Tuesday 21 May 2019

आमच्या पक्षाचा जाहीरनामा... (आखुडबुद्धी बहुशिंगी )


काल हणमंतराव भेटले. त्यांनी आपल्या गप-रे पक्षाचा जाहीरनामा दाखवला. सगळा वाचला नाही, पण एकूणच गप-रेनं किती सूक्ष्म पातळीवर जाऊन काम केलंय हे त्यामुळं लक्षात आलं. त्यातल्या काही कलमांवर चर्चाही झाली आमची.
मी: सर्व पातळीवरील जनतेचं उत्पन्न किमान दहापट वाढावं अशी सोय केली जाईल. हे कसं साधणार?
ह: सगळ्या नोटा दहापट करू आम्ही. म्हणजे, दहा रुपयांची नोट ही शंभरची समजली जाईल, शंभरची हजारांची, आणि हजारची दहा हजारांची. यामुळं प्रत्येकाकडचा पैसा अचानक वाढून तो बाजारात येऊन मार्केट बूस्ट मिळेल.
मी: पण ज्यांना काही उत्पन्नच नाही त्यांनी किंवा ज्यांच्याजवळ पैसेच नाहीत त्यांनी काय करावं?
ह: ज्यांना पैसे कमावणं शक्य नाही यांच्यासाठी आता पैसे विकत घेण्याची सोय असेल. उदाहरणार्थ, शंभरच्या दहा नोटा कोणत्याही सरकारी कार्यालयात अकराशे रुपयांत विकत घेता येतील. त्यामुळं, कमाईचं काहीही साधन नसलेल्या लोकांना पैसे मिळवण्याची संधी मिळेल.
मी: अरे वा, आर्थिक आघाडीवर तुमच्या योजना नामी आहेत. सामाजिक जागृती व्हावी, सलोखा वाढावा यासाठी काही?
ह: आहे ना? सार्वजनिक ठिकाणी मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी लोकांकडून सामुहिक पाढेपठण केलं जाईल. यामुळं, गणिताची आवड जनतेत रूजवली जाईल.
मी: यामुळं सलोखा निर्माण होईल? की दहशत वाढेल? शिवाय, परवाच तुमचे दोन कार्यकर्ते बावीस पंचे किती यावरून मारामारीला उतरले होते. शेवटी दोघंही बरोबर आहेत असा मध्य काढला गेला.
ह: तुमचं बरोबर आहे. एकाच गणिताला अनेक उत्तरं असतात, हे तत्व सर्वांना समजायला थोडा वेळ लागेल. 'गणितता में विविधता' हे आमचं स्लोगन यासाठी जनजागृती करेल.
मी: तुमच्या पक्षात परवाच एका कवयित्रीनं प्रवेश केला असं कळलं. याचा तुमच्या पक्षाच्या लोकप्रियतेवर वाईट परिणाम होईल असं वाटत नाही?
ह: अजिबात नाही. कवयित्रीचा प्रवेश होताच दोन नवगणितवादी भामटे आमचा पक्ष सोडून पळाले हे यश तुम्ही विसरताय. शिवाय, आमच्या पक्षात कवींना आम्ही स्पेशल ड्युटी लावणार आहे.
मी: कवींना कसंकाय कामाला लावणार बुवा?
ह: आम्ही कवितातून गणिताचा प्रचार करणार आहोत. जसं, ही पाढ्यांची कविता ऐका-
दुकानातून आणले पीठमीठमैदा
सात एके सात, सात दुणे चौदा।
आणताआणता भोक पडले पिशवीस
सात त्रिक एकवीस, सात चोक अठ्ठावीस।
मी: (गडबडीनं) अरे वा, कवींना राष्ट्रकार्याला जुंपताय म्हणजे तुम्ही. आणखी काय आहे हो तुमच्या जाहीरनाम्यात?
ह: तसं बरंच काही आहे, पण जागेअभावी आम्ही तो जाहीरनामा निवडणुकीनंतर जाहीर करायचं ठरवलं आहे. सध्यातरी हेच मुख्य मुद्दे आहेत.
मी: परवा तुम्ही कुठं दिसला नाहीत हो, गावी वगैरे गेला होतात की काय?
ह: (घसा खाकरून, अभिमानानं) परवा आमच्या पक्षाचा भव्य मोर्चा कम मेळावा होता.
मी: अरे वा! म्हणजे एफसीरोडवर ट्रॅफिक जॅम झालेला तो तुमच्यामुळंच का? किती लोक होते मेळाव्याला?
ह: लोक तसे बरेच होते. म्हणजे भरपूर होते असं म्हणता येईल.
मी: अंदाजे आकडा सांगता येईल? म्हणजे अगदी जवळपास जाणारा अंदाज असला तरी चालेल…
ह: अंदाजे नाही, पण तसं म्हणायचं तर एक पूर्णांक आठ होते.
मी: (आश्चर्यानं) एक लाख ऐंशी हजार?
ह: नाही हो. एक पूर्णांक आठ नग माणूस.
मी: हे कसं जमवलंय बुवा?
ह: एकतर, एक म्हणजे मी अख्खा होतो. शिवाय माझा मुलगा. त्याचं हाफ तिकीट असतं म्हणून त्याला अर्धं मोजलं.
मी: आणि उरलेले शून्य पूर्णांक तीन?
ह: आमच्या तीन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी होऊन पोलिसयंत्रणेवर ताण पडू नये म्हणून घरी बसून मोर्च्याला नैतिक पाठिंबा दिला होता.
मी: अच्छा! मग मोर्च्यात काय झालं?
ह: काही कलाकारांनी आमच्या पक्षाला मत द्या असं जनतेला आवाहन केलंय, सदाचारी भ्रष्टांना आणि छुप्या दडपशहांना मदत न करता बावळट गणितप्रेमी पक्षाला मत द्या असा काहीसा त्याचा मसुदा होता.
मी: अरे वा! कलाकारांनी पाठिंबा दिलाय तुम्हांला? कोण आहेत?
ह: अहो, बरेचजण आहेत. मला वाटतं किमान सहाशेसातशे प्रसिद्ध लोकांनी सह्या केल्यात.
मी: सहाशेसातशे? नीट बघा, सहासातच असतील. कोणकोण आहेत हे लोक?
ह: बरेच आहेत, आपले ए के हंगल, केष्टो मुखर्जी, आंतोनी झुबीझुरेटा, आर्थर सी क्लार्क, ह्युगो शावेझ या सगळ्यांनी आमच्या पक्षाला पाठिंबा जाहीर केलाय.
मला यात काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, पण 'गप-रे' हे पक्षाचं नाव बघून गप्प बसलो.
- ज्युनिअर ब्रह्मे.

No comments:

Post a Comment