Wednesday 8 May 2019

घड्याळं, आकर्षक तोरणं, झुंबरं, दिवे, नेमप्लेट, मूर्त्या, मोबाइल स्टँड, स्टूल, नेकलेस, शोभेच्या वस्तू

घड्याळं, आकर्षक तोरणं, झुंबरं, दिवे, नेमप्लेट, मूर्त्या, मोबाइल स्टँड, स्टूल, नेकलेस, शोभेच्या वस्तू. खाली फोटोत दिसणाऱ्या या वस्तू गाईच्या शेणापासून तयार केलेल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातलं आमगाव मदनी. इथल्या राधाकृष्ण गोरक्षण केंद्रात त्या तयार झाल्या आहेत . केंद्र सुरू केलंय ४० वर्षांच्या नंदकिशोर किसनराव गावंडे यांनी. गावंडे महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले. सर्वोदय परिवाराशी जोडलेले. वर्ष २००० पासून विविध सामाजिक कार्याशी जोडलेले. महरोगी सेवा संघ, दत्तपूर इथे काही काळ सेवा. २००४-०५ मध्ये गीताईच्या अमृतमहोत्सवानिमित्त 40 जणांसह गीताई प्रचारासाठी राज्यभर सायकल यात्रा. 
 १९६० अखेर भूदान चळवळीत आमगाव मदनी इथं मिळलेली ५ एकर शेतजमीन. या जागेवर सेंद्रिय शेती गावंडे यांनी फुलवली आहे. डोक्यात गांधीजींची १८ रचनात्मक कार्य, स्वप्नातील ग्रामोद्योग. त्यातून वर्ष २००८ मध्ये राधाकृष्ण गोरक्षण केंद्र सुरू झालं. सुरुवातीला ५ गाई होत्या. आता ९० आहेत. गोबर आणि गोमूत्रापासून औषधं, विविध प्रकारच्या १०० वस्तू केंद्र तयार करतं. ४ वर्षांपूर्वी 'ग्रामायण' संस्थेच्या शिबिरात त्यांनी यासाठी प्रशिक्षण घेतलं. मेळघाटातल्या 'महान' संस्थेने १३० मोमेंटोंची ऑर्डर दिली. या पहिल्या ऑर्डरमधूनच ३३,००० रुपये मिळाल्याचं गावंडे सांगतात. गाईच्या दुधापासून खवा, पेढे आणि इतर दुग्धजन्य पदार्थ. नागपूर, पुणे , मुंबई, हैदराबाद या शहरांमध्ये उत्पादनांना मागणी आहे. केंद्रामुळे ६ ग्रामस्थांना रोजगार मिळाला आहे. श्रम करण्याची तयारी असेल तर १० कुटुंब एखाद्या अधिकाऱ्याएवढं या माध्यमातून कमावू शकतील. एवढ्या उत्पन्नाची केंद्राची क्षमता असल्याचं गावंडे सांगतात. पण उत्पन्नापेक्षा महत्त्वाचं आहे ते पुढच्या पिढीचा विचार करून केलेला निसर्गपूरक सर्वांगीण विकास आणि श्रमाला मोल.
गोसंरक्षण आणि त्या माध्यमातून पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती हा आपला उद्देश असल्याचं नंदकिशोर गावंडे सांगतात.
 

- सचिन मात्रे, वर्धा
#नवीउमेद #वर्धा #नागपूर
Sachin Matre
#ग्रामोद्योग #गांधीविचार

No comments:

Post a Comment