Tuesday 7 May 2019

खिचडीची 'भागवत' कथा



 ''एकदा काही कामानिमित्त रात्री उशीरा बसस्थानकावर गेलो होतो तेव्हा अनेक गरीब, भिकारी लोक तिथं मुक्कामी होते. काहींसोबत मुलंही होती. दिवसभर भीक मागून मिळेल ते खाऊन ते पडले होते. तर काहीजण उपाशीपोटीच झोपले होते असं चौकशीत कळलं अन् तेव्हाच या लोकांना उपाशीपोटी झोपू द्यायचं नाही असं ठरवलं. आणि जून २०१६ पासून रोज रात्री बसस्थानकात खिचडी वाटपाचा उपक्रम सुरु तो आजतागायत सुरु आहे.'' भागवत सानप सांगत होते.
भागवत सानप हे बीड शहरातील हाॅटेल व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातही कार्यरत. सामान्य कुटुंबातील भागवत यांना दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मदत केली. आणि त्यातून त्यांचा हाॅटेल व्यवसाय सुरू झाला. गरीब कुटुंबातून आल्याने त्यांना गरिबीची जाणीव होती. भागवत म्हणतात, "बस स्थानक हे असं ठिकाण आहे जिथं रात्री अनेक भिकारी, गरीब प्रवासी मुक्कामी असतात. यातील बहुतेकजण उपाशीपोटी, अर्धपोटी असतात. ते उपाशी झोपू नयेत यासाठी खिचडी वाटप करण्याचा उपक्रम सुरु आहे."
आपल्या हाॅटेलमधूनच सुमारे दहा ते पंधरा किलो तांदळची खिचडी तयार करून एका जीपधून सानप व त्यांचे सहकारी बसस्थानकात येतात, सोबत शुद्ध पाण्याचे जार आणि कागदी प्लेट आणतात. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत खिचडी संपतेही! रोजच इथं मुक्कामी असलेल्यांना याची सवयच झाली आहे. तीन वर्षांत कोणत्याही कारणाने या उपक्रमाला खंड पडलेला नाही हे विशेष!
भागवत म्हणाले, “खिचडी वाटपाची माहिती मिळाल्यानंतर अनेकांनी आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करण्याची तयारी दर्शवली. या उपक्रमाचे स्वरूप वाढवण्याचे सुचवून मदतीचा हात देण्याचा शब्द दिला. परंतु, मी याला नम्रपणे नकार दिला. जितकी माझी क्षमता आहे तितक्या प्रमाणात हा उपक्रम अखंड सुरू ठेवण्याचा मानस आणि प्रयत्न आहे.” आपल्या क्षमतेपुरतं चांगले काम करण्याचा संदेश देत किमान बसस्थानकावर तरी कुणी उपाशी पोटी झोपू नये यासाठीची ही 'भागवत' कथा अनेकांना प्रेरणादायी ठरावी.
- अमोल मुळे, बीड
#नवीउमेद #बीड
Amol Mule

No comments:

Post a Comment