Sunday 18 August 2019

मुलं शाळेत चवीचं खाणार; कारण परसबाग देणार ( जि प शाळा मलातपूर, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती)

आमची मलातपूरची शाळा पहिली ते चौथीपर्यंतची. शाळेत जेमतेम 29 मुलं. दर वर्षी मुलांची गळती आणि अनुपस्थिती. हा प्रश्न मनाला टोचत होता. मुलांचं वारंवार आजारी पडणं, त्यांचं वर्गात मन न लागणं, सुट्टीच्या बहाण्याने शाळेतून पळून जाणं, हे सगळंच घडत होतं. याचं कारण शोधू लागलो. त्यासाठी अनेकांशी चर्चा सुरू केली. तेव्हा, लक्षात आलं की, सालनापूरच्या जि प शाळेतली मुलं १oo% उपस्थित राहतात. हे कसं शक्य झालं?
मेळघाटातल्या शाळेत काम करणारे दुसरे एक शिक्षक विनोद राठोड यांनी परसबागेचा नाविन्यपूर्ण प्रयोग दाखवला. पध्दत सांगितली. विनोद यांनी टेकडीवर असलेल्या शाळेत स्वतः कावडीने पाणी आणून हिरव्या पालेभाज्यांची लागवड केली. मीही त्या उपक्रमात सहभागी होतो.
हा प्रयोग मला पटला. आणि आम्ही तोच प्रयोग त्यांच्या प्रेरणेने आमच्या शाळेत करून बघायचं ठरवलं. संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने बियांची लागवड केली. मुलं स्वतः परसबाग फुलवण्यात गुंतली. भाज्या वाढू लागल्या आणि मध्यान्ह भोजनात त्यांचा वापर होऊ लागला. विविध भाज्यांमुळे आहार रूचकर होऊ लागला. आणि अर्धी खिचडी ताटातच टाकून देणारी मुलं आता प्रत्येक शीत चाटून पुसून खाऊ लागली. शाळेत थांबू लागली.
अर्थात, मुलांना भाज्या खायला लावणं, त्याचं महत्त्व पटवून देणं नक्कीच थोडं कठीण होतं. मुलं सुरूवातीला भाज्या खायची नाहीत. मग आम्ही भाज्या करायची पद्धत बदलली. प्रत्येक दिवशी वेगळं काही. पुलाव, वाटाणा, पालक मेथी पुलाव, आबंट चुक्याची कढी असे पदार्थ केल्याने मुलं चवीने खाऊ लागली. आता कोणताच पदार्थ ते टाकून देत नाहीत. कारण त्यांनीच या भाज्या पिकवल्यात.
आमच्या मलातपूर शाळेतल्या मुलांचे पालक, शाळेचे मुख्याधापक आणि गावातली तरूण मुलंमुली मला मदत करतात. आमच्या परसबागेमुळे जैविक शेतीचा प्रसार पूर्ण गावात झाला. मुलांच्या घरीही या भाज्यांचा वापर स्वयंपाकात होऊ लागला. त्यामुळे आज आजाराचं प्रमाण कमी झालं. 2 विद्यार्थ्यांपैकी किमान 10 विद्यार्थी गैरहजर असायचे. मुले शाळेत येऊ लागली, खेळू, शिकू लागली. 60 ते 65% असणारी उपस्थिती 2016 पासून ते अगदी आत्ता 2019 पर्यंत 100% आहे.
स्वावलंबनाचे धडे मुलांना सहज देता येतात, हेही आम्हाला परसबागेच्या प्रयोगातून कळलं. कमी वेळात, कमी खर्चात सकस आणि संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने भाज्यांचं उत्पादन आरोग्यासाठी खूप उपयोगी पडते. आज शाळेत १०० पेक्षा जास्त बियांचा संग्रह केला आहे आणि पावसाळ्यात कित्येक शाळांना बियांचा मोफत पुरवठा करणार आहोत.
आता आमची मुलं पालक, मेथी, राजागिरा, माठ, चवळाई, आंबट चुका, गवार, वाल, गाजर, मुळा, बीट, वांगे, टोमॅटो, जिरे टमाटर, राजमा, तूर शेंग, वाटाणा, बटाटा, भेंडी, पान कोबीसारख्या भाज्या तसंच पालक आणि भेंडीची भाजी व तूर सोले पुलाव आवडीने खातात.

- उमेश रामनाथ आडे, शिक्षक

No comments:

Post a Comment