Sunday 18 August 2019

अंगणवाड्यांमध्ये शेवगा, कढीपत्ता

''कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुलांच्या आहारावर आम्ही लक्ष केंद्रीत केले. बालके, गर्भवती महिला यांच्या आहारात शेवगा, कडीपत्ता उपयुक्त ठरू शकतो, असं मत आरोग्य विभागातल्या अधिकारी आणि आहार तज्ज्ञांनी मांडलं. '' बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे सांगत होते. ''पण रोजच सर्वांना शेवगा सहज उपलब्ध होईलच असं नाही. मग अंगणवाडीसमोरच ही झाडे लावण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून पोषण आहार शिजवताना त्याचा वापर होईल. ''
सीईओ अमोल येडगे, महिला बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ चंद्रशेखर केकान यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील ३ हजार अंगणवाड्यांसमोर शेवगा आणि कढीपत्याची झाडे लावण्यात आली. येडगे यांनी स्वतः शेवग्याची एक हजार रोपं तयार करून अंगणवाड्यांना भेट दिली. 

मे २०१८ मध्ये आम्ही अंगणवाडी सेविकांची जिल्हा, तालुका पातळीवर बैठक झाली . त्यांना शेवगा,कढीपत्याच्या गुणधर्माची माहिती दिली. ज्या अंगणवाड्यांना स्वतःची इमारत आहे त्यांना परसबाग करून पालेभाज्या , फळाची झाडं लावण्याच्या सूचना दिल्या. सर्वच अंगणवाड्यांत शेवगा, कढीपत्ता लावला गेला. बहुतेक ठिकाणी परसबागाही झाल्या आहेत. अंगणवाडी सेविकांनीही गर्भवती माता, अंगवाडीत येणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलेल्या माहितीमुळे घरीही आहारात याचा वापर वाढला आहे.
'' गर्भवती मातांसाठी शेवगा वरदान मानला जातो.'' जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राधाकृष्ण पवार सांगतात ,''कॅल्शिअमसोबतच जीवनस्तव अ आणि ब यात मुबलक प्रमाणात. लोह, आयोडीन,फाॅस्फरस खनिजद्रव्येही यात असतात. कृमीनाशक, पचनक्रिया सुधारणारा शेवगा आहे. रक्तशुद्धीकरणासाठी तो कामी येतो. पदार्थाला चव देणाऱ्या कडीपत्त्यात लोह ,फाॅलिक अॅसिडही असतं.अ आणि क ही जीवनसत्व त्यात असतात. अॅनिमियापासून संरक्षण देण्यात उपयुक्त ठरतो. ''
याचा सकारात्मक परिणाम म्हणून कुपोषणाचे प्रमाण वर्षभरात कमी झाल्याचे दिसत आहे., असं चंद्रशेखर केकान यांनी सांगितलं. महिला बालकल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८ अखेर जिल्ह्यात सॅम कॅटेगिरीतली २४५ बालके तर मॅम मधील एक हजार २४ बालके होती. मार्च २०१९ अखेर ही आकडेवारी सॅम ९७ तर मॅम ६५७ इतकी झाली. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी पळसखेडा (ता.केज) येथील अंगणवाडीला भेट देत या उपक्रमांची माहिती घेतली व कौतुकही केलं.

-अमोल मुळे, बीड 

No comments:

Post a Comment