Tuesday 21 May 2019

आमचा नवा पक्ष... (आखुडबुद्धी बहुशिंगी)

"राजकारणाचं गणित बहुसंख्य लोकांना समजत नाही कारण तो निव्वळ आकड्यांचा खेळ असतो."
- तिम-अल-बख्तून (साडेबाराव्या शतकातला प्रसिद्ध अरब तत्त्ववेत्ता)
कुठंतरी हे वाक्य वाचलं आणि मग अनेक लोक राजकारणापासून दूर का पळतात, हे कळलं. आधी, आपल्या इथं लोकांना साधं गणित समजायची मारामार, त्यात हे राजकारणाचं क्लिष्ट गणित कसं समजणार बुवा? परवाच, मी आमच्या पानवाल्याला x= x+1 हे बाळबोध समीकरण समजावून सांगत होतो. सुमारे अर्धा तास शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला, "म्हणजे, एक एक्स गेली की दुसरी मिळते. बरोबर ना साहेब?" गणितीय जगाकडं खेचून नेलं तरी, काहीजण भौतिक जग सोडायला तयार नसतात. माझ्या चेहऱ्यावर राग दिसताच भेदरून त्यानं माझ्याकडून सिगारेटचे पैसे घेतले नाहीत.
या सगळ्याला पर्याय काय, असा गहन प्रश्न पडला होता. नुकतंच, हे गणित सुटलं. आमचे मित्र हणमंत खंचनाळे यांनी एक राष्ट्रीय पक्ष स्थापन केलाय. पक्षाचं नाव आहे "गणित पक्ष-रेनेदेकार्तवादी", अर्थात 'गप-रे'!
याबद्दल अधिक माहिती मिळवायला हणमंतरावांशी (दोन हात अंतर ठेवून) गप्पा मारल्या-
मी: तर हणमंतराव, तुमच्या पक्षाची ध्येयधोरणं काय असतील?
ह: तशी सोपी असतील. आमचं पहिलं ध्येय म्हणजे आकड्यांचा खेळ करून सत्ता मिळवायची. अर्थात, आमच्यासाठी हा अगदीच पोरखेळ आहे. कारण, आमचे ∞+1 कार्यकर्ते सगळ्या मतदानकेंद्रांवर सकाळी मत द्यायला जातील. संध्याकाळचे पाच वाजले तर, आमचं मत देऊन संपणार नाही. आणि अशी ∞ मतदानकेंद्रं असतील तर...
मी: हो हो, तसं सोप्पं काम आहे हे.
ह: आणि एकदा का आमचा पक्ष सत्तेत आला की, मग आम्ही आमच्या गणिताचा प्रसार देशभर आणि पर्यायानं जगभर करू. बाहीवर दुहेरी भागाकाराचं चिन्ह असलेला युनिफॉर्म ल्यालेले आमच्या एमएम संघटनेचे....
मी: ही एमएम काय भानगड आहे?
ह: एमएम म्हणजे मॅथ्स मॅनिॲक. गणिताची आवड असलेल्या लोकांची छुपी संघटना आहे आमची. तर, आमचे कार्यकर्ते चौकाचौकात उभे असतील. केवळ सत्तावीसचा पाढा येत नाही, या संशयावरून हजारोंची धरपकड होईल. गणितात ढ असलेल्या लोकांना शून्य आकडा असलेला बॅज वापरावा लागेल. तीन महिन्यांच्या बाळापासून ते नव्वद वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनी, रोज किमान वीस गणितं सोडवून देशोन्नतीच्या कार्यात आपला वाटा उचलावा असं आवाहन....
मी: आवाहन?
ह: म्हणजेच थोडक्यात सक्ती हो. इतकंच नव्हे, तर सर्व नागरिकांची वर्षातून एकदा गणिताची परीक्षा घेतली जाईल. नापास विद्यार्थ्यांना आम्ही सायबेरीयाला पाठवू.
मी: अहो, पण सायबेरीया तर रशियात आहे ना?
ह: (गडबडून) अं अं, आम्ही त्यांना राजस्थानच्या वाळवंटात पाठवू.
मी: पण या सगळ्याचा उपयोग काय होणार?
ह: काय होणार म्हणजे? अख्खी गणितज्ञ पिढी तयार होईल. भाजीबाजारात गेलात तर, सतरा रुपये किलोनं वांगी सव्वातीनशे ग्रॅम, तेवीस रुपये किलोनं भेंडी सव्वा किलो आणि नऊ रुपयांची कोथंबिरीची पेंडी हा हिशेब कॅल्क्युलेटरशिवाय अर्ध्या मिनिटांत करतील लोक. '१३ मेरा ७' सारखे किरकोळ विनोद न करता '70-80-82' असे मोठे....
मी: सेवंटीएटीएटीटू हासुद्धा पीजेच आहे ना पण?
ह: (चिडून) पण किमान आकडा मोठा आहे, हे तरी मान्य कराल ना? जरा मोठी स्वप्नं बघायला शिका. माझं एक स्वप्न आहे....
(इथं मला उगाच मार्टीन ल्यूथर किंगची आठवण आली.)
"होय, माझं एक स्वप्न आहे. त्या स्वप्नात लोक बीजगणित आणि भूमितीचा अभ्यास करतायत. आमच्या देशात लोक नावानं ओळखले न जाता, केवळ एक आकडा म्हणून ओळखले जातायल. लोकांत विषमता नाही, आहेत ते फक्त सम आणि विषम आकडे…
मी: पुरे पुरे. पण हे सगळं करायला कार्यकर्ते आणणार तरी कुठून? असं ऐकलंय की, हल्ली सतरंजी उचलायलाही लोक मिळत नाहीयेत.
ह: आमच्या पक्षात प्रवेश घेणं अतिशय सोप्पं असेल. १२४९६ पर्यंतच्या सगळ्या अंकांपर्यंतचं चौथं मूळ पाठ असलेला कोणीही गप-रेमध्ये येऊ शकतो.
मी: पण कसा?
ह: आमच्या पक्षाच्या रजिस्ट्रेशन नंबरवर कॉल करून.
मी: इतकं सोप्पं?
ह: हो. तुम्ही कॉल केलात की, एक ओटीपी येतो. तो ओटीपी तुम्हांला मिळाल्यावर सहा सेकंदात सांगून रजिस्टर करावा लागतो. सहा सेकंदानंतर तो एक्सपायर होतो.
मी: ओटीपी किती वेळात येतो?
ह: येत्या बत्तीस वर्षात कधीही!
- ज्युनिअर ब्रह्मे

No comments:

Post a Comment