Thursday 9 March 2017

देशी गायींच्या संवर्धनासाठी

उत्तम शेती : देशी गायींच्या संवर्धनासाठी 
गावरान गायीवर अत्याधुनिक पद्धतीने भ्रूण प्रत्यारोपण यशस्वी
शेतीविकासात नवीन तंत्रज्ञान आले असले तरी देशी जनावरांना कायम महत्व राहिले. देशी गाय अग्रस्थानी आहे. तरीही मध्यंतरीच्या काळात देशी गायीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने गायींची संख्या कमी झाली. 
देशी गायीच्या दुधातील औषधी गुणधर्म जगाने मान्य के्ले आहेत. पूर्ण खांदा असलेल्या गायीच्या पौष्टिक दुधाचे महत्व जाणून वाशीमचे शेतकरी रवी मारशटवार आणि त्यांच्या ‘गो वंदेमातरम’ संघटनेने देशी गायी वाढविण्याचा निर्णय घेतला. परंतु गायींची संख्या झपाट्याने वाढत नव्हती. यावर उपाय म्हणून गाईला गर्भ ठेवण्यापूर्वी लिंगनिदान करून कालवड बीजाचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी अहमदाबाद (गुजरात)येथील भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञ डॉ. देवेन पटेल आणि त्यांच्या टीमला बोलावण्यात आले. नंतर सायीवाल कालवडीच्या तीन आणि गिर प्रजातीच्या गायीच्या पाच भ्रूण प्रत्यारोपणाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. एरवी २ ते ३ लिटर दूध देणारी गावरान गाय या प्रयोगामुळे २० ते २५ लिटर दूध देणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयत्न असून या प्रयोगामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारेल, असं तज्ञ सांगतात. 


देशी गायीचं दूध, तूप आणि दही, ताक याची वाढती मागणी आहे. गायीचे शेण, गोमुत्र यांचा वापर सेंद्रीय शेतीसाठी अनेक शेतकरी करत आहेत. देशी गायीच्या शेण आणि गोमुत्रामुळे जमिनीच्या पोत सुधारणेला मदत होते, हेही दिसले आहे. त्यामुळे गायींचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सरकारकडूनही केले जात आहेत. प्रत्यारोपणाचा खर्च प्रत्येकी फक्त १५ हजार रुपये आहे. या प्रयोगातून नर किंवा मादी जात निवडता येत असल्याने तो अधिकार शेतकऱ्यांना असणार आहे. यामुळे देशी गायींचे संवर्धन होईल. आणि दर्जेदार सेंद्रीय शेतमालाला मागणी वाढेल. या प्रयोगावर शासनाने भर दिला तर प्रत्येक शेतकऱ्याकडे किमान एक गावरान गाय असेल.
रवी मारशटवार - 9823748863
- मनोज जयस्वाल.

No comments:

Post a Comment