Tuesday 21 May 2019

गोष्ट आशाताईंच्या शाळेची

 जिल्हा धुळे. तालुका शिरपूर. इथलं थाळनेर गाव. या छोट्याशा गावात गरीब कुटुंबात जन्मलेल्या आशा पाटील. शिक्षण बारावीपर्यंत झालेलं. लग्न, गरिबीचाच संसार सुरू होता. अल्पशा आजाराने पतीचं निधन झालं. तरीही, स्वतःचं दुःख बाजूला सारत त्यांनी समाजातील दुर्लक्षित माणसांसाठी काम सुरू केलं. त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आदिवासी रुग्णांना औषधोपचारासाठी शासकीय योजनांमधून मदत मिळवून देत असतानाच मूकबधीर विद्यार्थ्यांशी त्यांचा संपर्क झाला. आणि आशाताईंचं ममत्व जागं झालं. आईविना गेलेल्या बालपणामुळे जाणवलेली पोकळी भरून काढता येईल, अपुरं राहून गेलेलं शिक्षिकेचं स्वप्न या मुलांमधून पूर्ण करता येईल, असं वाटलं. या मुलांसाठी काहीतरी करायला हवं, हा विचार सुरू झाला. 
प्रथम लगतच्या आदिवासी पाड्यात अशा मुलांचं सर्वेक्षण केलं. मुळातच गरिबी, त्यात अशिक्षितपणा, अंधश्रद्धा. मूकबधीर बालक जन्माला येणं, म्हणजे मोठा अपराध वाटायचा. अशा पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी तयार करणं, हे मोठं आव्हानच होतं. स्वतःची साठवलेली थोडीफार मिळकत आणि देणगीदारांचं सहकार्य या बळावर आशा यांनी 2005 मध्ये गावातच भाड्याच्या खोलीत ‘सावित्रीबाई फुले निवासी मूकबधीर विद्यालय’ सुरू केलं. विनाअनुदानित असल्याने पूर्णतः लोकांच्या मदतीवर सुरू असलेलं हे विद्यालय. मुलाचं दोन्ही वेळचं जेवण, शैक्षणिक, कपड्यांचा खर्च यासह अन्य गरजा पूर्ण करण्याचा प्रश्न उभा राहायचा. सकाळीच घरातून बाहेर पडून कोणीतरी मुलांना मदत करेल, याचा शोध सुरू करायचा. गावात कोणाचा वाढदिवस, पुण्यस्मरण या निमित्ताने मुलांना जेवण मिळेल ही आस आशाताईंना वाटत राहायची. सणासुदीला अवास्तव खर्च करण्याऐवजी आमच्या मुलांसाठी दान, प्रासंगिक दान द्या अशी विनंती त्या लोकांना करायच्या.
आशाताईंच्या अथक प्रयत्नांमुळे आज बारा वर्षात विद्यालयातील एकही विद्यार्थी कधी उपाशी राहिला नाही. या मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबनाचे धडेही दिले. सातवीपर्यंतच्या या शाळेतून आजपर्यंत दीड हजार मुलं शिकून बाहेर पडली आहेत. आज याच शाळेत शिकून स्वावलंबी झालेली मुलं आशाताईंसाठी मदतीचा हात पुढं करत आहेत. शिक्षणाबरोबरच रोजगारकौशल्य मिळाल्यामुळे ही मुलं चांगली नोकरी मिळवून स्थिरस्थावर झाली आहेत.
आशाताई सांगतात, “मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं तर, त्यांच्या पालकांना हे पटवून देणं अवघड असतं. गरीब मागासवर्गीय वस्तीत जन्माला आलेल्या या मुलांना शिक्षण मिळत आहे याचा मला आनंद आहे. विनाअनुदानित असल्यामुळे लोकसहभागाने काम सुरू आहे. असंख्य अडचणी आल्या. तरीही, काम अखंडपणे सुरूच आहे.”
- चेतना चौधरी, धुळे

No comments:

Post a Comment