Tuesday 7 May 2019

मोगरा फुलला, शेतक-यांच्या एकजुटीने दरवळला

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुका. तालुक्यात उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य नेहमीचंच. त्यातून जिल्ह्यात अन्नधान्य, फळं, भाजीपाला यांचं उत्पादन विपुल. त्यामुळे मालाला अपेक्षित भाव मिळणं दुरापास्तच. यावर श्रीमंत आदिवासी सेंद्रिय शेती गटानं उपाय शोधला मोगरा शेतीचा. १५० आदिवासी शेतकऱ्यांचा हा गट. ६ वर्षांपूर्वी स्थापन झालेला. गट हातसडी तांदूळ, ब्राऊन तांदूळ - इंद्रायणी, नागली, गहू, वरई, भगर, कुळीथ , उडीद, डाळ, आंबा सेंद्रिय पद्धतीनं आधीपासून पिकवत होता. पण नफा म्हणावा तसा नाही. 

 

इतर पिकांच्या तुलनेत मोगरा फुलशेती फायदेशीर ठरू शकत असल्याचं गटाच्या लक्षात आलं. मार्गदर्शन लाभलं कृषी विभागाचं. करंजाळी, शिंगदरी जळीतहोडसह आसपासच्या गावातले ३५-४० शेतकरी या प्रयोगात सहभागी झाले. जव्हार भागात मोगरा शेती करतात. तिथं जाऊन गटानं अभ्यास केला. तिथल्या शेतकऱ्यांशी गप्पा झाल्या. शंकानिरसन झालं.
मग गटानं रोपं घेतली. पाण्याच्या उपलबद्धतेनुसार कुणी दोन, कुणी चार तर कुणी सहा गुंठा जागेत २० हजार मोगरा रोपांची लागवड केली. आता गेल्या वर्षभरापासून या भागात मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे.
प्रत्येकाचं क्षेत्र कमी असल्यानं दररोज निघणारा माल अधिक नसतो. तो विक्रीसाठी शहरात नेणं प्रत्येकाला परवडणारं नव्हतं. त्यावर तोडगा एकत्रित विक्रीचा. मध्यवर्ती करंजाळी गावात प्रत्येक शेतकरी आपला माल मोजून गटाकडे जमा करतो. गटातला एक शेतकरी या मोगऱ्याच्या कळ्या शहरात विक्रीसाठी नेतो. बाजारात जो भाव मिळेल त्यानुसार प्रत्येकाला मालाचे पैसे दिले जातात.
''वर्षभरात सलग आठ महिने मोगऱ्याचा हंगाम असतो.'' श्रीमंत शेतकरी गटाचे अध्यक्ष यशवंत गावंडे सांगतात. ''एकदा लागवड केली की मोगऱ्याचं रोप पुढली १० ते १२ वर्ष उत्पादन देतं. लग्नसराई, सणांच्या काळात मागणी वाढून चांगला दर मिळतो. सर्वसाधारणपणे किलोला किमान ३०० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांचाही विश्वास वाढला आहे.

-प्राची उन्मेष, नाशिक

#नवीउमेद #नाशिक #जव्हार

No comments:

Post a Comment