Wednesday 8 May 2019

लोकांची गरज, शेतकऱ्यांना भाव आणि ३०-४० जणांना रोजगार

बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका. इथल्या खाकळवाडीतले ईश्वर काशिनाथ शिंगटे. शिक्षण बी कॉम. वडील शेतकरी. वर्ष २००० पासून वेगवेगळ्या नोकऱ्या. गुरांच्या छावणीत कडबाकुट्टी यंत्र चालवणं, पिंपरी -चिंचवडमधल्या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी प्रयत्न. मॅग्नेटिक बेल्ट विकण्यासारखं फिरस्तीचं काम, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन , मग कंपन्यांना लागणारं साहित्य पुरवण्याचा व्यवसाय आणि या दरम्यान भेटलेले महादेव बिरंगळ आणि सुलतान बेग हे मित्र. 
शहरात वेगवेगळी कामं करताना नोकरदार वर्गाकडून रेडिमेड आटा आणि धान्याला मागणी असल्याचं शिंगटे यांच्या लक्षात आलं. वर्ष २०१३. तिघा मित्रांनी मिळून आष्टी एमआयडीसी परिसरात ग्लोबल ऍग्रो इंडस्ट्रीज सुरू केली. काही प्रमाणात भागीदारीतून पैसा उभा करून आणि थोडं कर्ज घेऊन व्यवसाय सुरू झाला.
दैनंदिन ६० टन धान्य ग्रेडिंग आणि पॅकिंगची क्षमता असलेला व्यवसाय. शासकीय धान्य विभाग आणि शेतकऱ्यांकडून थेट धान्य खरेदी. त्यावर प्रक्रिया, प्रतवारी करून पिशवीबंद स्वरूपात या धान्याची बाजारपेठेत विक्री केली जाते. बाजारपेठेची गरज ओळखून ५ किलो, १० किलो, २५ किलो, ५० किलो अशा स्वरूपात कणकेची पोती तयार केली जातात. त्याचप्रमाणे रवा, मैदा, लापशी, भरड आणि पशुखाद्यदेखील तयार केलं जातं. यातून ३० ते ४० जणांना रोजगार मिळाला आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल ६ ते ७ कोटी आहे.
लोकांच्या गरजा लक्षात घेऊन व्यवसायाची उभारणी केली तर त्यात यश मिळू शकतं. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा यासाठी व्यवसायाची उभारणी जाणीवपूर्वक आष्टीमध्ये केल्याचं शिंगटे सांगतात.


-राजेश राऊत, बीड

#नवीउमेद #बीड

 

No comments:

Post a Comment