Wednesday 8 May 2019

यंत्रणेचे दुर्लक्ष, नंदुरबारचा ग्रामीण भाग पडतोय ओस... सदा आबाची ऐका वाणी...(भाग क्रमांक ९)

उन्ह वाढतयं, तस पाणी संपत जातयं. परिस्थिती गंभीर हाये. आता कारखाने बी बंद हुत आलेती. आम्ही काही दिवसांत पुन्हा मोक्कार हुणार हौत. आमचे हाल तर तुमाला माहितीत. आता नंदूरबारच्या पोराबाळांच सांगतो. तुम्ही म्हणसाल ह्याे सदा आबा कायम दु:ख सांगतो. परं हे खरं हाय, आणि सांगायला पाहिजेय...
नंदुरबार जिल्हा, आमच्या बीडप्रमाणेच ईकासाचा भुकेला. काम धंदा नसल्याने इथनं दरसाली पोटापाण्यासाठी बिऱ्हाडाचे बिऱ्हाडं गाव सोडतात. औंदा तर गाव सोडणाऱ्यांच प्रमाण दुप्पट हाये. मायबापासह पोर, बाळ जात असल्यानं या मुलांच शिक्षण सुटलं. प्रश्न आता गंभीर झालाये. मात्र, अधिकारी, स्थानिक नेते मंडळी मातुर इकडं बघनातं. गावची गाव ओस पडत्याती तरी बी यंत्रणेला त्याच काय बी गांभीर्य नाय. 
तुम्हाला सांगतो ती बी शासकीय आकडेवारीनुसारच. दर साली ४० ते ५० हजार बिऱ्हाडं कामासाठी सौराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणीला जात्याती. औंदा हे प्रमाण वाढल. उसतोडीशिवाय दुसरंबी काय काम मिळत का हे लोक पाहत हाईत. धडगाव, अक्कलकुवा, शहाद्यातून दररोज हजारो लोक गाव सोडत्यात. त्यांच्याबर त्यांची लेकरी बी जात्यात. या पोरांच्या शिक्षणाचे काय हुणार? शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कागदावर होतं अन‌् हंगामी शाळा कागदावर चालत्यात, अस मी नाही खुद्द इथले झेडपी मेंबरच म्हणतात, तर मंग बघा काय स्थिती असेल.
औंदा तर २ हजार ७५४ विद्यार्थ्यांच स्थलांतर झालंय. बघाना भारताचं भवितव्य. शाळा सोडून कारखान्यावर. कोण बघणार याकडे?
‘शिक्षणाचा हक्क’, ‘शिक्षण हमी कार्ड’ हे शबुद तर बोलण्यासबी अवघड हाईत. अन‌् खर सांगू खरे करण्यासबी तेवढेच अवघड. हे कोण रोखलं. लई वाईट वाटत जवा एखाद्यास्नी केवळ पोटासाठी गाव सोडायची येळ येते. आज नाही पर उद्या तरी ही परिस्थिती बदलली पाईजे. नंदूरबारलाच ह्या हातांना काम मिळालं पाईजे...
तस व्हईल, हीच ह्या सदाआबाची इच्छा हाय... 

- रूपेश जाधव, नंदूरबार

No comments:

Post a Comment