Sunday 18 August 2019

दाटदुट बोना तो घरमें सोना ,पतला पतला बोना तो सालभर रोना



 अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातलं भिल्ली खेडेगाव. या खेड्यातले शेतकरी रमेश राजेरामजी साकरकर. वय ६३. देशी बियाणं संवर्धनाचा आणि विषमुक्त शिवाराचा वसा हाती घेतलेले. आतापर्यंत ४० ते ५० हजार शेतकऱ्यांना त्यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे. अमरावती, वर्धा, नागपूर,यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी ते जोडलेले आहेत. डॉ वंदना शिवा यांची नवधान्य संकल्पना ते राबवत आहेत.
२५ कुटुंबाना ते विषमुक्त घरपोच पुरवत आहेत. त्यांची शेती फक्त तीन एकर. पण त्यांच्या शेतातली माती ओली झाली की वेगळाच सुगंध सुटतो. फक्त स्वतः जतन केलेलं बियाणं ते वापरतात. कुठलंही रासायनिक खत, जंतुनाशकं नाहीत. केवळ दशपर्णीची फवारणी.
२६५ प्रकारची देशी बियाणं त्यांनी जतन केली आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तराखंड अशा वेगवेगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडून मिळालेली पारंपरिक बियाणं. शेतकऱ्यांसाठी ते दरवर्षी दोन बीज महोत्सव आणि दरवर्षी पंचवीस डिसेंबरला ते पीक पाहणी मेळावा आयोजित करतात. टेरेस शेती, पिंपातली शेती याबाबत ते मार्गदर्शन करतात. बियाणांच्या बाबतीत शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा, बियाणं संवर्धनासाठी महिलांमध्ये जागृती निर्माण करणं , युवा पिढीमध्ये देशी बियाणांबाबत जागरूकता निर्माण करणं, मागील पिढ्यांचे अनुभव बंदिस्त न ठेवता ते इतरांपर्यंत पोहोचवणं, प्रत्यक्षात उतरवणं यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
मुलं म्हणजे देशाचा आधार. त्यांना सकस , विषमुक्त आहार मिळावा, शाळाशाळांमधून त्यांना विषमुक्त शेतीचे धडे मिळावे यासाठी साकरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. काही शाळांमध्ये त्यांनी परसबागा तयार केल्या आहेत. धामणगाव रेल्वेसह 20 गावातल्या शाळांमध्ये वनविभागामार्फत पथदर्शी प्रकल्प राबवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. या कामी त्यांना पत्नी, मुलगी आणि नातू तेजस यांची साथ आहे.साकरकर यांना अनेक सन्मानही लाभले आहेत परंतु शेतकरी पारंपारिक बियाण्यांनी समृद्ध व्हावा ही धडपड पुरस्कारापेक्षा मोठी आहे असं ते मानतात तसेच तरुणांनी हे काम पुढे न्यावं असं त्यांना वाटते.
या कामामागची प्रेरणा आहे साकारकर यांचे आईवडील . त्यांचे आईवडील सांगायचे -
" नया नौ दिन ,पुराना सौ दिन''
" दाटदुट बोना तो घरमें सोना ,पतला पतला बोना तो सालभर रोना "
रमेश साकरकर, मु.भिल्ली ता.धामणगाव रेल्वे जि.अमरावती राज्य.,महाराष्ट्र
संपर्क क्र .9890478850 


-नितीन पखाले 

No comments:

Post a Comment