Wednesday 29 March 2017

फळबाग बहरली, ऊस मोडला

बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर तालुक्यातलं धुनकवड गाव. चारही बाजू डोंगराने वेढलेल्या. इथल्या कुलकर्णी कुटुंबाने डोंगरावर ऊस आणि डाळिंबाची शेती करून परिसर हिरवाईने नटविला आहे. कल्याण कुलकर्णी हे सार्वजनिक बांधकाम खात्यात बीड उपविभागीय कार्यालयात भांडारपाल. ते म्हणाले, ‘पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष्य. सगळी जमीन डोंगराळ. या भागात 1986 मध्ये कुंडलिका मध्यम प्रकल्प झाला. पाणी बऱ्यापैकी साचून राहू लागले. धुनकवड, नागझरी, आंबेवडगाव या तीन गावांचं सखल भागातून पहाडी भागात पुनर्वसन झालं. माळरानावरची जमीन नापिकीचीच. तलावाच्या बॅक वॉटरमध्ये आमची शेती गेली. वडिलोपार्जित पंधरा एकर जमीन होती. वडिल गावातील राजकारणातच अधिक रमले. नावापुरत्या शेतीत खरीपात हायब्रीड ज्वारी, थोडी बाजरी तर रब्बीला मूग, मटकी, चवळी ही कडधान्य असायची. उत्पन्न जुजबीच होतं. घरची परिस्थिती हलाकीची. मी 1995-96 पासून शेतीत लक्ष घालायला सुरवात केली’. 

वडीलांचं रेशन दुकान. विकलेल्या मालाचे पैसे कोणाला मागत नसत. घरावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. सावकाराला जमीन लिहून द्यायची वेळ आली आणि मुलांनी कर्ज फेडल्याचे ते सांगतात. इथूनच शेतीत कायापालट सुरू झाला. माजलगावचे धैर्यशील सोळंके यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली. जिल्हा बँकेचं कर्ज मिळालं. डोंगरापर्यंत जलवाहिनी घेतली. आणि ऊस शेतीने हात दिला. दोनशे, तीनशे टन ऊस होऊ लागला. कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात ऊस शेती फायदेशीर ठरली. कर्जमुक्त होऊन घरात सुबत्ता नांदू लागली. रात्री तलावातून सोडलेलं पाणी सकाळपर्यंत वाहायचं बंद झालं. दुष्काळामुळे पाणी बचतीचं महत्व कळू लागलं. 


मग 2000 मध्ये त्यांनी 35 एकर नवीन शेती घेतली. धैर्यशीलकाकांनीच डाळिंब लागवडीचं सुचवलं. नगर, नाशिकच्या डाळिंब बागाही दाखवल्या. याच दरम्यान चऱ्हाटा गावच्या मकरंद उबाळे यांनी खडकाळ जमिनीत डाळिंब लागवडीचा प्रयोग केला होता. तो बघून कल्याण यांनी जैन टिश्यूकल्चरची रोपं आणली. डाळिंब आणि ऊस शेती ठिबकवरच केली. आज अडीच हजार डाळिंब रोपं हलक्या डोंगराळ जमिनीत फोफावली आहेत. डाळींबाचं पहिलं पीक चोवीस महिन्यांनी धरलं आणि सतरा लाखांचा नफा झाला. कोलकाता, सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी शेतातून पीक नेलं. मागच्या वर्षी पन्नास टन उत्पादन झालं. माल एक्स्पोर्ट झाला आणि नांदेड, वजिराबाद, हैदराबाद येथेही गेला.

कुलकर्णी सांगतात, ‘जिल्ह्यात दुष्काळ असताना आम्हाला डाळिंबाने साथ दिली. आता केशरआंबा, मोसंबी, लिंब आणि डाळिंब अशी फळबाग झाली आहे. डोंगर फोडून पाच एकर जमीनही केली आहे. धरणातील गाळ टाकल्यामुळे ती बागायती सुपीक झाली आहे. फळबागांनी साथ दिल्याने ऊस मोडल्याचं समाधान मिळतं’. कुलकर्णी यांची शेती पाहून गावातही बदल घडला. आता तीस एकरहून अधिक क्षेत्रावर गावात डाळिंब लागवड झाली आहे. भाजीपाला देखील शेतकरी ठिबकवर घेऊ लागले आहेत. 
कल्याण कुलकर्णी संपर्क - 9422745544
 मुकुंद कुलकर्णी.

No comments:

Post a Comment