Monday 6 March 2017

मेहकरमधल्या सीताफळाची चव चाखली आखाती देशांनी



बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सावत्रा गावचे रमेश निकस. पेशाने शिक्षक पण आवड शेतीची. वडिलोपार्जित १५ एकर शेती. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी शेतात निरनिराळे प्रयोग सुरू केले. उडीद, मूग, तूर, हरभरा, गहू अशी पारंपरिक पिकं तर होत होतीच. त्यातून फारसं उत्पन्न मिळत नसे आणि नफा तर दूरच. तरीही निराश न होता शेतात फळबाग लावायचं ठरवलं. त्यासाठी माहिती गोळा केली. फळबागेची माहिती असणारे गावातले शेतकरी शाम गट्टाणी यांनी निकस यांना मदत केली. १५ एकरपैकी तीन एकरावर त्यांनी सीताफळाची लागवड केली. ‘बाळानगर’ जातीची १६ बाय ८ अंतरावर लागवड झाली. नंतर मात्र खरी परीक्षा सुरु झाली. विहीर आटली. मग डोक्यावरून, बैलगाडीतून पाणी आणून झाडांना देत सीताफळ बाग उभी केली. सतत ३ वर्षापर्यंत पाणी, मशागत, रासायनिक खत, शेणखत, औषधं, छाटणी, फळावर आल्यावर फवारणी करून २०१०-२०११ च्या जून-जुलै मध्ये पहिल्यांदा बहर आला. सीताफळाला वर्षातून एकदाच फळ धरतं. पहिल्याच वर्षी ७५ हजारांचं उत्पादन झालं. खर्च २५ हजार आला. निव्वळ नफा ५० हजार. नंतरही निकस यांनी मेहनत घेतली आणि दुसऱ्या वर्षी उत्पादन वाढून २ लाख ८० हजार झालं. हे त्यांच्या सीताफळ बागेचं चौथं वर्ष. यावेळी त्यांना किंमत मिळाली तीन लाख ६० हजार. खर्च वगळून तीन लाखांचा नफा मिळाल्याच निकस सांगतात.

सीताफळाची लागवड करत असताना त्यांनी दोन तासांत १६ फुटांचं अंतर ठेवलं. त्यामुळे आंतरपीक घेता आलं. सोयाबीन, उडीद, मूग, तूर, कपाशी, हरभरा अशी पिकं चारही वर्षे घेता आली आणि त्यातूनही ५० हजारांचा नफा मिळत गेला. त्यामुळे योग्य नियोजन, मेहनत आणि मार्गदर्शन घेतल्यास शेतीतून उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे. निकस ह्यांच्या सीताफळाचा आकार मोठा आणि वजन जास्त. त्यामुळे ही फळं केवळ मुंबईत नव्हे तर सौदी अरब, कुवैतमध्येही विक्रीसाठी जातात.
रमेश निकस संपर्क क्र. - 9420336515

- अमोल सराफ.

No comments:

Post a Comment