Sunday 18 August 2019

इसवी सन पूर्व काळ (आखुडबुद्धी बहुशिंगी)



इसवीसन पूर्व काळ हा इसवीसन लागू व्हायच्या आधीचा काळ होता. या काळात कालगणना उलट्या दिशेने केली जायची. म्हणजे इसपूर्व ३०० नंतर इसपूर्व २९९ उजाडायचे, यानंतर इसपूर्व २९८, मग इसपूर्व २९७ असा क्रम असायचा. आधी इसपूर्व चौथे शतक, नंतर इसपूर्व तिसरे शतक आणि त्यानंतर इसपूर्व दुसरे शतक असे या काळात घडायचे.
अर्थात, काळ उलटा चालत असल्याने तत्कालिन मनुष्ये आधी मरत, मग आजारी पडत, मग टुणटुणीत होत, त्यानंतर तरूण होऊन शिक्षण घेत बाल्यावस्थेत जात आणि शेवटी जन्म घेऊन आपल्या आईबापांचे लग्न होण्याची वाट पाहात रहात. अशा प्रकारे, कित्येकांना आपल्या मरणानंतरची पुढची साठ-सत्तर वर्षे विनाकारण पृथ्वीवर जीवन कंठावे लागे. लोकांना वृद्धावस्थेतील आपले ज्ञान दिवसेंदिवस कमी करत जावे लागत असल्याने, बहुतेक लोकांचा भर स्मरणशक्तीपेक्षा विस्मृतीवर अधिक असे. पाठशाळांत शिक्षकमंडळी याच कामी अधिक मेहनत घेत. पाचवीला पोरांना शिकवलेले वीस ते तीसपर्यंतचे पाढे मोठ्या परीश्रमांति ते त्यांच्या मेंदूतून काढून टाकत. अशा प्रकारे, शाळेत येण्यापूर्वी एकपाठी पंडीत असलेला विद्यार्थी पहिलीला जाईपर्यंत त्याला जुजबी अक्षरओळख राहिल इतपतच त्याची तयारी झालेली असे. काही चतुर पालक याच उलट्या क्रमाचा फायदा घेऊन शिक्षकांकडून फी वसूल करून घेत.
कालगणना उलटीकडून होत असल्याने त्या काळातल्या लोकांना भविष्याची चिंता नसे, तर आपला भूतकाळ कसा असेल याची भीती त्यांना सतत भेडसावत असे. आपला भूतकाळ ते भविष्यवेत्त्यांकडून (किंवा भूतवेत्त्यांकडून) जाणून घ्यायचा प्रयत्न करत. भविष्यात काय घडले आहे हे ज्ञात असल्याने लोक आपल्या भविष्यकाळातील अनुभवांचे गाठोडे आपल्यापेक्षा वयोवृद्ध लोकांसमोर मांडून अकलेच्या चार गोष्टी सुनावत असत. वृद्ध लोकही भविष्याकडे एक नजर ठेवून त्या आदराने ऐकून घेत असत.
या काळात, आधी शोधांचा यथाशक्ती वापर होऊन मग काही वर्षांनी तो शोध लावला जाई. उदाहरणार्थ, इ०स०पूर्व ४०००मध्ये चाकांचा वापर रथांसाठी होऊ लागला तर चाकांवर मडकी बनवण्यास इ०स०पूर्व ४२०० मध्ये सुरुवात होऊन शेवटी इ०स०पूर्व ४५०० मध्ये मनुष्यास चाकाचा शोध लागला. सर्वच गोष्टी उलट्या होत असल्याने लोक आधी औषध खायचे, मग आजारी पडायचे (हल्लीही तेच होत असते असा काहींचा अनुभव आहे) त्यानंतर साथीचे रोग यायचे. शर्विलक आधी तुरुंगात खितपत पडत, मग राजसैनिकांतर्फे बंदी बनवले जात आणि त्यानंतर आपल्यावरच्या अन्यायाचे परीमर्जन होण्यासाठी चोऱ्या करत. नवे वर्ष सुरु होताना लोक इतरांना 'आगामी वर्ष तुम्हांला सुखाचे गेले असावे.' असे अपेक्षून 'गतसालासाठी' शुभेच्छा देत. हे असेच चालू राहिले तर हळूहळू मानव जात नष्ट होऊन पृथ्वीवर डायनोसॉर नामक सरपटणाऱ्या प्राण्यांचे राज्य येईल हा धोका दिसू लागला होता. शिवाय, उलट कालगणनेमुळे पृथ्वीवर पुन्हा शीतयुग येण्याचीही भीती होतीच.
एकूणात या उरफाटया कालगणनेमुळे मानवाच्या प्रगतीला खीळ बसू लागल्याने प्रचंड विचारांती काही विद्वान मनुष्यांनी ही कालगणना बदलावी असा सल्ला दिला. (भारतवर्षातल्या पुण्यपत्तन नामक ग्रामातल्या काही पंडीतांनी याला विरोध दर्शवला होता असे समजते.) कालगणना कशी असावी या वादात काही वर्षे तशीच निघून गेली. पण निर्णय काही होईना. शेवटी एके दिवशी इसपूर्व दोन, इसपूर्व एक अशी उलटी मोजदाद करत सर्व वर्षे संपली. नाईलाजाने लोकांना ही उलट कालगणना बंद करून सध्या आहे तशी सरळ वर्षे मोजण्यास सुरुवात करावी लागली. आणि मग माणसे आजच्यासारखे सरळ जीवन जगू लागली. हे करताना, तत्कालिन माणसांना शून्याची कल्पना नसल्याने इसवी सन ० हे वर्ष कालगणनेत आलेच नाही. अर्थात, इ०स०पूर्व १ नंतरचे वर्ष थेट इसवीसन १ सुरू झाल्याने अनेक माणसांची वये एका वर्षातच दोन वर्षांनी वाढली.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment