Wednesday 5 April 2017

हॉकर्स ..!



आनंद काकडे. एम कॉम. नोकरीसाठी प्रयत्न केले. पण वशिल्याशिवाय कुठं काही जमेना. एका खासगी कंपनीत महिना सात हजार रूपयांवर काम करू लागला. घरात म्हातारे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार. अहमदरनगरजवळच्या देहरे या गावी त्याचे कुटुंब. त्याची नोकरी पुण्यात. उत्तम शिक्षणामुळे घरातील सर्वांची भिस्त त्याच्यावर आणि मिळकत नसल्याने तो त्रस्त. बाहेर राहून भागायचं नाही. तो देहरेला परतला. कोणीतरी त्याला अहमदनगरच्या बसस्थानकावर गोळ्या-बिस्कीटं विकण्याचा सल्ला दिला. गावा-घराजवळ राहुन चार पैसे मिळतील या आशेने पस्तीशीतल्या आनंदने अंगात खाकी रंगाचं शर्ट चढवलं. वडापाव, पाणी बॉटल, गोळ्या, बिस्कीट... मालक ट्रे मध्ये देईल ते साहित्य दिवसभर नगरच्या बसस्थानकावर बसमागे धावत धावत विकू लागला. यातून त्याला २०० ते ३०० रूपये उरतात. पूर्वीच्या सात हजारांपेक्षा गावात राहून नऊ हजार कमावत असल्याचा आनंद असला तरी, तो समाधानी नाही. नोकरीसाठी प्रयत्न का नाही करत असे विचारले तर तो म्हणतो, "साहेब, माझ्याकडे वशिला नाही. लाच द्यायला लाखो रूपये नाही. मला नोकरी कशी लागेल? प्रयत्न केले पण हतबल झालो. शेवटी हॉकर झालो. पण सरकारने मराठा आरक्षण दिले तर, नक्की नोकरी मिळेल!"
हॉकर्स! ये वडापाववाला, वडापाव लो... पाणी बॉटल, पाणी बॉटल... ऊसाचा ताजा रसवाला.....बस स्थानकात गाडी शिरताच असा एकच गोंगाट करणारे फेरीवाले. गाडीच्या खिडक्यांमधून हे फेरीवाले प्रवाशांना आमच्याकडचेच काही तरी घ्या म्हणून विनवत असतात. काही वर्षांपूर्वी गाडीच्या आत चढून साहित्य विकणारे फेरीवाले आता नियमानुसार गाडीत चढू शकत नाहीत. त्यामुळे बस आली की, त्या मागे धावत जाऊन खिडकीच्या बाहेरून जेवढा धंदा होईल, त्यावर त्यांना समाधान मानावे लागते. 
अहमदनगरच्या स्वस्तिक बसस्थानकात कुतूहल म्हणून या हॉकर्ससोबत संवाद साधला तेव्हा तिथे आनंदची भेट झाली. राजु भंडारे हा चाळीशीतला इसम त्याच्यासमवेत भेटला. त्याची कथा आणखीनच विदारक. दहावीपर्यंत शिकला. गेल्या २० वर्षांपासून तो हॉकर आहे. अहमदनगरला एका झोपडपट्टीत राहतो. घरी खाणारे तोंडे सहा. कमावता हा एकटा. घरच्यांनी लग्नाचा तगादा लावला. पण खाणारं आणखी एक तोंड वाढवून करू काय? असा त्याचा रोखठोक प्रश्न. कमाई कमी असल्याने आता लग्न करायचंच नाही, असा त्याचा निश्चय.
सुनील पवार १५ वर्षांचा मुलगा. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बाजारहिवरं या गावी त्याचे कुटुंबीय राहतात. घरी दोन एकर कोरडवाहू शेती. आई, वडील दोघेही गावात मजुरी करतात. सुनील कधीच शाळेत गेला नाही. गावात हाताला काम नाही म्हणून नगरला आला. गेल्या तीन वर्षांपासून बसस्थानकावर हॉकर काम करतो. सुरेश जगताप हेही १५ वर्षांपासून हॉकर्स आहेत. तेही झोपडपट्टीत राहतात. त्यांची पत्नीही छोटे मोठे कामं करून घराला हातभार लावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. काहीही झाले तरी मुलांना शिकवायचेच असा त्यांचा ठाम निश्चय आहे. 'साहेब, सरकारची काही मदत होईल का, घरकूल मिळण्यासाठी?' हा त्यांचा अंतर्मुख करणारा प्रश्न. शिवम हा बिहारमधून आलेला मुलगा. १२-१३ वर्षांचा असेल. तो वडिलांसोबत मजुरी करतो. नगर बसस्थानकावर मराठी आणि बिहारी हॉकर्सची संख्या अधिक आहे.
बसस्थानकावर परवानाधारक कॅन्टीन चालकाला हॉकर्ससाठी परवाने दिले जातात. जो अधिक साहित्य विकेल त्याला अधिक कमिशन मिळत असल्याने साहजिकच त्यांच्यात विक्रीसाठी, ग्राहक ओढण्यासाठी चढाओढ होते. अनेकदा यातून वादाचे प्रसंगही उद्भवतात. शासनाने फेरीवाल्यांसाठी धोरण ठरवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पावले उचलावी अशी एकमुखी मागणी आनंद, राजु, सुनील, सुरेश या सर्वांनीच केली. 
- नितीन पखाले.

No comments:

Post a Comment