Sunday 18 August 2019

एक दिवस वाहनाविना


निसर्ग व पर्यावरणाचंही संवर्धन व्हावं असं प्रत्येकजण फक्त म्हणत असतो. पण काही तरूणांनी मात्र यासाठी पुढाकार घेतला आहे. हे तरूण आहेत, यवतमाळचे. ‘एक दिवस वाहनाविना’ हे अनोखं अभियान त्यांनी नुकतंच सुरू केलं आहे. आठवड्यातून किमान एक दिवस प्रत्येकाने कोणतेही वाहन न चालविता पायदळ किंवा सायकलने आपली कामे करावी, अशी या अभियानाची संकल्पना आहे.
प्रत्येक गावात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरात प्रत्येक घरात प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र वाहन आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर आली की, प्रदूषणासोबतच वाहतुकीचाही खोळंबा करतात. यावर उपाय म्हणजे वाहनांचा कमीतकमी वापर करून आपलं गाव प्रदूषणमुक्त करण्यास हातभार लावणे. यासाठी पुढाकार कोण घेणार आणि घेतल्यास लोकांना यासाठी तयार करणं जिकिरीचं काम. कारण घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डेअरीतून दूध आणायचे झाल्यास आपण गाडी स्टार्ट करून भूर्रकन जातो. अशावेळी एक दिवस गाडीविना दैनंदिन कामे करा ही संकल्पना लोकांच्या गळी उतरविणं सोपं नव्हतं. मात्र यवतमाळमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांनी हे शिवधनुष्य उचललं. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी समाज माध्यमांवरून वातावरण निर्मिती करण्यात आली. वृत्तपत्रांमधून पॉम्प्लेट वाटण्यात आले. एकदिवस गाडीविना म्हणजे पूर्णत: पायदळ किंवा सायकलने फिरले पाहिजे, हेच गृहीतक ठेवण्यात आले. समाज माध्यमांवरून जनतेला केलेल्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरात याची जनजागृती व्हावी यासाठी पायदळ रॅली काढण्यात आली. गेली ६० वर्षे सायकलवरूनच आपला दिनक्रम करणारे शहरातील ज्येष्ठ नागरिक उमेश वैद्य यांनी रॅलीतील सहभागी नागरिकांना पायदळ चालणे आणि सायकल वापरण्यामागचे फायदे सांगितले. या रॅलीस तरूणांसह विविध क्षेत्रातील नागरिक, खेळाडू, महिलांनी उत्तम प्रतिसाद देऊन आठवड्यातील एक दिवस वाहनाविना दैनंदिन कामे करण्याचा निश्चय केला. स्वत:शी प्रामाणिक राहून या अभियानास सहकार्य करून रविवार अथवा आपल्या सोईनुसार आठवड्यातून किमान एक दिवस वाहनाशिवाय फिरूया, असं सर्वांनी ठरवलं. आता या उप्रकमाची सुरवात होऊन एक महिना लोटला. अभियानात सहभागी झालेला प्रत्येकजण आठवड्यातून एक दिवस वाहनाविना राहण्याचा प्रयत्न करीत असून अनेकांना यात यश आले आहे. आता या अभियानात सहभागी होण्यासाठी अनेक उत्सुक लोकं पुढे येत आहेत. त्यामुळे या अभियानाने चळवळीचं रूप घेतलं आहे.


- नितीन पखाले, यवतमाळ

No comments:

Post a Comment