Wednesday 8 May 2019

इथे आजीआजोबांचा सांभाळ होतो


कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. आश्रमात आज स्नेहमीलन होतं. आजच नाही तर गेल्या १०-१५ दिवसांपासून ही लगबग सुरू आहे रामकृष्ण निकेतनमध्ये. जेवणाचा बेत काय ?भजन कोण करणार ? गाणं कोण गाणार? नवीन पनवेलच्या पुढे माथेरान- नेरे मार्गावर शांतिवनचा निसर्गरम्य परिसर. तिथे हा वृद्धाश्रम.
१९९० मध्ये एका खोलीत सुरू झालेला हा वृद्धाश्रम आज २० खोल्यांचा आहे. १०० माणसं बसू शकतील एवढया क्षमतेचा कम्युनिटी हॉल. नितीनभाई खंबाटा आणि प्रकाशभाई मोहाडीकर यांचा आश्रमाच्या उभारणीत बहुमोल वाटा.
४० आजीआजोबा इथे राहतात. प्रत्येकाची इथे येण्यामागची कारणं वेगवेगळी. पण त्याचा बाऊ करायचा नाही असं सर्वांनी ठरवलं आहे. आश्रमातलं वातावरणही तसंच. सणवार आणि इतर निमित्तानं होणारे कार्यक्रम, पेपरवाचन, व्यायाम, गप्पाटप्पा, थोडा टीव्ही, साजूक तुपासह वेळच्यावेळी उत्तम घरगुती आहार, आठवड्याला येणारे डॉक्टर, मनापासून सेवा करणारे कर्मचारी, प्रेमानं न आपुलकीनं सर्वांची काळजी घेणाऱ्या व्यवस्थापक शरयूताई.
"संस्थेला वृद्धाश्रमाची संकल्पनाच खरं तर मान्य नाही."शरयूताई सांगतात. "वृद्धांनी कायमस्वरूपी आश्रमात राहावं,हा संस्थेचा हेतू नाही. त्यांच्या आयुष्यात आनंद फुलावा, शांतपणे निसर्गाच्या सानिध्यात त्यांना राहता यावं, या दृष्टीनं प्रयत्न सुरू असतात." शरयूताई मुंबई महानगरपालिकेतल्या निवृत्त शिक्षिका. 32 वर्ष शिक्षकी पेशा न विविध सामाजिक कामांशी जोडलेल्या. स्वयंसेवक म्हणून इथं यायला सुरुवात केली आणि त्या इथल्याच होऊन गेल्या.
संस्थेच्या कामाचं उदाहरण द्यायचं झालं तर पतीच्या निधनानंतर एका आजींना नैराश्यानं ग्रासलं होतं. त्या इथं आल्या. आश्रमात होणारे विविध कार्यक्रम, समवयस्क सोबत्यांचा सहवास, नात्यागोत्याचे नसूनही गप्पा मारायला, हवंनको बघायला येणारी स्वयंसेवक मंडळी, यामुळे काही दिवसातच त्यांना नवी उमेद मिळाली आणि नव्या उभारीनं त्या घरी गेल्या.
वृद्धांच्या सोयीसाठी, आनंदासाठी अजून काय करता येईल, याचा सतत विचार शरयूताई, मीराताई लाड, विद्याताई साळवे आणि विष्णू प्रभुदेसाई करत असतात. आश्रमात राहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारलं जातं मात्र दात्यांच्या देणगीवरच प्रामुख्यानं आश्रम चालत आहे.

- मेघना धर्मेश

#नवीउमेद #रायगड #मुंबई

No comments:

Post a Comment