Wednesday 22 March 2017

जोखीम घेऊन मिळवलं यश

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुका. इथल्या नारळी-कुरळी गावातील युवा शेतकरी गणेश उतळे. गणेश यांचे वडील विठ्ठल रामचंद्र उतळे यांनी मजुरीतून पै-पै जोडून जमेल तशी शेती घेतली. आज या कुटुंबाकडे ३० एकर ओलीताची शेती आहे. शिक्षणानंतर नोकरीमागे न लागता वडिलांनी दिलेला शेतीचा वारसा गणेश यांनी चालविण्यास घेतला. 
पारंपरिक सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसोबत शेतीत हळूहळू प्रयोग सुरू केले. प्रारंभी ऊसाचे पीक घेतले. त्यातून आर्थिक जम बसला. कालांतराने गणेश यांचा उमरखेड तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहायक राहूल वाघमारे यांच्याशी परिचय झाला. त्यांनी ‘कृषी तंत्रज्ञान' हे पुस्तक वाचायला सांगितल. हे पुस्तक आणि वाघमारे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि उतळे यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलला.
‘त्या पुस्तकाच्या मदतीने आमच्या शेतीची दशाच बदलली', असं गणेश उतळे उत्साहाने सांगतात.पूर्वी शेतीत सोयाबीन, कापसासह केवळ ऊस हे एकमेव नगदी पीक घेत होते. आता त्यांनी परभणीहून तायवान ७८६ हे पपईचे बियाणे आणले. घरीच त्यापासून रोपे तयार केली. शेतीत अडीच एकर जागा तयार करून ५ बाय ६ अंतरावर अडीच हजार रोपांची लागवड केली. पैकी ८०० रोपांनी काही दिवसांत मान टाकली. उतळे निराश झाले. आपलं काय चुकलं, याचा शोध घेतला. तेव्हा आवश्यक तापमानाचे नियोजन करण्यात गफलत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उर्वरित१७०० झाडांची त्यांनी काळजी घेतली. १० महिन्याच्या कालावधीत सल्फर, पोटॅश, प्रमाणात युरिया खत घालून झाडांचं संगोपन केलं. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही झाडे प्रत्येकी २२५ ते २५० पपयांनी लदबदली. ती उतळे यांनी उमरखेडसह किनवट, अकोला येथील व्यापाऱ्यांना आठ रूपये किलो दराने विकली. ८००० रूपये टनाप्रमाणे त्यांनी जवळपास ७० टन पपई तीन महिन्यात विकली. यातून त्यांना जवळपास साडेपाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळालं. शेवटच्या टप्प्यातील हिरवी पपई तीन रूपये किलोनं दिल्ली येथील चेरीच्या व्यापाऱ्याला विकली. त्यातूनही ३० हजार रूपयांचे उत्पन्न मिळालं.
योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा स्वीकार, अभ्यास आणि प्रचंड कष्टाच्या जोरावर उतळे लखपती झाले. पपईच्या झाडांमधील जागेत त्यांनी मल्चिंग पद्धतीने टरबुजाचं पीक घेतलं. त्यातही विक्रमी ३८ टन उत्पादन मिळालं. मात्र गेल्यावर्षी टरबुजाचा भाव पडला आणि ८५ हजार रूपयांचे नुकसान सहन करावं लागलं.
दराच्या अस्थिरतेमुळे शेती करणं धोक्याचं झालं आहे. मात्र जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही, असं गणेश म्हणतात. पपईच्या लागवडीपासून काढणीपर्यंत ९५ हजार रूपये खर्च आला. खर्च वजा जाऊन साडेचार लाख रूपये उत्पन्न मिळाल्याने पपईने यावर्षी मोठा आर्थिक आधार दिल्याचे ते सांगतात.
आज गणेश उतळे यांच्याकडे तीन कामगार वार्षिक वेतनावर तर हंगामाच्या काळात ५० मजूर काम करतात. कष्टातून कमाईचा मंत्र वडिलांनीच दिला, असं ते कृतज्ञपणे सांगतात. शासनाच्या अनेक योजना चांगल्या असल्या तरी सबसिडी मिळविताना बरेचदा फसगत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेश उतळे यांचा संपर्क ८८०५८८२७३१

नितीन पखाले

No comments:

Post a Comment