Sunday 18 August 2019

मुलं शाळेत चवीचं खाणार; कारण परसबाग देणार ( जि प उच्च प्राथमिक शाळा झुगरेवाडी, ता कर्जत, जि रायगड)


कर्जत तालुक्याचं टोक म्हणजे झुगरेवाडी. अगदी दुर्गम भाग. आजूबाजूला घनदाट जंगल आणि निर्मनुष्य रस्ता. इथल्या जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील परसबागेची आणि ती फुलवणाऱ्या मुलांची ही गोष्ट.
या शाळेत 2016 साली रवी काजळे या शिक्षकाची नेमणूक झाली. शाळेत हजर झाल्यावर लगेचच सरांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्गम भागातली टोकाची शाळा. त्यामुळे अर्थातच अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणेचं इकडे दुर्लक्ष झाल्याचं सर सांगतात. पाण्याची अत्यंत टंचाई. सर या सगळ्यात शांत बसणारे नव्हतेच. त्यामुळेच त्यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. ग्रामस्थांना साथीला घेतलं आणि शाळेचं काम सुरू झालं. पहिली गरज अर्थातच पाण्याची होती. सहकार आयुक्त प्रदीप महाजन यांच्यामुळे गीतगुंजन व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून डोंबिवलीच्या रोटरी क्लबशी संपर्क झाला. आणि त्यांनी बोअर मारून दिली. आता पाणी आलं होतं.
आता पुढचं ध्येय होतं मुलांची शाळेत उपस्थिती वाढवण्याचं. एकूण आठवीपर्यंतची शाळा. विद्यार्थी संख्या होती 112. मुंबईच्या नायर हॉस्पीटलच्या सहकार्याने काजळे यांनी शाळेत मेडिकल कॅम्प घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी मुलांच्या आहारात पालेभाज्या हव्यात असं सांगितलं. एकतर दुर्गम भाग. त्यातून मुलांचे आईवडील वीटभट्टीवर काम करणारे. किती पैसे मिळणार आणि भाजीसाठी किती खर्च करणार? सरांनी व्यवस्थापन समितीशी चर्चा केली. शाळेच्या शेजारीच जागा उपलब्ध होती. आता पाणीही होतं. त्या जागेत परसबाग करायची कल्पना रोटरी क्लबच्या अध्यक्ष कविता गोडबोले यांनी सुचवली. परसबागेचं काम सुरू झालं. इथंही मुलं मदतीला आली. त्यांनी वाफे केले. पाणी घालण्यासाठी गट तयार केले गेले. आता रविवारी शाळेला सुट्टी असली तरी मुलं काही कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत येत असतात. आणि झाडांची काळजी घेतात. आज या बागेत वांगी, दुधी भोपळा, घेवडा, पालक, गवार, भेंडी या भाज्या घेणं सुरू झालं आहे. हंगर अगेन्स्ट इंडिया या संस्थेने शाळेला मॅगीसारखी खिचडीची पॅकेट दिली . ही पॅकेटमधली खिचडी शिजवताना त्यात भाज्या घालणं सुरू केलं. काजळे सर सांगतात, या भाज्या मुलांनी खाव्यात हे मात्र जिकीरीचं काम होतं. कारण ती सवयच त्यांना नव्हती. मग त्यासाठी एकदा डॉक्टरांना बोलावलं. ते मुलांशी बोलले. भाज्यांचा आहारातलं महत्त्व त्यांनी पटवलं. लगेचच नाही, पण हळूहळू मुलं भाज्या खाऊ लागली.
रोटरी क्लबकडून खिचडीसोबत अंडीही मिळत होती. त्यामुळे मुलांना आता योग्य पोषक आहार मिळत होता. त्याचसोबत लांबून येणाऱ्या मुलांना सायकल वाटपही केलं गेलं. या सगळ्याचा योग्य परिणाम अर्थातच काही दिवसांत उपस्थितीत दिसू लागला. आज शाळेत मुलांची 100 टक्के उपस्थिती आहे, हेच या सगळ्याचं यश. सलग वर्षभर असा आहार दिल्यानंतर पुन्हा एकदा काजळे सरांनी नायर हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी मुलांची आरोग्यतपासणी करून घेतली. मुलांच्या वजनात चांगल्याप्रकारे वाढ तर दिसून आलीच. शिवाय वर्षभरात कुणीच आजारी आहे म्हणून सुट्टी घेतली नसल्याचं लक्षात आलं. सर म्हणतात, ही किमया आमच्या परसबागेची होती. सेंद्रिय खतावर वाढवलेल्या पालेभाज्या, त्यातून मुलांनी मायेने वाढवलेली परसबाग आमच्या मुलांनी खूप काही देऊन गेली. म्हणूनच गेल्या अडीच वर्षात एकही विद्यार्थी आजारी पडला नाही हे आमच्या परसबागेचं यश.
- वर्षा आठवले

No comments:

Post a Comment