Tuesday 23 July 2019

कव्हर ड्राईव्ह (आखुडबुद्धी बहुशिंगी)

बायकोला काही खरेदीसाठी गावात जायचं होतं. तिनं जाताजाता घरीच असल्यानं मला मिष्काच्या (आमचा धाकटा चिरंजीव) पुस्तकांना कव्हर घालायची आज्ञा दिली. या वटहुकुमाला दोन तृतीयांश जनतेचा विरोध (पक्षी: माओ, मिष्का आणि मी. पण माझं मत ग्राह्य धरलं जात नसल्यानं 66%च) होता. आणि मी मराठी धनी, हुकमाचा गडी या उक्तीनुसार खाकी कागद, पेन्सिल, कटर, पट्टी, सेलोटेप, स्टेपलर घेऊन सज्ज झालो. माओ माझ्याकडं पिंजऱ्यातल्या केळी खाणाऱ्या माकडाकडं बघावं तसं बघत होता.
"बाबा, तुम्हांला कव्हर घालता येतं?" खरंतर त्याच्या प्रश्नामागं तुम्ही शाळेत कधी गेला होतात का असा सुप्तप्रश्न होता.
"म्हणजे काय? मला तीन वर्षं सर्वोत्कृष्ट कव्हरचं बक्षीस मिळालं होतं, माहितीय?"
ही खरी गोष्ट आहे. मला इतर कशातच बक्षीस मिळत नसल्यानं शाळेतल्या वाळिंबेबाई मला 'सर्वोत्तम कव्हर घालणारा मुलगा' या कॅटेगरीत बक्षीस द्यायच्या. गॅदरिंगला मी बक्षीस घ्यायला स्टेजवर जाऊ लागलो, की माझ्या डोक्यावर टपली मारत 'अरे, हे बक्षीस तुझ्यासाठी नाही. तुझ्या बाबांना पाठव घ्यायला.' असं म्हणत मला परत पाठवलं जाई. बाबा बक्षीस घ्यायला स्टाफरूममध्ये जात तेव्हा तिथं दिवाळी कम दसरा असं वातावरण असे. असो, तर मी सदगोपन रमेशच्या आत्मविश्वासानं ब्रह्मे घराण्याच्या कव्हर घालण्याच्या परंपरेचा पाईक होऊ पाहत होतो आणि समोरून अॅलन मुलाली माझा तेजोभंग करत होता.
"बाबा, लेबल कव्हर लावल्यावर चिकटवायचं असतं ना?" मुलालीचा पहिला बाऊन्सर.
"अरे, लेबल व्यवस्थित चिकटतात का ते पाहत होतो." सदगोपन रमेश बीट होतो पण तो बॉल कीपरच्या ग्लव्ह्जमध्ये गेल्यावर धैर्यानं हवेत बॅट फिरवतो.
"आणि आतल्या बाजूनं घडी घालायचं असेल तर कव्हर थोडं मोठं कापायला नको का?"
"मी आता कापणारच होतो, पण-"
तितक्यात कव्हर्समध्ये फ्लिंटॉफ कात्रीनं कव्हरचा ब्राऊन कागद कापताना दिसतो. फ्लिंटॉफच्या पाठीत धपका घालून कात्री हस्तगत केली जाते. कात्री हातात पडल्यावर या कात्रीनं बरोब्बर पुस्तकाच्या आकारात कापलेलं कव्हर आणखी मोठं होऊ शकत नाही या विदारक सत्याची जाणीव सदगोपन रमेशला होते. ते कव्हर वाईडबॉल समजून चोळामोळा करून फेकण्यात येतं. यावरही मुलाली 'हौज द्याट?" असं अपील करतो.
"अरे, कव्हरचा कागद चांगला आहे का हे पाहत होतो. हल्लीचे कागद फारच पातळ असतात. आमच्या वेळेस पुस्तक फाटेल पण कव्हर वर्षानुवर्षं शाबूत!" मुलाली हसतो नुसताच. छद्मीपणे. ह्या गधड्याला चांगला सडकवला पाहिजे एकदा.
सदगोपन रमेश पुन्हा स्टान्स घेतो. यावेळी पुस्तकाच्या मापापेक्षा दोनदोन इंच जादा मोजून कव्हर व्यवस्थित कापलं जातं. पुस्तक बऱ्यापैकी कव्हरमध्ये जातं. सदगोपन रमेश तोंडातून जीभ अडीच इंच बाहेर काढून कव्हरला आता सेलोटेप लावणार तोच-
अरेच्चा! इथली सेलोटेप कुठं गेली?
तर डीपमिडविकेटला फ्लिंटॉफ त्या टेपच्या रोलची गाडीगाडी करून खेळत असतो. आता फटके दिले तर हा फ्लिंटॉफ भोकाड पसरून रडणार आणि मग शर्ट काढून हवेत गरगरा फिरवणार हे माहीत असल्यानं सबुरीनं त्याच्याकडं टेप मागितली जाते. बापाचं ऐकायचं नाही अशी शिकवण असल्यानं बाळ निग्रहानं नकार देतं. शेवटी समजूतदार रमेश स्टेपलरचा उपयोग करून कव्हर आणि पुस्तक यांची जोडी जोडतो. धावफलकावर एक धाव लागते. हुश्श!
"बाबा, कव्हरचा कागद उलटा झालाय." मुलाली या क्षणाचीच वाट बघत असल्यासारखं शांतपणे.
"होय. मुद्दामच घातलंय. ही बाजू खराब झाली की कव्हर सुलट करून वापरायचं." सदगोपन रमेश शफल होत कपाळावरचा घाम पुसून उत्तर देतो.
तितक्यात थर्डमॅनकडून मुलालीला त्याचा मित्र खेळायला बोलावतो. दोघं मित्र बोलण्यात गुंतलेले पाहून रमेश गडबडीनं ते उलटं कव्हर सुलटवण्याचा प्रयत्न करतो, पण स्टेपलरच्या पिना अखंड मारलेल्या असल्यानं या गोंधळात ते कव्हर फाटतं. मुलाली आपल्या मित्राला सांगत असतो, "अरे, माझे बाबा पुस्तकाला कव्हर घालतायत. ते बघायलाच जास्त मज्जा येतेय."
झालं. आता डॉमिनिक कॉर्कही सिलीपॉईंटला दबा धरून बसतो. सदगोपन रमेशवर मनोवैग्यानिक दबाव आणखी वाढतो.
"काही प्रॉब्लेम नाही बाबा. हे गेल्या वर्षीचं पुस्तक होतं."
"मग हे इतकं नवंकोरं कसं?" मुलाली आता गुगली टाकतोय हे कळूनही रमेश घाईत बॅट फिरवतो.
"कारण याला आईनं कव्हर घातलेलं." थंडपणे मुलाली चेंडू अडवतो.
म्हणजे जवळपास अर्धा तास झाला तरी अजून धावफलक कोराच!
"बाबा, मला याचं विमान करून दे." फ्लिंटॉफ कुठंतरी सापडलेला घोटीव कागदाचा तुकडा नाचवत फर्मावतो.
"अरे, माझ्या भावाला मस्त विमान बनवता येतंय. त्याला सांगूया का?" कॉर्क विचारतो.
"हो , हो. घेऊन जा त्याच्याकडं हा कागद." सदगोपन रमेश सुटकेचा निश्वास सोडतो.
"त्यापेक्षा त्यालाच इथं बोलवूया ना?" हा दुष्टपणा अॅलन मुलालीशिवाय आणखी कुणाला सुचणार? दीड मिनिटात लाँगऑनला आणखी एक फिल्डर जमा होतो. कामाला सुरुवात केल्यापासून जवळपास सव्वा तासानं पहिलं कव्हर घालून झालेलं असतं. आता या सेट झालेल्या प्रोसेसनुसार सगळी पुस्तकं धपाधप कव्हर घालून काढायची असतात. सदगोपन रमेश थोडासा सुखावतो.
"बाबा, तुम्ही कव्हर घालण्याआधी जरा इन्स्ट्रक्शन्स वाचायला हव्या होत्यात."
"अरे हे शाळावाले मला काय शिकवणार कव्हर घालायचं?"
"तसं नाही, इथं लिहिलंय की ट्रान्सपरन्ट शीटची कव्हर घाला म्हणून."
हे म्हणजे सगळी मॅच खेळून झाल्यावर आयसीसीनं ती अनधिकृत होती असं हे घोषित करण्यासारखं होतं.
"हे आत्ता सांगतोयस? आधी का वाचलं नाहीस?"
"आधीच वाचलं होतं. मला वाटलं तुम्ही प्रॅक्टिस करताय."
लाँगऑन आणि सिलीपॉईंटचे फिल्डर हा सोहळा पाहून धन्य होतात. इतका वेळ दाबून ठेवलेला संताप उफाळून येतो. अॅलन मुलालीच्या गालावर त्याचा निचरा होणार तोच बेल वाजते. आणखी कोण गधडा हा खेळ पहायला आलंय हे बघायला मिष्का पळत जातो. त्याचा आनंदाचा चित्कार ऐकूनच मला कळत की मैदानात सचिन तेंडुलकरची एन्ट्री झालेली आहे. आता मी पुन्हा नॉन- स्ट्रायकर एन्डला जायला हरकत नाही.
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment