Tuesday 21 May 2019

लाईट…कॅमेरा … अॅक्शन!


मला स्वत:ला नाटकांची आवड असल्याने जि.प. शाळेत नोकरी करताना हा नाट्यकलेचा आनंद आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळायला हवा असे वाटायचे. त्यामुळे १९९२ सालापासून कल्याणच्या जि.प. शाळा वाहोलीपासून मी बालनाट्यांचं लेखन आणि दिग्दर्शन सुरू केलं. २००६ साली पिसवलीच्या जि.प. शाळेत रूजू झालो. इथंही झाडांना आपले मित्र मानणारे ‘आमचा मित्र’, डोंबारी समाजातील शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची गोष्ट सांगणारे ‘बिऱ्हाड’ ही नाटके विशेष गाजली. ठाण्याचे गडकरी रंगायतन, दादरचे शिवाजी नाट्य मंदिर, तसेच माटुंगा, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई इथल्या नामवंत रंगमंदिरामध्ये गेली १२ वर्षे पिसवलीच्या बालकलाकारांना घेऊन मी वेगवेगळी नाटके सादर करतो आहे.
आम्हांला अनेक पुरस्कारही मिळत होते, मात्र नंतर माझ्या मनात आले की आपली जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुले टीव्हीवर किंवा मोठ्या पडद्यावर का नाही दिसू शकत? त्यांच्यात गुणवत्ता तर आहेच, पण त्यांना तशी संधी कोण देणार? ही संधी कोणाकडून मिळेल याची वाट न पाहता आपणच ती संधी निर्माण केली पाहिजे, हे जाणविलं. ऑडिओ- व्हिज्युअल मीडियात काम करायचं तर आधी त्याचं प्राथमिक ज्ञान हवं म्हणून, मी मुंबईत कुर्ला येथे एका खाजगी संस्थेत फिल्म मेकिंगचा सहा महिन्यांचा पार्टटाईम कोर्स केला.
हा कोर्स झाल्यानंतर मला आत्मविश्वास आला की, आपण लघुपट निर्मिती करू शकतो. इच्छा तर खूप दांडगी होती, पण लघुपट बनविणं मोठ्या खर्चाचे होतं. माझ्या स्वकमाईतील दीड ते दोन लाख रुपये मी या लघुपटासाठी खर्च करण्यास तयार झालो, शिवाय काही सहकारी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनीही आर्थिक मदतीची तयारी दाखविली. मग मुद्दा आला कथेचा- त्यावेळी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड या विषयावर सरकारतर्फे बरीच जनजागृती होत होती. तोच विषय मध्यवर्ती धरून लघुपट निर्मिती करायचे मी निश्चित केले, मी त्याची प्राथमिक पटकथा लिहून शाळेतील विद्यार्थ्यांना परिपाठादरम्यान ऐकविली. मुलं कथेवर जाम खूश होती.
शाळेला प्रोत्साहन म्हणून सधन ग्रामस्थांनी सुमारे दीड- दोन लाखांची एकत्रित मदत द्यायचं ठरवलं आणि मग आम्ही वेगाने कामाला लागलो. या लघुपटात पिसवलीचे विद्यार्थी आणि शिक्षकही काम करणार होते. कॅमेरापर्सन गावात आले, चित्रीकरणासाठी लाईट आणि ट्रॉली फिरू लागली आणि संपूर्ण पिसवली आमच्या पहिल्या ‘धुळवड’ लघुपटासाठी उत्साहाने कामाला लागले. २०११ साली आमचा हा लघुपट सर्वांच्या समोर आला ज्याची कथा धुळवडीच्या वेळी प्लॅस्टिकच्या फुग्यांनी कसे नुकसान होते हे सांगणारी आणि पर्यावरणपूरक होळी तसेच धुळवडीचे महत्त्व पटविणारी होती.
या चित्रपटाची आम्ही डीव्हीडी तयार केली आणि आजूबाजूच्या शाळांमध्ये दाखवू लागलो. या लघुपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. आवर्जून सांगायला हवं की आमच्या पिसवली शाळेतही हा लघुपट बनविण्याच्या कितीतरी आधीपासून आम्ही पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करीत आहोत. आणि या लघुपटाचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या अनेक शाळांतही पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड सुरू झाली. या लघुपटानंतर 'आम्ही फुले बोलतोय', ‘बंधारा’, ‘माझ्या गुरूजींची गाडी’ असे अनेक लघुपट आम्ही तयार केले असून त्याला आजवर बरीच पारितोषिकेही मिळाली आहेत.
पिसवली शाळेच्या अन्य लघुपटांविषयी जाणून घेण्यासाठी क्लीक करा: https://bit.ly/2WIoZtp

- अजय लिंबाजी पाटील, पदवीधर शिक्षक जि.प.शाळा पिसवली, कल्याण- ठाणे.
 

No comments:

Post a Comment