Sunday 18 August 2019

सखी ग्रुपमुळे होते आहे जलपुनर्भरण

जालना शहर. गेल्या 4 ते 5 वर्षांपासून जालन्यावर दुष्काळाचं सावट आहे. पावसाचं घटतं प्रमाण आणि आहे त्या पाण्याचा मुक्त वापर यामुळे दरवर्षी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. जलसंकटावर यावर काहीतरी ठोस उपाय हवा म्हणून अनेक जण प्रयत्नशील आहेत.
जलपुनर्भरण ही काळाची गरज आहे सोबतच वाया जाणारे पाणी थांबवून ते जमिनीत जिरवून जमिनीतील पाणी पातळी वाढवता येते. पण यासाठी नुसते प्रयत्न करून, जलपुनर्भरणावर पेपरमध्ये लिहून, भाषणं देऊन लोक विसरून जातात. यावेळी मात्र हे काम इथल्या स्त्रियांनी मनावर घेतलं. कदाचित त्यामुळे जलपुनर्भरणाची ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचते आहे असं म्हणायला हवं.
जालना शहरातील 60 महिला. जलपुनर्भरणाचं तत्त्व लोकांना समजावून सांगत आहेत. एकीकडे या कामासाठी आवश्यक मनुष्यबळाची सांगड त्यांनी घातली आहे. पावसाळा आला की रोजंदारी मजूर बारीक बारीक दुरुस्तीच्या कामासाठी निघून जातात. त्यामुळे कामगार उपलब्ध होत नाही आणि परिणामी इच्छा असून देखील जलपुनर्भरणाची संधी निघून जाते. त्यामुळे लोकांना जलपुनर्भरणाचे महत्त्व सांगतानाच या महिलांनी गरजू प्लंबर मजुरांची एक टीमचं तयार केली आहे. ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याची एखाद्याची तयारी असते त्यांना हा सखी मंच प्लंबर, मजूर पुरवतात. त्यामुळे कामाला लगेच सुरुवात होते.
दिवसेंदिवस वाढत चाललेली पाणीटंचाई लक्षात घेता जलपुनर्भरणाची गरज ओळखून ‘सखी ग्रुप ऑफ जालना’ हा साठ सख्यांचा ग्रुप शहरातील अनेक भागांमध्ये फिरून त्यांच्या इतर सख्यांना जलपुनर्भरणासाठी प्रोत्साहित करत आहे. जालन्यातील महिलांच्या ग्रुपच्या माध्यमातून जलपुनर्भरणाविषयी फक्त जनजागृतीच नव्हे तर प्रत्यक्षात हा उपक्रम पूर्ण करून घेण्याचं काम सुरू आहे. चालू महिन्यामध्ये जलपुनर्भरणाचे 10 उपक्रम पूर्ण झाले असून आणखी दहा उपक्रम प्रगतीपथावर असल्याची माहिती या ग्रुपच्या सदस्यांनी दिली. ग्रुपमधील महिला रोजच्या घर कामातून वेळ काढतात. नंतर एकत्र येत शहरातील विविध भागात जाऊन तेथील महिलांना भेटतात. हा उपक्रम महिलांना समजून सांगितल्यानंतर त्या घरातील कर्त्या पुरुषाला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतात आणि त्यांच्याकडून हा उपक्रम करून घेऊ शकतात. त्यामुळे महिलांना प्रोत्साहित करण्यावर सखी ग्रुप जास्त भर देत आहे. उपक्रमासाठी विविध साहित्य जमा करताना, मजुरांची उपलब्धता या अडचणीमुळे नागरिक हे जलपुनर्भरण करण्यासाठी धजावत नाहीत. मात्र, या कामासाठी लागणारे साहित्य, मजुर ते सर्व काम पूर्ण होईपर्यंत लागणारी मदत एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. यामुळे अनेक जण प्रोत्साहित होत असल्याचेही या ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.
आजतागायत 10 कुटुंबीयांनी या जलपुनर्भरण संकल्पनेला मूर्त रूप दिले असून अजून 30 ते 40 परिवारांनी या संदर्भात चौकशी केली आहे. या सख्यांनी चालवलेल्या उपक्रमास नगर परिषद तसेच सरकारी पातळीवर प्रयत्न झाले तर शहरातील पाणी पातळी वाढून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निघून जाईल अशी भावना या सखी ग्रुपच्या निर्मला लड्डा, निर्मला साबू, विद्या राव यांनी व्यक्त केली.
- अनंत साळी, जालना
 व्हिडीओ लिंक  : https://www.facebook.com/watch/?v=2844059842333699

No comments:

Post a Comment