Sunday 18 August 2019

अफवा (आखुडबुद्धी बहुशिंगी)

अफवा हे बातमीचंच एक प्राथमिक स्वरूप आहे. सहसा, अफवा खोटी ठरली की तिला बातमी म्हटलं जातं. मानवाच्या इतिहासात पूर्वीपासून बातमी आणि अफवा यांच्यात संघर्ष चालू आहे. मोंगल काळात युद्ध होत असल्याची अफवा उठल्यानं खरोखरची युद्धे लढली गेल्याची नोंद आहे. महाराष्ट्रातही अफवांचं पीक वेळोवेळी आलेलं दिसून येतं. अफवेचा एक प्राथमिक प्रकार म्हणजे हूल. नारायणराव पेशव्याला मारण्यास गारदी शनिवारवाड्यात शिरले तेव्हा हूल पडून बाजार बंद पडला होता. एवीतेवी बाजार बंद पडलाच आहे तर लागल्या हाती नारायणरावाला संपवावं अशा विचारांनी गारद्यांनी त्याला मारलं असावं. आणि मग, अशा हूल मराठी राजकारणात नेहमीच पडत आल्या.
हूलीचं एक विस्तारीत स्वरूप म्हणजे अफवा. ही अफवा शक्यतो एखाद्यास गुप्त रहस्य सांगावं तशी सांगितली जाते. अफवा जितकी गुप्त तितकी अफवा वेगानं पसरते. पानिपतच्या युद्धात सदाशिवभाऊ पडले आणि सदाशिवभाऊ पडले नाहीत अशा दोन स्वतंत्र अफवा एकाचवेळी मराठी सैन्यात पसरल्या होत्या. कित्येकांनी खातरजमा करावी म्हणून लढणं थांबवलं होतं. पण अब्दालीच्या सैन्यानं लढाई न थांबवल्यानं निष्कारण संहार झाला. पुढं, अठराव्या शतकात इंग्रजांनी बस्तान बसवलं आले तेव्हा त्यांना ठगी किंवा बॉलिवूड सिनेमांपेक्षा भारतातल्या अफवाच त्यांना जास्त अपायकारक वाटल्या होत्या. बातम्या आणि घटना यांची नोंद करण्यासाठी त्यांनी गॅझेटिअर सुरु झालं यामागं या अफवांची भीती होती. अफवांची खातरजमा करून घेता यावी म्हणूनच पुढं इंग्रजांनी तारखातं सुरु केलं. पण तारांपेक्षा अफवा वेगानं पसरत असल्याने टेलिफोन येईपर्यंत अफवांना फारसा आळा बसला नाही. छोटा नागपूर प्रांतातील धनबादजवळचे केऊरझडंग हे गाव शंभर नंबरी अफवांसाठी प्रसिद्ध आहे. (हे गाव अस्तित्वात नाही अशीही एक अफवा आहे.) असं म्हणतात की एकेकाळी इथल्या अफवा उत्तरेस दिल्ली तर दक्षिणेस गुंटूरपर्यंत पोचायच्या. या गावाची ख्याती इतकी आहे की एखादी अफवा केऊरझडंगची आहे असं म्हटल्यावर शहाणेसुरते लोकही त्यावर पटकन विश्वास ठेवतात.
या गावात सगळे गावकरी दिवसरात्र पिंपळाच्या पारावर बसून अफवांचं पीक काढत असावेत. १९८१ साली आपल्या गावी स्कायलॅब कोसळणार आहे ही अफवा केऊरझडंगमधून पसरवली गेली तेव्हा अनेकांना आपलं मरण अटळ वाटलं होतं. काही भोळ्या लोकांनी आपली सगळी शेती विकून धनबादला जाऊन, नवे कपडे खरेदीलत्ते करून, अमिताभ बच्चनचे दोनदोन सिनेमे पाहून मरण्यापूर्वी जीवाची चैन केली होती. स्कायलॅब १९७९ सालीच कोसळलेलं असताना अशी अफवा लोकांना पटवून देणं हे मोठं हुशारीचं काम म्हटलं पाहिजे. याहीपुढं जाऊन केऊरझडंगच्या लोकांनी नवी अफवा पसरवली आहे अशी अफवाही मध्यंतरी पसरली होती आणि बऱ्याच लोकांचा यावर विश्वासही बसला होता.
१९९०च्या दशकात गणपती दूध पितो, हनुमानाचे पाऊल सापडले, रावणाच्या महालाचे अवशेष सापडले अशा काही मोजक्या गाळीव अफवा केऊरझडंगमधून आल्या. पुढच्या दशकात, टीव्हीवर अनेक न्यूज चॅनेल सुरु झाल्यावर साईबाबांचा व्हिडीओ सापडला, तीन डोक्यांचं रेडकू जन्मलं टाईप अफवा उठू लागल्या. (त्या काळात इंडिया टीव्हीचं हेडऑफिस केऊरझडंगला आहे अशी अफवा प्रचलित होती.) आणि स्मार्टफोन क्रांतीनंतर तर अफवा पसरवण्याच्या तंत्राचा परमोच्च विकास झाला. या काळात कित्येक वृद्ध कलाकार जिवंतपणीच पुन्हापुन्हा मेले, कित्येकदा मध्यरात्रीचे कॉस्मिक किरण लोकांचे मोबाईल खराब करून गेले, वडाच्या पानांनी कित्येकांचे फोन रिचार्ज झाले, लोकांना कित्येकदा मोठमोठ्या लॉटऱ्या लागल्या. थोडक्यात, अफवा पसरवणं ही एका गावाची मक्तेदारी न राहता आता समाजाची एक सामूहिक जबाबदारी बनली. आणि आता आपलं अवतारकार्य समाप्त झालं असल्यानं केऊरझडंग हे गाव नकाशातून गायब झालंय (अशी अफवा जोरात आहे).

- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment