Sunday 18 August 2019

मुलं शाळेत चवीचं खाणार; कारण परसबाग देणार (सालनापूर जि प शाळा, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती.)

अमरावती जिल्हा. धामणगाव तालुका. इथल्या सालनापूर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेतील परसबागेची आणि तिथल्या विनोद राठोड सरांची ही गोष्ट. राठोड जून २०१७ मध्ये शाळेत रूजू झाले. जेमतेम २२ विद्यार्थीसंख्या असलेली ही शाळा. मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण अधिक असल्याचं सरांना जाणवलं. २२ मुलांपैकी ६ ते ७ आजारी असायची किंवा गैरहजर तरी असायची. सततच्या आजारपणामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. शिवाय शाळेतही त्यांचं लक्ष लागत नव्हतं.
राठोड सरांना वाटलं की, मुलांच्या जेवणात भाज्या नसतात, हे बरोबर नाही. मुलांना विषमुक्त भाजीपाला मिळावा याकरीता आपणच शाळेत परसबाग तयार करावी अशी कल्पना त्यांच्या मनात आली. काम सुरू झालं.
विनोद राठोड आणि त्यांचे सहकारी शिक्षक रितेश यांनी शाळेच्या आवारातील मोकळ्या जागेत सुरूवातीला सात प्रकारच्या रोपांची लागवड केली. हे "सप्त भाजी मंडळ".
शाळेच्या पूर्व दिशेस सप्त भाजी मंडळाची स्थापना केली. पालक, चवळाई, राजगिरा, माठ, आंबट चुका, निवळ आणि मेथी. यापैकी एका भाजीचं रोज उत्पादन मिळेल अशा प्रकारे नियोजन केलं. या भाज्यांचा दुपारच्या आहारात नियमित उपयोग सुरू झाला, काही दिवसातच मुलांमध्ये बदल जाणवायला लागला. म्हणजे आधी पोषण आहार पाहून नाकं मुरडणारी मुलं तोच आहार आता आवडीने खाऊ लागली होती.
मुलांचा प्रतिसाद पाहून राठोड सरांनी शाळेच्या कुंपणावर वेलींची लागवड केली. वाल, खडस्या वाल, फूलकोबी, पानकोबी, गाजर, सहा प्रकारचे मुळे, बटाटे, बिट, गोट्या वाल, गुलाबी वाल, सहा प्रकारचे दोडके, काळे बियाचा वाल, कारले, रान कारले. निळसर, हिरवी, पांढरी आणि पांढरट हिरवी अशा वार रंगांची वांगी लावली. जिरे टोमॅटो, गावरान टोमॅटो, ढेमसं, वाटाणा, मिर्ची, चवळी, बरबटी, गवार, भेंडी, कराळची लागवड केली. कडीपत्ता, काकडी, शरणी, ताकोत, शेपू, सात प्रकारच्या वेगळया जातीची तूर लागवड केली. अंबाडी आणि देव अंबाडी अशा प्रकारच्या २०० हून अधिक पालेभाज्या आणि फळभाज्या या परसबागेत लावल्या. या सगळ्या बागकामात मुलं अत्यंत आनंदाने सहभागी असतात हे विशेष. जमिनीच्या मशागतीपासून ते बियांची पेरणी, झाडांची देखभाल अशी सर्व कामं हे विद्यार्थी शिस्तीत करतात.
राठोड सर म्हणतात, “सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार म्हणून दिला जाऊ लागल्याने मुलांच्या तब्येती सुधारल्याचं दिसलं. म्हणजे आधी वारंवार आजारी पडणार्‍या मुलांचं प्रमाण हळूहळू कमी झालं. सकस आहार मिळाला तर अध्ययन आणि अध्यापन ह्या दोन्ही गोष्टी सहज आणि सोप्या होतात. आपला भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र, आजच्या नव्या पिढीची नाळ शेतीशी जुळलेली नाही. त्यामुळे शिक्षणाकडून सेंद्रिय शेतीकडे हा उपक्रम आम्ही शाळेत घेत आहोत.”
येत्या काळात आपल्या विद्यार्थ्यांपैकी किती जणांना नोकरी मिळेल हे माहीत नाही. मात्र, शाळेतील या सेंद्रिय शेती उपक्रमातून नक्कीच चांगले शेतकरी निर्माण होतील असा विश्वासही विनोद राठोड यांना आहे.
- अमोल देशमुख, अमरावती

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=528992880840282

No comments:

Post a Comment