Tuesday 21 May 2019

खारीएवढे योगदान आपणालाही देता आले, हीच समाधानाची बाब

गेली ९ वर्ष मी वृत्तपत्रात काम करतो आहे. वाचनाची प्रचंड आवड. भेळ, वडापावसह आलेल्या कागदावर काय मजकूर आहे, तो कागद कुठल्या दैनिकाचा आहे, हे पाहणंही न सोडणारा मी. दीड वर्षांपूर्वी कार्यालयातील सहकाऱ्यांसह अक्षरांच्या दुनियेत फेसबुक, ट्विटर या समाजमाध्यमांमुळे काय बदल होत आहेत, दैनिक, नियतकालिकं या तंत्रज्ञानाचा कसा वापर करत आहेत, याबाबत चर्चा करत असताना ‘नवी उमेद’ या फेसबुक पेजचं नाव निघालं.
उत्सुकतेपोटी लगोलग हे पेज शोधलं, थोडसं स्क्रोल केलं. या ठिकाणी अनेक उमेदकथा दिसल्या. त्याही अस्सल! सभोवतालच्या. या कथा ज्या व्यक्तींभोवती, संस्थांभोवती गुंफलेल्या होत्या, त्या होत्या, काहीतरी वेगळेपण असलेल्या, आपल्या कृतीने, उपक्रमाने समाजाला दिशा देणाऱ्या. विशेष म्हणजे या कथा वाचणारे, लिहिणारे, लाईक, कमेंट आणि शेअर करणारे हे केवळ चांदा ते बांदा पुरते मर्यादित नव्हते. ते सबंध जगभर विखुरलेले दिसले. नवी उमेद कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेतलं.
ज्या ‘संपर्क’ संस्थेद्वारे ‘नवी उमेद’ ही कल्पना पुढे आली, त्या ‘संपर्क’चे ‘केल्याने होत आहे, आधी संपर्क पाहिजे’ हे ब्रीदवाक्यचं बरंच काही सांगून गेलं.
मग आपणही काही उमेदकथा लिहीत सामाजिक बदलाचा भाग व्हायला पाहिजे, अशी इच्छा झाली. त्या आधी बरेच सहकारी नवी उमेदसाठी लिहीत होतेच. मग काय, ३ एप्रिल २०१८ रोजी पहिली उमेदकथा लिहिली. ती होती मंटो, सेक्रेड गेम्समध्ये वेधक भूमिका निभावणाऱ्या मराठमोळ्या राजश्री देशपांडेच्या जलसंधारणविषयक कामाची. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजश्रीच्या कामाचं अनेक ठिकाणी कौतुक झालं, काहींनी या कामातून प्रेरणा घेत स्वतःही श्रमदान केलं. या नंतरही अनेक कथा लिहिता आल्या, राज्यातील विशेषत्वाने मराठवाड्यातील दुष्काळ झळांवर ‘सदा आबा’ या ऊसतोड कामगाराच्या नजरेतून पाहता आलं. या सर्व कथांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून सांगता येतं की, समाजमाध्यमांचा जनमानसावर आज मोठा पगडा आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान विकसित झालं, माहितीची साधनं बदलली, जग हातात आलं. या संक्रमणावस्थेतही सामाजिक भान जागवणाऱ्या अन लोकशिक्षण करणाऱ्या माध्यमांची जबाबदारी उत्तरोत्तर वाढत आहे, ती ‘नवी उमेद’ कसोशीने निभावत आहे. यात खारीएवढे योगदान आपणालाही देता आले, हीच समाधानाची बाब.


- अनंत वैद्य, बीड.
 #नवीउमेदतिसरावर्धापनदिन

No comments:

Post a Comment