Wednesday 8 May 2019

पाणी मिळेना, पंधरा दिवसाला आंघोळ, पातळ भाजी आहारातून बाद..सदा आबाची ऐका वाणी...(भाग १०)

बरं हाईत का मंडळी? काय म्हणतोय दुष्काळ तुमच्याहिकडं. बेक्कार हाय ना. पर इकड नंदुरबारचा एक दोस्त भेटला. किंचक अण्णा नाव त्याचं. त्याला सांगितली बीडची दुष्काळ गाथा. तवा त्यो मला बोलला, ‘आरं सदाआबा तुमच कायचं नाय. आम्ही तर लयं हालत काढत हाओत.’
मी ईचारलं कसं? तर त्यान डोळ्यात पाणी आणून सांगितल सातपुड्याच्या डोंगर रांगात दडलेलं भयाण वास्तव.
तर एैका, किंचक अण्णा ह्यो धडगाव तालुक्यातील तिनसमाळ गावचा. या गावात लोकास्नी पाण्याची किम्मत सोन्यापरीस भारी झालीयं. एक-एका थेंबासाठी आमच्या मायबहिणी जीव मुठीत घेऊन नागमोडी घाटातून उतरुन एका झऱ्यातून पाणी आणत्याती. पाय सटकला तर ८०० मीटर दरीत पडायचं काम हाये.
किंचक अण्णा बोलला, ‘पाणी नसलेल्या आमा लोकास्नी खाटपाणी घाटातील झरा देवावानी ठरतोय. मरण वाटेवरुन जीव धोक्यात घालत माय माऊली हंडा घेऊन उतरतेय. दीडशे मीटर घाट उतरताच हा झरा लागतूया. इथं मध्यरात्री एक वाजेपासून बाया हंडा घेऊन नंबर लावत्याती.
सलाईनप्रमाणं एक एक थेंब पडतो, अन‌् कसानुसा हंडा भरतो. तोवर बाकीच्या माऊली बसत्याती वाट बघत. घरी लेकर आईविना रडत्यात.

जिथं ह्यो झरा आहे, तिद जाण्यासाठी रस्ता नाय. फकस्त कच्ची पायवाट आहे अन‌् तोल गेला की मरण गाठलचं म्हणायचं. आतापस्तुर ७ जण इथून पडून जखमी झाले हाईत. ईशेष मणजे पाणी भरताना रानटी जनावराचाबी धोका व्हतो. एकबारीस पाणी भरतांनी एका बाईस्नी अस्वलानं आणि एका पोऱ्याला बिबट्यांने ठार केल हाये. लई वंगाळ परिस्थिती हाये. इशेष म्हणजे आमच्या हिकड ना नळ योजना हाये, ना बोअर, विहिरी, हातपंप. लई अवघड दिसं काढत्यात सारी. केवळ आमचा ह्यो झराच तहान भागितो हाये.
या गावात दर रुतुला पाण्याची तऱ्हा बदलते. थंडीच्या दिसांत खाटपाणीचा झरा कामाला यतो. उन्हाळ्यात नर्मदाचं पाणी आन‌् पावसाळ्यात छतावरील पाणीच आमचा आधार. हजारो वरिस पहिले जसी गत होती तशीच आजबी आम्हा आदिवाशींची.
पाणी नाही आम्ही आंघोळ पंधरा दिसाला करतो, त्यामुळे अनेकास्नी त्वचा रोग झालेती. शिवाय तुम्ही म्हणसाल ह्यो काय खोट सांगतो. पर खरचं पातळ भाजी बी पंधरा दिसातन खातू आम्ही. पाणी नसल्यानं.
लई बेक्कार हाये. आमच्याकड आमदार, खासदार यांच तर लक्षच जात नाई. अन‌् अधिकारीबी फिरकत नाईत. जिथ पाणीच नाही तिद शिक्षण, आरोग्य, वीज, रस्त्याच काय असलं? तुमास्नी सांगतो मी व महे दोन भाऊ पाणी भरतांना दरीत पडलेतो. लई लागलं पर काय करता, बसून चालायचं नाही, लेकरास्नी पाणी कोण पाजील...’
किंचक अण्णाचं ह्ये कथनं ऐकलं अन‌् सदाआबा गप गुमान ढगाकडं बघत रायला....

- कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment