Monday 24 April 2017

सामूहिक शेतीचं तीर्थक्षेत्र - 'आमळी'

धुळे जिल्ह्यातलं आदिवासी गाव - आमळी. पाच पाड्यांनी बनलेली ग्रामपंचायत, चार हजार लोकवस्ती. जिल्हा मुख्यालयापासून तब्बल ९० किलोमीटर दूर. आमळीला जाण्यासाठी नागमोडी रस्ता पार करत ओसाड दिसणाऱ्या डोंगररांगामध्ये शिरावं लागत. 
असं दुर्गम गाव सामूहिक शेतीचं तीर्थक्षेत्रच बनलं आहे. इथल्या बचतगटांचा विकास आणि सामूहिक सेंद्रिय शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी गेल्या बारा वर्षात तब्बल पंधरा हजार लोकांनी आमळीला भेट दिली आहे.
जो इतर आदिवासींचा जीवनसंघर्ष, तोच इथं. मात्र गेल्या बारा वर्षात गावाचं रुपडं बदललं. हे घडवून आणलं भीमराव बोरसे यांनी. फक्त पाचवी शिकलेल्या भीमरावांनी. आपलं गावं समृद्ध करायचं स्वप्न त्यांनी पाहिलं. विविध विकसित गावांना त्यांनी भेटी दिल्या आणि गावाच्या मानवविकासाचा कृती आराखडा डोक्यात पक्का केला. वर्ष होत २००४. 
पहिलं काम, शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्याचं. 'एक काडी भात' पद्धतीने भात लागवड करून यश मिळवलं. आज याच ‘एक काडी भात लागवड पद्धती’चा अवलंब आदिवासी करत आहेत. पुढे उत्पादित माल कवडीमोल भावात विकायचा नाही, हे ठरवलं. राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. आणि गावात उत्पादित झालेला तांदूळ, गहू, नागली, हरभरा, वाटाणा व्यापाऱ्यांना न विकता स्वतः पॅकिंग करून कृषी प्रदर्शनात विकण्याचा संकल्प केला. या कामासाठी महिलांची मदत घेतली गेली. एकेक करून गावात २२ महिला बचत गट सुरु केले गेले. या बचतगटांना उत्पादित शेतमालाचं ग्रेडिंग, पँकिंग करण्याचं प्रशिक्षण दिलं. 

आज सुमारे ३०० आदिवासी महिला या पद्धतीने शेतमाल बाजारात विकत आहेत. यातून १२ लाखांची गंगाजळी आज घडीला या बचतगटांकडे जमा झाली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांसह महिलांचाही आर्थिक स्तर उंचावला. याचं श्रेय भीमरावांनाच. त्यांनी गावातील शेतकऱ्यांना, महिलांना राज्यात, परराज्यात कृषीसहलींना नेऊन कृषीसाक्षर केलं. त्यातून वेगवेगळे प्रयोग केले आणि तोट्यातील शेती नफ्यात आणून गावगाडा रुळावर आणला. 
मग पुरुषांचेही बचतगट तयार केले. गावातील ३५० हून अधिक शेतकरी आता बचतगटात आहेत. हे सर्वजण एकत्र येऊन शेतीचं नियोजन करतात. सामूहिक शेती हे इथलं वैशिष्ट्य. कोण काय पेरणी करेल, सर्वाना किती आणि कोणत्या प्रकारचं बियाणे, खतं लागतील याचा हिशोब केला जातो. सामूहिकपणेच ते खरिदलं जातं. सर्वांनाच सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण मिळाल्याने शेतकरी जीवामृत, गोमूत्र, गांडूळखत तयार करतात. 
भीमरावांनी कृषी विभागाच्या मदतीने सामूहिक शेती अवजार बँक तयार केली आहे. या बँकेतली ४८ अवजारं गरजेप्रमाणे वापरायला मिळतात. त्यासाठीचं मूल्य प्रति दिवस १५ ते ४०० रुपयांपर्यंत आहे. ही रक्कम वर्षाअखेरीस ग्रामविकास संस्थेत जमा केेली जाते. याच संस्थेमार्फत शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांना विकला जातो. विक्रीतून मिळालेल्या नफ्याच्या रकमेतून गरजू शेतकऱ्यांना कर्जवाटप केलं जातं. अवघ्या एक टक्के दराने या शेतकऱ्यांना वर्षभर कर्ज मिळतं. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन खर्च कमी होतो. हातसडीच्या तांदळाचा उत्पादन खर्च ४० रुपये किलो आणि तो विकला जातो ८० रुपये किलोने. यावरून या शेतकऱ्यांच्या अर्थचक्रात झालेला बदल आपल्या लक्षात येईल. 
भीमराव बोरसे यांनी गावात पाणलोट विकासही केला आहे. सेंद्रिय शेती, देशी वाणाचं संवर्धन, समूहशेती यातून निसर्गाची परंपरा कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या या कामामुळे आदिवासी समाज संघटित तर झालाच. आणि स्थलांतर, मुलांची शिक्षणातील गळती कमी होऊन आदिवासी बांधवांचं जीवनमानही उंचावलं आहे.
- प्रशांत परदेशी.

No comments:

Post a Comment