Sunday 18 August 2019

गोपी आणि कृष्ण - आखुडबुद्धी बहुशिंगी


स्टेजवर चार गोपी, कृष्ण आणि पेंद्या उभे आहेत. (ऐनवेळी चार गोपी न मिळाल्यास तीन गोपी चालतील. चौथ्या गोपीला तसेही डॉयलॉग नाहीत.) गोपींच्या हातात घागरी, कृष्णाच्या हातात बासरी आणि पेंद्याच्या हातात चहाची किटली आहे.
कृष्ण : काय गोपींनो, कुठं चाललात? पाणी भरायला का?
तिसरी गोपी (तिरसटपणे) : नाही, नदीत पाणी कमी आहे म्हणून घागरीतलं पाणी नदीत ओतायला चाललो आहोत.
पेंद्या : क्लिश्ना थमाल ले थमाल आपल्या गोपी...
कृष्ण : गप रे पेंद्या! गोपींनो, आता आम्ही तुमचा रस्ता अडवला पाहिजे. कारण तसं स्क्रिप्टमध्ये लिहिलं आहे. यानंतर काय होईल ते माहित नाही. कारण स्क्रिप्टचं दुसरं पान फाटलंय.
पहिली गोपी : (लाजून) आता ना, आता आम्ही पाण्यात उतरू आणि मग तू (एकदम मोहरून जात) आमची वस्त्रं पळवायची. (लाजते.)
कृष्ण (बचावात्मक सुरात) : गोपींनो, त्याऐवजी घागरी पळवल्या तर चालणार नाही का?
दुसरी गोपी : घागरींचा तुला काय उपयोग रे कृष्णा?
कृष्ण : तसा तुमच्या कपड्यांचा तरी काय उपयोग आहे मला? माझ्या मापाचे थोडेच आहेत हे.
पहिली गोपी : काय पण चावटपणा हा? केवळ हा कृष्ण वस्त्रं पळवेल या आशेनंच आम्ही गोपी व्हायला तयार झालोय. आणि आता तेपण नाही? मेलं आमचं नशीबच खोटं.
कृष्ण : माझ्याऐवजी बलरामानं वस्त्रं पळवली तर चालणार नाही का?
दुसरी गोपी : नको, नको, बलरामकाका गेल्यावेळी नदीवर आले होते तर त्यांनी नर्मदेचा पाट खणण्याचं सक्तीचं श्रमदान आमच्याकडून करून घेतलं होतं. नकोच ते.
पहिली गोपी : काय रे किसना, तू आमची वस्त्रं पळवणार आहेस की नाही?
कृष्ण : आपण त्याऐवजी, मी तुमची वस्त्रं पळवलीत असं गृहीत धरून नाटक पुढं चालवलं तर?
दुसरी गोपी : ते काही नाही. पळवायची म्हणजे पळवायची. हेच तर या नाटकाचं मुख्य आकर्षण आहे.
कृष्ण : पळवल्यावर तुम्ही काय करणार?
पहिली गोपी : मग आम्ही 'दे रे कान्हा, चोळी अन लुगडी' हे गाणं म्हणणार.
पेंद्या : त्याऐवजी 'आरं हणम्या हाण तुझा ठोसा, त्याचा करीन मसाला डोसा' हे गाणं म्हटलं तर?
दुसरी गोपी : ऊं! अजिबात नाही. दे रे कान्हाच म्हणलं पाहिजे.
कृष्ण : (गोंधळून) पण कानाच का? मात्रा चालणार नाही?
पेंद्या : गोपींनो, ह्या भोळ्या कृष्णापुढं खरंच तुमची काही मात्रा चालणार नाही, कळलं ना? गेल्या साली आम्ही याला दुःशासन केलं होतं तेव्हा सहाआठ फूट दूर उभं राहून द्रौपदीचं वस्त्रहरण करत होता. द्रौपदी त्याच्याजवळ जाऊन चिकटायला बघत होती आणि हा उलट तिला टाळत स्टेजभर पळत होता.
पहिली गोपी : (फुरंगटून) कायपण हा तुमचा किस्ना? मेल्या गोपी स्वतः सांगतात तरी वस्त्रं पळवत नाहीय.
कृष्ण : पेंद्या, तू आपला गायी राख जा बघू. मी ह्या नाठाळ गोपींकडं बघतो.
पेंद्या : हांगाश्शी! लगे रहो. मी जातो.
कृष्ण : तर, गोपींनो, मी तुमची वस्त्रं पळवावी असं तुमचं म्हणणं आहे?
दोन्ही गोपी : ह्हो! आणि आम्ही गाणी म्हणेपर्यंत परत पण द्यायची नाहीत.
कृष्ण (स्वगत) : ह्या दोघी इतकं वाईट गाणं म्हणत असतील का? (प्रकट) गोपींनो, मी तुमची वस्त्रं पळवायला तयार आहे.
दोघी गोपी : (आनंदानं) अरे व्वा!
कृष्ण : पण समजा, मी तुमची वस्त्रं न पळवता आपण केवळ तुमची वस्त्रं पळवली आहेत अशी सैद्धांतिक कल्पना करून नाटक पुढं चालवलं तर?
दुसरी गोपी : तर, हे गृहीतक बरोबर आहे की नाही पाहण्याच्या दोन पद्धती आहेत- एक म्हणजे प्रयोग करून किंवा दुसरं म्हणजे तर्कशास्त्राच्या आधारे अनुमान काढून शेवटचं अनुमान चुकीचं आहे हे सिद्ध करणे.
कृष्ण : हो, पण फक्त मूळ गृहीतक चुकीचं आहे हे सिद्ध करून भागणार नाही. मूळ गृहीतकामुळं सिद्धांत निखालसपणे चुकीचा ठरतो हेही सिद्ध करावं लागेल. आणि हे सिद्ध करताना केवळ सांख्यिकीय माहिती देऊन चालणार नाही. कारण, सांख्यिकीतही अपवाद असण्याची शक्यता गृहीत धरावी लागतेच.
पहिली गोपी : काय हा मेला कृष्णाचा चावटपणा! आपल्याला बोलण्यात गुंतवून वस्त्रं पळवण्याच्या नैतिक जबाबदारीतून पळ काढतोय!
कृष्ण : असं कसं गोपींनो, वस्त्रं पळवण्यामागची तर्कसंगत भूमिका...
(गोपी क्रमांक चार इतका वेळ नुसतीच बॅकग्राऊंडला सीनरीसारखी उभी असते. तर्कसंगत भूमिका, गृहीतक, तर्कशास्त्र वगैरे शब्द ऐकून ती बहुदा वैतागते. आपला हंडा बाजूला ठेवून दोन गोपींच्या मधून विदुतगतीनं घुसत तडक कृष्णाला भिडते. हेवीवेट गोपीपुढं किसना अपुरा पडतो. किसना हातापाया पडत असताना गोपी क्रमांक चार त्याचं पितांबर धरून ओढते.
जमलेले प्रेक्षक 'चला, गेल्यासाली चुकलेला वस्त्रहरणाचा प्रयोग तरी बघायला मिळेल.' म्हणून उत्कंठेनं नाटक पुढं बघू लागतात.)
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment