन्स ठेवून असतो. बाहेरून आलो की पहिलं तिला बघायचं असतं, तिला जवळ घ्यायचं असतं.
सर्वच बाळांचं पालथ पडणं, उठून बसणं, रांगणं, चालणं, दात येणं, बोलणं त्यांच्या बापासाठी स्पेशल असतं तसं ते माझ्यासाठीही होतं. माझ्या पिल्लाची ही वाढ मी अनुभवली. तिची वाढ बघत असतांना मध्येच खूप टेन्शन यायचं, आपलं पिल्लू मोठ होणार मग आपल्याला सोडून दुसरीकडे जाणार, मग परत विचार यायचा की आपण तिला सोडायचंच नाही, घरजावई करून घ्यायचा असं काही काही. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मला नेहमीच कौतुक वाटतं. आपला फोटो बघून बाबा म्हणून ओळखणं, आपण नसतांना आपली आठवण काढणं हे फार भारी वाटतं. माझ्यासारखी दिसते किंवा माझ्यासारख्याच सवयी/गुण आहेत म्हटलं की अजून भारी वाटतं. सर्वात जास्त भारी कसलं वाटत असेल तर झोपेतून उठली, झोपमोड झाली किंवा अर्धवट झोपेत असेल तर ती बाबा म्हणत उठते किंवा रडते. ही गोष्ट माझ्यासाठी खूपच सुखद आहे. अजून काय हवं असतं एखाद्या बापाला?
आम्ही तिचं नाव ‘रुहा’ ठेवलंय. ‘रूह’ हा उर्दू शब्द आहे, रूह म्हणजे ‘आत्मा’. आमच्या आत्म्याचा एक भाग म्हणा किंवा आमच्या आयुष्याचा आत्माच म्हणा ना. आयुष्याच्या अनेक आघाड्यांवर मी मागे पडत असतांना, नैराश्य येत असतांना रुहाच्या निमित्ताने एक नवचैतन्य माझ्या आजूबाजूला सतत आहे. तिला बघून अजून उमेदीनं उभं रहावसं वाटतं. तिच्यासाठी अनेक स्वप्न पाहिली आहेत. बापपणातलं सुख तर ती देतच आहे, बापपणाची जाणीव ठेऊन जबाबदारीही निभावलीच पाहिजे ना..
- रुहाचा बाबा..अर्थात अमित नागरे.

No comments:

Post a Comment