Tuesday 23 July 2019

पॉकेटमनीतून दुष्काळग्रस्तांना मदत

मुंबईच्या सौरभ मंगरूळे या तरूणाची ही गोष्ट. सौरभने मुंबईतच अभियांत्रिकीची पदवी घेतली. तो मुंबईतच लहानाचा मोठा झाला. शिकत असताना रोजचं पेपर वाचन कामी आलं आणि मराठवाड्यातील दुष्काळाविषयी त्याला कळलं. तेव्हापासून त्याने घरून मिळणारा पॉकेटमनी वाचवायला सुरूवात केली. आणि सामाजिक संस्था, गरजूंना मदत देणं सुरू केलं. आता या गोष्टीलाही चार वर्ष झाली.
सौरभ सांगतो, “२०१३ मध्ये मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. मुंबईत राहून या दुष्काळाची तीव्रता लक्षात येणं शक्य नव्हतं. मात्र, वर्तमानपत्रांमधून दुष्काळाची भीषणता कळली. अनेक विद्यार्थ्यांचं फीअभावी शिक्षण थांबलं होतं, छोट्या मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत अनेकांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. अनेकांच्या मुलीची लग्नं दुष्काळाने पुढं ढकलावी लागली होती. नापीकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांकडे वळत होते. ही स्थिती केवळ वाचूनही अंगावर काटा येत होता. त्यामुळे आपण शक्य तितकी मदत या परिसरातील किमान एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या संस्थेला, सामाजिक प्रकल्पाला करायला हवी असं वाटलं. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना मला घरून पॉकेटमनी मिळायचा. त्यातूनच मी वर्षभर बचत सुरू केली. रक्कम तशी छोटीच होती. मात्र, जेव्हा ही कल्पना मी कुटुंबिय आणि मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनीही प्रोत्साहन देत आपला वाटा यात उचलला आणि मदतीच्या रकमेत भर पडली.”
आतापर्यंत सौरभ आणि त्याच्या मित्रांनी औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील अंजनडोह, गंगापूर, भारतीय समाज केंद्र इथं मदत केली आहे. यावर्षी त्यांना शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतिवन संस्थेविषयी माहिती मिळाली. या संस्थेत ऊसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त शेतकरी, अनाथ, वंचित घटकातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दीपक व कावेरी नागरगोजे हे जोडपं काम करत असल्याची माहिती मिळाली. या संस्थेला व तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या सुरेश व मयुरी राजहंस या दांपत्याच्या सेवाश्रम या प्रकल्पाला मदत केली. यासाठी सौरभला वडील सुनील मंगरुळे, मित्र प्रमोद मुंडे, धनंजय उपासनी, विशाल सासे, वैशाली ओठावनेकर, विभावरी शेटकर, समिक्षा महाले यांनीही आपल्या पॉकेटमनीतून साथ दिली.
#नवीउमेद 

- अमोल मुळे, बीड

No comments:

Post a Comment