Tuesday 23 July 2019

ऐंशी रूपयांची गोष्ट, (आखुडबुद्धी बहुशिंगी - ज्युनिअर ब्रह्मे)

(स्थळ-सिनेमाथिएटर, कॅशियरची खिडकी)
"बोला काका, काय हवंय?"
(पिशवीतून वर्तमानपत्राची सुरळी काढून दाखवत) "ही जाहीरात तुमचीच आहे ना?"
"कोणती? स्त्री किंवा पुरुष मदतनीस पाहिजे ही?"
"नाही हो. त्याखालची."
"हरवली आहे-"
"नाही हो, त्याखालची सिनेमाची जाहीरात तुमचीच आहे ना?"
"अं, हो. पण पुढचा शो साडेतीनला आहे. तिकीटविक्री अजून चालू व्हायची आहे."
"मला तिकीट नकोय."
"हे सांगायला इथंवर आलात का?"
"नाही. मला माझ्या तिकीटाचे पैसे परत पाहिजेत."
"कुठल्या तिकीटाचे?"
"बाराच्या शोचे. माझा सीट क्रमांक के बत्तीस."
"शो संपल्यावर कसे पैसे परत देता येतील? शिवाय फक्त शो रद्द झाला तरच पैसे परत द्यायची पद्धत आहे आमची."
"शो मी पाहिलाय. म्हणूनच विचारलं ही जाहीरात तुमची आहे का म्हणून."
(चष्मा लावून जाहीरात वाचत) "जाहीरातीत असं कुठं लिहिलेलं दिसलं की आम्ही पैसे परत देऊ म्हणून?"
"तुम्ही फसवणूक केलीत म्हणून मी पैसे परत मागतोय."
"कसली फसवणूक? प्यासी चुडैलऐवजी शैतानी हवेली सिनेमा दाखवला की काय आमच्या लोकांनी?"
"नाही. स्क्रीनवर प्यासी चुडैलच होती. पण तुम्ही इथं जाहीरातीत स्पष्ट काय लिहिलंय ते वाचा."
"अं काय?"
"हे पहा- एका तिकिटात सोळा चुंबनदृष्यं पाहायची सुवर्णसंधी सोडू नका."
"बरं मग?"
"मी बाराच्या शोमधली एकूण चुंबनदृष्यं मोजली, ती पंधराच भरली."
"बरं, मग?"
"मग काय? माझी फसवणूक झालीय. मला पैसे परत पाहिजेत."
"पंधरातरी बघितलीत ना मिटक्या मारत?"
"सोळावं दृष्य जे बघायला नाही मिळालं तेच सर्वात चांगलं असेल तर?"
"बरं, कोणतं बघायला मिळालं नाही ते सांगा, मी पुढच्या शोच्या वेळी ते आलं की तुम्हांला बोलावून तेवढंच दाखवायची व्यवस्था करतो."
"वा रे वा. मला काही कामधाम नाहीय वाटतं तुमची चुंबनदृष्यं बघायचं सोडून."
"पाहिजे काय हो तुम्हांला?"
"पैसे. परत पाहिजेत."
"कशाबद्दल?"
"विश्वासघात केल्याबद्दल."
"पैशांऐवजी दुसरं काही-"
"-चुंबन चालेल."
"मी देऊ?"
"ओ मिस्टर, तुमचं चुंबन घ्यायला मी म्हणजे काही भलताच वाटलो काय?"
"मग काय हवंय?"
"एकदा सांगितलं ना? चुंबन चालेल. म्हणजे जे चुंबनदृष्य बघायला मिळालं नाही ते दाखवलं तरी चालेल. पण त्यासाठी मी थांबणार नाही."
"दोन शोच्या मधल्या वेळेत कसं दाखवता येईल हो?"
"ती हिरॉईन थिएटरमध्येच बसून असेल ना पुढचा शो सुरु होईपर्यंत? तिला दे म्हणावं. हवंतर हिरोची भूमिका मी..."
"अहो आजोबा, सिनेमा फिल्मवर शूट केलेला असतो. ती हिरॉईन आत्ता या क्षणी स्वित्झर्लंडमध्ये किंवा राजस्थानातही असू शकेल."
"मग मला माझे तिकीटाचे ऐंशी रुपये परत करा."
"ते शक्य नाही."
"का बुवा?"
"म्हणजे असं बघा, ऐंशी रुपयात सोळा चुंबनं होती. म्हणजे एका चुंबनाचे किती झाले?"
"पाच रुपये. तेव्हढं गणित मलापण येतंय रॅंग्लरसाहेब. पण जे दृष्य बघायला मिळालं नाही त्याची किंमत बाकी दृष्यांइतकीच असेल कशावरून?"
"म्हणजे?"
"म्हणजे ते चुंबन चाळीस रुपयांचं नसेल कशावरून?"
"बरं, चाळीस रूपये चालतील तुम्हांला?"
"का? समजा, जे चुकलंय ते चुंबनदृष्य ऐंशी रूपयांचं असून बाकी पंधरा चुंबनं त्यावर फ्री असतील तर?"
"एकावर पंधरा फ्री? काहीतरी लॉजिक लावा आजोबा…"
"लॉजिक लावूनच सांगतोय. एकावर पंधरा फ्री हे बरोबर आहे."
"कसं काय?"
"घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. नायिकेचं एक चुंबन घेतल्यानंतर पुढच्या चुंबनांची किंमत शून्य झाली असणार नाही कशावरून?"
"आजोबा, माझंही एफवायला लॉजिक होतं. किंमत शून्य झाली असेल कशावरून?"
"हे पटवायचा एकच मार्ग आहे- सगळी चुंबनं दाखवायची. तीही आत्ताच. ताबडतोब."
"शक्य नाही."
"मग पैसे परत."
"नाही दिले तर?"
"तर पुढच्या शोच्या वेळी इथं उभं राहून तुमच्या खोटेपणाची जाहीरात करून सगळ्या प्रेक्षकांना पळवून लावेन."
"असं करता येईल तुम्हांला?"
"मला काय ऐरागैरा समजता का? गेल्या आठवड्यात एक सिंह कमी दिसला म्हणून रॅंबो सर्कसला पळवून लावलंय मी. तुम्ही काय चीज आहात?"
"अरे बापरे, तुम्हीच का ते? काका, तुमचे पैसे देऊन टाकतो. हे घ्या ऐंशी रुपये."
"अहो रॅंग्लर, ऐंशी गुणिले त्रेसष्ट किती?"
"ते का?"
"कारण, अशी त्रेसष्ट तिकीटं आहेत माझ्याकडं!"
#नवीउमेद
Hrishikesh Rangnekar

No comments:

Post a Comment