Sunday 18 August 2019

कलाशिक्षण, इतिहास आणि अडकलेपण (इतिहासात डोकावताना भाग १)



जे जे कलामहाविद्यालयात मी प्रवेश घ्यायचं ठरवलं तेव्हा बांधीव, ठोस असं काहीतरी जे सतत आजूबाजूला होतं त्यातून बाहेर पडायची तीव्र इच्छा होती. त्या वयात कलाकार व्हायचंय की नाही ह्यापेक्षा ते मोकळेपण अधिक हवंहवंसं वाटलं. जी काही थोडीफार पूर्वतयारी केली होती त्या जोरावर प्रवेशपरीक्षेच्या दिव्यातून जाऊन मला शिल्पकला शाखेमध्ये प्रवेश देखील मिळाला. कॉलेज सुरु झालं आणि अचानक आयुष्यातून अभ्यास निघूनच गेलाय असं वाटायला लागलं. एकदम मोकळं. आणि मग हळूहळू तो मोकळेपणा झेपेनासा झाला. कॉलेजमधल्या अति कंटाळवाण्या विषयांवरची कामं करताना हळूहळू संदर्भहीन असं काहीतरी करत असल्याची जाणीव तीव्र होऊ लागली. विचित्र अशा अधांतरीपणामध्ये जे जे मधील चार वर्ष संपली. त्या चार वर्षांमध्ये आपण नक्की काय केलं, कोणते आकार बघितले, कोणती माध्यमं हाताळली, काय शिकलो, निर्मिती प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि ती अनुभवली का ह्यातील कशाचाही अर्थबोध होत नव्हता.
अशातच मग कोणाशीतरी पुरातत्त्वशास्त्राबद्दल एक मोघम चर्चा झाली. आणि ह्या विषयामुळे तेव्हा जे काही तुटलेपण वाटत होतं त्यावर काहीतरी उत्तर सापडेल असं वाटायला लागलं. आणि बऱ्यापैकी तसंच घडलं देखील. Archaeology शिकताना एकूणच माझ्या विचारांमधील, मला सतत पडणाऱ्या प्रश्नांमधील आणि आजूबाजूला सतत घडणाऱ्या गोष्टींमध्ये असणारा एक सुसंगतपणा जाणवू लागला. आपल्या आत आणि बाहेर जे काही घडतंय त्याची पाळंमुळं शोधताना मजा येऊ लागली. जे जेमध्ये ज्या मोकळेपणाच्या ओढीने मी गेले होते तो मोकळेपणा मला इतिहास आणि पुरातत्त्व असे रूढार्थाने कंटाळवाणे विषय शिकताना जाणवू लागला. गोष्टींची उकल होत जातानाचा मोकळेपणा होता तो.
पुरात्तत्वशास्त्राचा एमएचा अभ्यासक्रम संपल्यानंतर मग मी वेगवेगळ्या शाळा आणि कला महाविद्यालयांमधून कार्यशाळा घ्यायला सुरवात केली. कला ही स्वैर नसून ती मोकळी आहे. आणि हा मोकळेपणा फक्त आणि फक्त अभ्यासामधून येऊ शकतो असं काहीतरी विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचा तो छोटासा प्रयत्न होता. इतिहास, पुरातत्व आणि कला हे विषय एकत्र बांधून मी ह्या कार्यशाळांचे विषय निश्चित केले होते. परंतु आपल्या एकूणच शिक्षणव्यवस्थेमध्ये या विषयांमध्ये इतकी फूट पाडलेली आहे की इतिहास आणि कला ह्यांचं नातं वैगरे जाणून घेण्यात बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना फारसा रस नसायचा. अर्थात काही मोजके अपवाद वगळता.
मग मला हळूहळू लक्षात यायला लागलं की ह्या सगळ्याच परिस्थितीचं मूळ आपल्या शालेय शिक्षण पद्धतीमध्ये आहे. तेच जाणून घ्यायच्या विचाराने मी पीएचडी करायचं ठरवलं. विषय होता : इतिहास. ह्या विषयातून शाळेत विद्यार्थी नेमकं काय शिकतात? इतक्या महत्त्वाच्या विषयामुळे त्यांना समाजभान किंवा आत्मभान येतं का? काळाच्या मोठ्या पटलावर स्वतःला ते नेमकं कुठं बघतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कलेचं महत्त्व किती आणि कसं?
पीएचडी संपायला साधारण सहा वर्ष लागली. या काळात मी १२ ते १५ या वयोगटातले जवळपास २००० विद्यार्थी आणि २०० शिक्षक यांचा विविधप्रकारे अभ्यास केला. विविध शिक्षण तज्ज्ञांना भेटले. विविध प्रकारे प्रयोग केले. मुलाखती घेतल्या. या कालावधीमध्ये विविध छोट्या छोट्या आडवळणावरच्या गावांमध्ये फिरले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, पनवेल आणि इतर काही शहरी भागांमध्ये विविध खाजगी शाळा ते पालिकेच्या शाळांना भेटी दिल्या. ह्या सहा वर्षांच्या कालावधीत काही उत्तरं मिळाली. काही नवे प्रश्न तयार झाले. जुन्या प्रश्नांची मोडतोड झाली. एकूण अतिशय रंजक प्रवास होता तो. मुलांबरोबरच्या गप्पा, शिक्षकांबरोबरच्या चर्चा यामुळे माझा राग आणि त्रागा कमी होऊन त्याची जागा फक्त कळकळीने घेतली. मला वाटत होतं त्यापेक्षा ही समस्या अधिक खोल आहे आणि तिला समाजातील कोणताही एक घटक जबाबदार नसून आपण सगळेच जबाबदार आहोत ही जाणीव प्रकर्षाने झाली. ह्या सगळ्याच प्रक्रियेमधील काही रंजक प्रयोग आणि ते करताना आलेले अनुभव पुढील काही भागांत.
- डॉ. अनघा भट

No comments:

Post a Comment