Tuesday 21 May 2019

रामराम मंडळीहो, मी तुमचा सदाआबा.. सदा आबाची ऐका वाणी (भाग क्रमांक १२)



आता पतोर तुमाला दुष्काळाच्या कथा सांगितल्या, आता मी एक मुलाखत घेणारै. ते पत्रकार लोक घेत न्हाईत का तशी. तर सिध्दार्थ पाटील यांना आपण बोलणार हाईत. ते आधुनिक शेतकरी, शिक्षण संस्था चालक अन‌् बॅडमिंटनचे खेळाडू हाईत.
    दुष्काळाची दशा कशी झाली अन‌् लोकाह्यचे कसे हाल होत्यात, त्यावर काय उपाय हाय का? हे आम्ही त्यास्नी ईचारलं.  ते बोलले, ‘यंदा हिवाळ्यापासूनच दुष्काळाची झळ जाणवतेय. सुरुवातीचा जो पाऊस होता, तो फारसा झाला नाही. मराठवाड्यातली शेती परतीच्या पावसावर फार अवलंबून असते, तो पाऊस तर यंदा झालाच नाही. याचा पिकावर फार वाईट परिणाम झाला. विशेषतः कपाशीचे, तुरीचे फार वाईट हाल झाले. तिसऱ्यांदा वेचणीला येणारा कापूस यंदा पहिल्या वेचणीतच संपला. दुसरे उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांकडे राहिले नाही, अशी परिस्थिती या दुष्काळाने निर्माण केली आहे.
शिवाय शेतीसाठी जमिनी कमी राहिल्यात. एका गावामधले बहुतेक शेतकरी ५ एकरापेक्षा कमी जमीन असलेले अल्पभूधारक. पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. पाण्याचे स्रोत दुष्काळामुळे आटले. वारंवार पिक घेण्याच्या पध्दतीमुळे किंवा ज्या पिकांना जास्त पाणी लागतं, अशा पिकांना प्राधान्य दिल्यामुळे जमिनीखालच्या पाण्याची पातळी फार खाली गेली. शेतकऱ्यांचे हाल फार वाईट आहेत. मागच्या पंधरा वर्षांमध्ये कधी गावाकडचे लोक हिवाळ्यात मजुरीसाठी बाहेर पडल्याचं दिसले नव्हते. उन्हाळ्यात रोहयोची कामं सुरू व्हायची आणि त्यासाठी लोक बाहेर पडत असत पण आज हिवाळ्यातच लोक कामाच्या शोधात दारोदार फिरत आहेत.
औरंगाबादेतल्या काही कंपन्यांत या लोकांसाठी आम्ही काही जागा निर्माण केल्या आहेत पण ती व्यवस्था पुरेशी नाही. तीनशे रूपये साडेतीनशे रुपये रोजाने काम करण्यासाठी हे लोक औरंगाबाद एमआयडीसी भागात आश्रयाला आलेतं. या लोकांमध्ये काही बागायतदार शेतकरी तर उरलेले सर्व कोरडवाहू शेतकरी आहेत.
मराठवाड्यात मुळात पीक पध्दतीमध्ये आपण बदल करू शकलो किंवा शेतीवर अवलंबून असलेल्या तोंडांची संख्या कमी करू शकलो तर शेतीमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न घेणे शक्य आहे. पण त्याच्यासाठी पाण्याचे नियोजन फार आवश्यक आहे. लोकांची स्मरणशक्ती फार वाईट आहे. पाण्याच्या अभावी जे हाल होतात, त्यांचा विसर त्यांना पाणी उपलब्ध असताना होतो. पावसानंतर २४ तास तलावावरच्या विहिरीवरच्या मोटारी सुरू असतात. आपल्याला आलेल्या अनुभवातून लोकांनी शिकले पाहिजे, आणि अनुभवांवर आधारित शेतीपद्धत विकसित केली पाहिजे. असं झालं तर मराठवाड्यासारख्या भागात शेती हा व्यवसाय म्हणून फार उत्तमरित्या नसला तर कुटुंब चालेल अशा पद्धतीने करता येईल.
शिवाय शिक्षणक्षेत्रात किती भीषण परिस्थिती आहे याची कल्पना मोठ्या शहरांत राहणाऱ्यांना करता येणार नाही. इथल्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलांना न शिकता डिग्री मिळते. या गोष्टी सगळ्या कॉलेजेसमध्ये चालतात असे मी बिलकूल म्हणणार नाही, पण बऱ्याच छोट्या गावांमध्ये शिक्षणाचे असेच हाल आहेत. म्हणायला डिग्री आहे, पण प्रत्यक्षात शिक्षणच न घेतल्याने त्या डिग्रीचा कोणताही उपयोग होत नाही. नोकरी मिळत नाही.
आता लोक विचारतात दुष्काळावर मात कशी करता येईल, शेतकऱ्यांचे जीवन कसे सुधारता येईल, या सगळ्या लोकांना मी एकच सांगतो, “चांगल्या पध्दतीची शिक्षणपध्दती अस्तित्वात आली पाहिजे. या मुलांना या भयाण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा एकमेव उपाय हा आहे. पुढच्या पन्नास वर्षांत मराठवाड्याचं वाळवंट होईल म्हणतात, मग शेती हे या मुलांचं भविष्य असेल असं कसं म्हणायचं. एका एकरात या मुलांची पिढी कशी टिकणार, भविष्यात या पध्दतीत बदल झाला नाही तर उद्या शेतकरी आत्महत्यांबरोबरच नोकरी न मिळालेली शेतकऱ्यांची मुले जीव देतील अशी भीती वाटते. त्यांना वाचवलं पाहिजे. त्यांना चांगले शिक्षण देऊन शहाणे केले पाहिजे. याची सुरूवात शाळेपासून झाली पाहिजे.” llभाग12ll
(सिध्दार्थ पाटील हे स्वतः शेतकरी आहेत, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कन्नड इथे कॉलेज चालवतात, त्याचप्रमाणे वरिष्ठ वयोगटात बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.)
- भक्ती चपळगांवकर

No comments:

Post a Comment