Sunday 2 September 2018

पोरक्या लेकरांचं जग : भाग 14


दहावीत नापास झाल्यावर ऑक्टोबर-मार्च अशा माझ्या वाऱ्या चालू झाल्या. शिक्षणाची, करिअरची ध्येयं नव्हतीच. ध्येय एकच, अनाथपणाचं लेबल पुसून टाकायचं होतं. पण ते नेमकं कसं, या विचारांनी अस्वस्थ होते. अशात एक मैत्रिणीच्या नादाने देवदेव करायला लागले. कर्मकांड, पूजा यातून भयंकर धार्मिक लोकांच्या 'सत्संग' म्हणून नादाला लागले. संस्थेने दिलेल्या कपाटात माझ्या नावाच्या कप्यात आता विटी, बॉल, गोट्या लगोरी, कपड्यांऐवजी देवाला बसवून पूजा चालू झाली. टीव्ही पाहणं एकदम बंद आणि केवळ नामस्मरण असला वयाला न शोभणारा भंपकपणा चालू झाला. मग अनेक मैत्रिणी आपोआप सुटल्या. 
अशाही परिस्थितीत माझ्या अवतीभवतीची सगळीच माणसं धर्मांध नव्हती. त्यातल्याच एका आजोबांशी माझी मैत्री झाली. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला सांगितलं. आणि थोडी व्यवहारी जगाची ओळख करून दिली. जे कृष्णमूर्ती, विमला ठकार, अगदी ओशोंचंही तत्त्वज्ञान त्यांच्यामुळे मला समजायला मदत झाली. संस्था सोडल्यावरही त्या आजोबांचाच मला मोठा आधार होता. स्वतःच्या पायावर उभं रहायलाच हवं या ध्यासाने माझ्यापेक्षा तेच जास्त काळजीत असायचे. 'वडील' नावाचं प्रकरण त्यांच्याच सहवासात मला कळलं. त्यांना सर्वजण भाऊ म्हणत. 'काहीच खरं नाही, एवढंच खरं' हे त्यांचं आवडतं वाक्य. मी हे वाक्य माझ्या जन्माशी, अस्तित्वाशी जोडू पहात होते. 
कुणाचीही सहानुभूती नको. माझी मी उभी राहणार. मला माझ्या पंखातील बळ तपासून पहायचंय, संस्थाचालकांच्या वटवृक्षाखाली माझी वाढ होणार नाही, अशा आशयाचं पत्र लिहून मी अखेर संस्था सोडली. संस्थाचालकांविषयी कितीही आदर असला, तरी संस्थेत अधीक्षकचा हुकूम चालतो. 18 पूर्ण झाल्यावर पोरीचं पुनर्वसन म्हणजे तिचं लग्न लावून देणं, एवढंच त्यांना माहीत. लग्न कर किंवा दुसऱ्या महिलाश्रमात बदली करेन, या धमकीवजा काळजीच्या त्या अधिक्षकांच्या सुरालाही मी कंटाळले होते. बरं, लग्न करून इथून गेलेल्या मुली सासरी फार काही आनंदात होत्या, असंही नव्हतं. लग्नानंतर संस्थेतून आपली सुटका होईल या हेतूने लग्न करणाऱ्या 18-19 वर्षांच्या कोवळ्या मुलींना सेक्स, नातेसंबंध, चारचौघात कसं वागायचं - बोलायचं याबाबत काहीच समुपदेशन नाही. मग त्यांना सासरी होणारी मारहाण, लाचार होऊन संस्थेत परतणं, संस्थेने तात्पुरता आधार देऊन परत सासरी पाठवणं. त्या मुलीने संस्थेत लाचार होऊन राहण्यापेक्षा सासर बरं अशी समजूत करून जीवन कंठणं. महिलाश्रमातंही विदारक कहाण्या होत्याच. मग, हे दोन्ही पर्याय मी निग्रहाने बाजूला सारले. अभ्यासात तेव्हा गती नव्हती, मग उरला पर्याय देवाधर्माला लागायचं. पण लाचारी स्वीकारायची नाही, हे मनात गडद होत गेलं. 
अर्थातच उघड्या जगात मला चांगली माणसं मिळाली, हे माझं कसलं संचित होतं माहीत नाही. नाहीतर धर्माच्या नावाखाली मांडलेल्या बाजाराच्या विळख्यात मीही सापडले असते. 
संस्था सोडल्यावर माझ्यासमोरची अडचण होती, माझी कागदोपत्री ओळख. कॉलेजमध्ये प्रवेश घेताना असो किंवा बँकेत खाते उघडताना असो. आपली ओळख लपवायची असं कितीही ठरवलं तरी माझा इतिहास माझ्या अपूर्ण नावामुळे, जात नसल्यामुळे सांगायला लागायचा. अनाथपणाच्या, एकटेपणाच्या भावनिक आंदोलनांसोबत असुरक्षितता हा मोठा प्रश्न सतत भेडसावत राहायचा. 
पुण्यातल्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वसतिगृहात 'कमवा आणि शिका' उपक्रमात वास्तवाचं भान यायला लागलं. देवदेव करण्याचं भूत खाली उतरलं. आपली जबाबदारी आपण समर्थपणे उचलायची हा आत्मविश्वासही वसतिगृहातील विविध उपक्रमांनी, मैत्रिणींमुळेच मिळाला. पदवी घेतली आणि समिती सुटली. पुढे, पुन्हा नवा संघर्ष होता. तोपर्यंत स्वतःला तयार केलं होतं, स्वबळावर जगायला. भाऊंचा आधार असायचा, 'मार्गस्थ व्हा', 'लढायचं सोडू नका', 'कितीही वाईट परिस्थिती आली तरी आपण चांगलं वागणं सोडायचं नाही', 'पहावे आपणासी आपण' अशी शिकवण त्यांच्या पत्रातून, सहवासातून नेहमीच मिळायची. '78 वर्षाचा माझा एक मित्र आहे', असं मी त्यांना गमतीने म्हणायचे. ते म्हणायचे आपला संवाद पु. ल. देशपांडे यांनी कुठल्यातरी पुस्तकात नक्कीच लिहीला असता. इतर अनेक जोडलेल्या नात्यांमुळेही अध्यात्म सोडून इतर अवांतर वाचनही मला समृद्ध करत गेलं. 
- गायत्री पाठक

No comments:

Post a Comment