Sunday 18 August 2019

हसरी चांदणी (बातम्या तुमच्या-आमच्या मुलांच्या)


शाळेचा पहिला दिवस आठवतो?
बऱ्याच वर्षांपूर्वी, आजच्यापेक्षा वेगळं होतं.
तू नवीन आयुष्याचा श्रीगणेशा करत आहेस, नवीन शिकण्यासाठी तू शाळेत जात आहेस, हे पालक पाल्यांना बजावत असत.
पहिल्या दिवशी शाळेत काय घडलं, काय शिकवलं, हे ऐकण्यासाठी पालक आणि पाल्यही ते सांगण्याकरिता उत्सुक असे. दोन्ही लोक निरागसपणे नवीन गोष्टीचा ,त्या नाविन्याचा आनंद लुटत.
पाल्य नवीन शिकताना आनंदाने धडपडताना दिसत.
शाळेत शिक्षक आणि घरी पालक, असं दिघं मिळून मुलांना घडवत असत. जे, जगताना उपयोगी पडेल, असंही काही त्यात असायचं.
आज, आपल्या पाल्याला सर्व पढवून शाळाप्रवेशाची मुलाखत द्यावी लागते. त्यात मूल परिक्षेत उतरलं नाही की, तिथूनच त्याच्या शिक्षणाच्या श्रीगणेशाची ऐशी तैशी होऊन जाते. इतक्या लहान वयात मुलाखतीची परीक्षा. त्याचं वयही लक्षात न घेता त्याला नापास केलं जात. पालकही निराश होतात. असा, पाल्याच्या शिक्षणाचा प्रवास न्यूनगंडाने सुरु होतो.
अशा स्थितीत, शाळेचा पहिला दिवस रमणीय असतोच, असं नाही.
मात्र, सध्या, शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय आणि आनंददायी करण्यासाठी खास प्रयत्न केले जातात.
कुठे ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले गेले. काही शाळांमध्ये ‘सेल्फी पॉइंट’ तयार करण्यात आले होते. या सेल्फी पॉइंटवर
‘माझा शाळेचा पहिला दिवस’ असे लिहिण्यात आले होते. ठाण्याच्या सरस्वती मंदिर शाळेतील मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे सकाळच्या सत्रात शिक्षकांनी जमिनीवर चांदणीचे आकार काढून त्यांना हसरी आणि रडकी चांदणी अशी नावे दिली होती. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना कोणत्या चांदणीत जायचे आहे, असे विचारण्यात आले. साहजिकच अनेक विद्यार्थानी हसऱ्या चांदणीची निवड केली.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस स्मरणात राहील यासाठी, असे जाणीवपूर्वक प्रयत्न करावं लागणं.... म्हटलं तर स्तुत्य. मात्र, काहीसं प्रतिकात्मकच. शिक्षणाचा कस वाढला, तर शाळेतला प्रत्येक दिवस सार्थकी लागेल, नाही का?

- लता परब

No comments:

Post a Comment