Tuesday 21 May 2019

आधुनिक सावित्री


प्रथमेश आणि सोनाली डांगे हे हातखंबा, डांगेवाडीत राहतात. एकाच वाडीत असल्याने पूर्वीपासून एकमेकांचा परिचय होता. दोघं खूप चांगले मित्र. सोनालीला नर्सिंग प्रवेशासाठी पैशाची गरज होती. सोनालीने आपली समस्या घरच्यांबरोबर प्रथमेशलाही सांगितली. सोनालीच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक. फी भरणं अशक्यच होतं. म्हणून प्रथमेशने आपले दागिने विकून तिची फी भरली. इतकेच नव्हे, तो दर महिन्याला तिला खर्चासाठीही पैसे देत होता. आपलं शिक्षण केवळ पैसे नसल्यामुळे अडलं होतं, त्यावेळी प्रथमेशच्या मदतीनेच आपण शिक्षण पूर्ण करू शकलो, ही भावना सोनालीच्या मनात सतत असायचीच.
दरम्यान, प्रथमेशला कॅन्सर झाल्याचं तिला कळलं. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. अवघ्या 20 व्या वर्षी कॅन्सर. प्रथमेश पूर्णपणे खचून गेला होता. तणावाखाली असलेल्या मित्राला प्रेमाची सावली द्यावी, या भावनेतून सोनालीने प्रथमेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली म्हणते, “ 25 जून 2018 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. या दिवसापासून प्रथमेशला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मी दृढ निश्चय केला होता. माझ्या आईवडिलांनी नेहमी मला दुसऱ्यांना मदत करण्याचे संस्कार दिल्याने मी हा निर्णय घेऊ शकले."
आजही, प्रथमेशवर उपचार सुरू असून एका कार्यालयात तो अकाऊंट विभागात नोकरी करतो आहे. तर, सोनाली नगरपरिषदेत आरोग्यसेविका म्हणून काम करत आहे.
कॅन्सरबाबत आजही अनेक समज-गैरसमज आहेत. खरंतर, कॅन्सरग्रस्त रूग्णांना भक्कम पाठिंबा आणि आधाराची गरज असते. प्रथमेशच्या घरच्यांनी त्याला साथ दिली दि्ली. आणि त्याला नैराश्यातून बाहेर काढण्याची मोठी कामगिरी सोनालीने केली. त्यामुळेच आज प्रथमेश चांगल्यापैकी स्थिर झाला आहे.
“प्रथमेशवर उपचार सुरू होते, तेव्हा त्याच्या यातना मला चांगल्या प्रकारे कळत होत्या. मी केवळ मैत्रीण म्हणून नव्हे, तर एक नर्स असल्यानेही त्या वेदना जाणवत होत्या. अशा वेळी माणसाला वैद्यकीय उपचाराबरोबर प्रेमाचीही गरज असते. आज ना उद्या प्रथमेश पूर्णपणे बरा होईल याची मला खात्री आहे. त्याची जगण्याची उमेद आता दुपटीने वाढली आहे. सासू-सासरे मार्गदर्शक म्हणून उभे राहिले आहेत," सोनाली सांगते.
गावात आणि हातखंबा पंचक्रोशीत सोनालीची ओळख आधुनिक सावित्री अशी झाली आहे. पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणणारी ती पुराणकथेतली सावित्री सोनालीच्या रूपाने आजच्या काळात अवतरली आहे जणू. प्रथमेश-सोनाली. परस्परांवर निस्सीम प्रेम करणारं जोडपं. त्यांचं उदाहरण सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचं डांगेवाडीतील त्यांचे नातेवाईक सांगतात.

- जान्हवी पाटील, रत्नागिरी
 

No comments:

Post a Comment