Sunday 18 August 2019

खरचं तो... स्वप्न पूर्ण करतोय..



स्वप्नं कधी खरी होत नसतात असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, अशोक काकडे या युवकाचं ध्येयच मुळी इतरांनी पाहीलेलं स्वप्नं पूर्ण करण्याचं आहे. आत्तापर्यंत अनेकांची ध्येय, स्वप्न पूर्ण करण्यास अशोकने जीवाचे रान केलं आहे. किरणचं स्वप्न पूर्ण करायचं त्याचं सध्या ध्येय आहे.
रायपूर हे 11 हजार लोकसंख्येचं बुलढाणा जिल्ह्यातलं गाव. आजूबाजूची 25 ते 30 खेडी जोडलेली. आठवडी बाजारही याच गावात भरतो. जिल्ह्यापासून केवळ 18 किलोमीटरवरचं असूनही इथं शिक्षणाच्या सुविधा नाहीत. जवळच असलेल्या पिंपळगाव सराई या ठिकाणी इयत्ता 12 वी पर्यंत शाळा आहे. आणि याच शाळेत आसपासच्या सर्व गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात. इथं शिकणारी किरण बैरागी ही मुलगी या वर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण चक्क 89 टक्के मार्क घेऊन झाली आहे. तिच्यासाठी हे चक्कच म्हणावे लागेल. कारण किरणची आर्थिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. तिचे आई वडील मोलमजुरी करणारे. आणि किरणला सुद्धा त्यांच्यासोबत सुट्टीच्या दिवशी काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता. किरणपेक्षा अजून एका लहान बहिणीची जबाबदारी. या सर्व परिस्थितीची जाण किरण लहान वयातच आली. त्यातूनच तिने जिद्दीने अभ्यास केला. मनात गाठ बांधली ती चांगली टक्केवारी मिळवण्याची. जिद्दीने परिश्रम घेत तिने चांगली टक्केवारी मिळवून दाखवली.
किरणच्या परिस्थितीचा विचार करता दहावीनंतर तिला बाहेर गावी शिक्षणास पाठवणं शक्य नव्हतं. आता किरणला आपलं शिक्षण म्हणजे दिवा स्वप्नच वाटू लागलं होतं. शिक्षण घेण्याची उमेद आहे, मात्र परिस्थिती आपलं स्वप्न पूर्ण करू देणार नाही हे तिचा लक्षात आलं. त्यामुळे किरण खूप खचली होती. तिच्या मैत्रिणींना किरणचे मार्क्स पाहून अभिमान तर वाटला. परंतु किरण आता आपल्यासोबत पुढचं शिक्षण घेऊ शकेल का ही चिंता सुद्धा तिच्या मैत्रिणींना वाटू लागली. मैत्रिणींना आपापल्या पालकांकडे हे बोलून दाखवलं. आणि गावात चर्चा सुरू झाली. या पोरीचं शिक्षण कसं होणार, आता तिची जबाबदारी कशी घ्यायची ही चर्चा सुरू झाली. गावातून ही खबर पोहोचली ती थेट येथील अशोक काकडे पर्यंत.
अशोक काकडे यांनी आतापर्यंत अनेक मुलींना स्वखर्चाने शिक्षण दिलं आहे. त्यापैकी एक मुलगी सीआयडी आॅफिसर आहे. अशोक यांना बातमी कळताच त्यांनी थेट रायपूरला जाऊन किरणच्या आई-वडिलांची चर्चा केली. आणि किरणची संपूर्ण जबाबदारी अशोक काकडे यांनी स्वीकारली. त्यामुळे तिच्या आईवडीलांनी तिच्या शिक्षणाला संमती दिली. अशोक यांनी चिखली या तालुक्याच्या ठिकाणी किरणची अडमिशन करून तिला शिकवणी वर्ग लावून दिला. किरणला आता डॉक्टर बनवायचंय. उच्च शिक्षण घ्यायचं. ती म्हणते, “बाबासाहेबांनी सांगितले की शिका, संगठीत व्हा आणि संघर्ष करा. मात्र अशा परिस्थितीत शिक्षण कसं घेणार, या परिस्थितीशी संघर्ष कसा करणार असा प्रश्न मला पडला होता. समाजात अशोक सरांसारखी माणसं आहेत म्हणून माझ्यासारख्या मुलींचे हे शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होत आहे.”
- दिनेश मुडे, बुलढाणा

No comments:

Post a Comment