Thursday 9 March 2017

फसवल्या गेलेल्या कुटुंबांतल्या मुलांचा शाळाप्रवेश

फसवल्या गेलेल्या कुटुंबांतल्या मुलांचा शाळाप्रवेश : आमदार भारती लव्हेकर यांच्या प्रयत्नांतून झाली शिक्षण हक्क कायद्यातल्या तरतुदीची अंमलबजावणी
वर्सोव्याच्या आमदार डॉ भारती लव्हेकर यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी केलेल्या एका कामाबद्दल कळलं. तो विषय ‘नवी उमेद’च्या जिव्हाळ्याचा असल्याने भारतीताईंकडून अधिक माहिती घेतली. तीच आज शेअर करत आहे.
RTE (शिक्षण अधिकार) कायद्यात गरिबीरेषेखालील मुलांना खाजगी शाळेत २५% जागा राखीव आहेत . आपल्या मुलांसाठी अशी काही तरतूद आहे याची जाणीव गरीब-अशिक्षित पालकांना अजूनही नाही. शासनानेही याबाबतचे निर्णय शाळेवर सोपविले आहेत. याचा गैरफायदा खाजगी शाळा घेतात. 
एक दिवस अचानक वर्सोवा सिटी इंटरनॅशनल शाळेतील १५ मुलांना शाळेतून काढण्यात आलं. पालकांना कळवण्यात आलं की त्यांनी शाळेला दिलेला उत्पन्नाचा दाखला बोगस आहे. शाळेने पालकांच्या विरोधात पोलिसात FIR दाखल केला. काय करावं ते पालकांना कळेना. के.जी. ते चौथी पर्यंतच्या इयत्तांत शिकणारी ही सर्व मुलं गरीब मुसलमान कुटुंबातली होती. शेवटी हे पालक भारतीताईंकडे गेले. ताई सांगतात, “पालक जेव्हा भेटायला आले, तेव्हा घाबरलेले होते. मुलांच्या भवितव्याची चिंता त्यांना होती. या सर्व पालकांना एका एजंटने उत्पन्नाचे बनावटी दाखले देऊन फसवलं होतं. यात पालकांचा काहीच दोष नव्हता. आणि मुलांचं मात्र नाहक नुकसान झालं होतं. कारण ४-५ महिने मुलं घरीच होती. मुलांचं वर्ष बुडायला नको होतं. म्हणून भारती लव्हेकर यांनी तातडीने प्रयत्न सुरु केले. तहसीलदारांकरवी सत्यता पडताळून घेतली. ही सर्व मुलं खरंच गरीब मुस्लिम कुटुंबातली होती आणि त्या शाळेत शिकण्याचा त्यांना अधिकार होता. शासनाने त्यांना नवीन दाखले दिले. तरी शाळेने मुलांना प्रवेश नाकारला. ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन होत असल्याने मुलांना पुन्हा प्रवेश मिळू शकत नाही, हे कारण शाळेने दिलं होतं. भारतीताईंनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांना आश्वासन दिलं. ऑनलाईन ऍडमिशनच्या प्रक्रियेसंदर्भातल्या शासननिर्णयात मुलांच्या पुनर्प्रवेशासाठी अडथळा ठरणारे नियम/निकष बदलले आणि शेवटी शाळेत मुलांना प्रवेश मिळाला. या सर्व कामात शिक्षण उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. तसंच शाळेचे विश्वस्त मौलिक दीक्षित यांनीही सहकार्य केलं. या प्रयत्नांमुळे मुलांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं नाही. 
या कामाविषयी भारती लव्हेकर म्हणाल्या, “मुलांना आपण देवाघरची फुलं म्हणतो. त्यांची जोपासना करणं, त्यांचं भवितव्य घडवणं हे आपलं कर्तव्यच आहे. मुलांचे प्रश्न पक्षापलीकडे आणि धर्मातीत असतात. शेवटी मुलांचं भवितव्य आणि माणसातलं माणूसपण महत्वाचंच . एक महिला आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघातील बालकांच्या समस्यांना नेहमीच प्राधान्य देते. माझ्यातलं पालकत्व नेहमीच जागृत असतं.” बालहितैषी आमदार भारतीताईंचं अभिनंदन.
- समता रेड्डी

No comments:

Post a Comment