Tuesday 7 May 2019

आमले गावात रुरल कॅराव्हॅन

पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातलं आमले गाव. वस्ती सुमारे २६५. दोन वर्षांपासून या गावात बदल घडू लागला आहे. रुरल कॅराव्हॅन प्रायव्हेट लिमिटेडमुळे तो घडला.
लिजू जॉर्ज ,निकेश इंगळे ,रोहित पिल्लई, मनीष नायर हे या स्टार्ट अपचे संस्थापक. स्थापना २०१६. निकेश अकोला जिल्ह्यातल्या अंत्री गावाचा. बाकी तिघे मूळचे केरळमधले असले तरी लिजू भरूचमध्ये राहणारा तर रोहित आणि मनीष नाशिकमधले. निकेश आणि रोहितनं आयआयटी मुंबईमधून टेक्नॉलॉजी रुरल डेव्हलपमेंट या विषयात मास्टर्स केलं. लिजूनं टीयू बर्लिनमधून एमएस तर मनीषनं ग्रेट लेक्समधून एमबीए केलं. शिक्षणाचा उपयोग गावांच्या विकासासाठी करण्याचं ध्येय हा चौघांमधला दुवा. 

गावकऱ्यांच्या अंगभूत गुणांवर काम करून त्यांना सक्षम आणि जबाबदार उद्योजक बनवणं, त्यासाठी स्किल आणि विल ट्रेनिंग देणं, गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रुरल कॅराव्हॅन करत आहे. यात गावकऱ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन बांधकामापासून पर्यटनपर्यंत विविध क्षेत्रांचा विचार करण्यात आला.
आमले गाव निसर्गतःच सुंदर. गावकऱ्यांनीच गावभेटीची कल्पना मांडली आणि त्यानुसार नियोजन झालं. गावाचा इतिहास, संस्कृती, सामाजिक जीवन यांचं दर्शन तसंच नैसर्गिक सौंदर्यस्थळं, जंगलातल्या विविध झाडांची माहिती गावभेटीत दिली जाते. पर्यटकांच्या राहण्याखाण्याची, जेवणाची सोय केली जाते. मध, बांबू यातून रोजगारनिर्मिती. धूर निर्माण न करणारी आधुनिक चूल बांधायचं प्रशिक्षण गावकऱ्यांना दिलं. स्वतःच्या घरात त्या बांधण्याबरोबरच गावकरी त्या आजूबाजूच्या गावातही बांधत आहेत. गावातली बरीच मंडळी बांधकाम करणारी. अद्ययावत प्रशिक्षणामुळे गावकऱ्यांना इतर गावात घरं बांधून देण्याचा रोजगार मिळाला. शहरी आणि ग्रामीण भागात दुवा निर्माण करण्याचा रुरल कॅराव्हॅनचा प्रयत्न आहे.
इतर गावांमध्येही अशा प्रकारचं काम करण्याची रुरल कॅराव्हॅनची इच्छा आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्टार्ट अप इंडिया महाराष्ट्र यात्रामध्ये 'सामाजिक नवीनतम शोध' या वर्गवारीत रुरल कॅराव्हॅनला द्वितीय पारितोषिक मिळालं.

-विजय भोईर.

#नवीउमेद #पालघर #अकोला #नाशिक

No comments:

Post a Comment