Sunday 19 March 2017

पालक म्हणून काही सांगावं

पालक म्हणून काही सांगावं, लिहावं असा अधिकार आहे का मला? पालकत्व स्वीकारताना सजगतेनं विचार केला होता का आम्ही? आम्ही मुलीला घडवलं की तिनंच आमच्यातल्या पालकत्वाला शहाणं केलं? एकदा तिनं मला मेसेज केला होता- "तुमचं बघून, मी स्वत: करून तसं वागायला शिकले. तुमच्या धाकामुळे किंवा शिकवणीमुळे नाही. आपल्यात वाद-मतभेद होतात, होत राहतील. पण त्यातही तुम्ही मला कधीच चुकीचं ठरवलं नाही..."
राहीच्या जन्माची थोडी जास्तच वाट पाहायला लागली होती. नातेवाईकांच्या गोतावळ्यात चार मुलांसारखी ती वाढली. तिच्या शालेय जीवनाची सुरुवात अलिबागजवळच्या कुरूळ गावातल्या अंगणवाडीत झाली. गोष्टी ऐकणं-सांगणं, पुस्तकं यांची तिला आवड. तिला मराठी माध्यमाच्या शाळेतच घालायचं हे पक्कं होतं. माझं बीएडमधलं शिक्षणशास्त्राचं अध्ययन, लीलाताई पाटील, रेणू दांडेकर यांचं लेखन, तोत्तोचानसारख्या पुस्तकांचं वाचन यामुळे मुलीला शिकण्याचा आनंद घेता आला पाहिजे हा विचार होता. तेव्हा “मराठी मीडियममध्ये आपल्या स्टँडर्डची मुलं नसतात, मुलं काहीतरी घाणेरडं शिकून येतात” ...अशी शेरेबाजीही झाली. मात्र आपला निर्णय अचूक आहे हे मला आई आणि शिक्षिका म्हणून पक्कं माहीत होतं. सध्या राही पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आजपर्यंत कधीही ती मराठी माध्यमात शिकल्याचा यत्किंचितही पश्चाताप झालेला नाही. उलट ती म्हणते की, मराठीत शिकल्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व मिळवता आलं.
ती शाळेत असताना काही काळ आम्ही “इतर मैत्रिणींना बघ, स्कॉलरशिप मिळाली. तू अभ्यासच करत नाहीस” - अशा अगदीच टिपिकल भूमिकेत शिरलो होतो. आजूबाजूच्या वातावरणाचं दडपण फक्त मुलांवरच नाही, तर पालकांवरही येतं. मात्र लेकीच्या आवडी, कल, गुण लक्षात आल्यावर ही तुलना थांबली. एक दिवस राहीच ठामपणे म्हणाली, ‘मी त्या अमुक-तमुकसारखी नाही होऊ शकत, मी 'मी' आहे!’ हे ऐकून मी भानावर आले.
राहीचं गणिताशी कधी पटलं नाही. तिला भाषाविषयांत गती होती, आहे. पण “त्याचा काय उपयोग?” -असा शिक्षकांचा दृष्टिकोन असे. भाषाविषयांत राहीची उत्तरं 'गाईडमधल्यासारखी नसल्यामुळे' मार्क्स कमीच देत. या सगळ्याचा परिणाम होऊन दहावीच्या वर्षात तिला डोकेदुखीचा आजार झाला. सगळ्या तपासण्या होऊनही निदान होईना. शेवटी समुपदेशकाची मदत घ्यावी लागली. दहावीचा गणिताचा पेपर देऊन घरी आल्यावर यापुढे गणिताशी माझा संबंध येणार नाही, म्हणून तिने अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला.
एकदा ती गंभीरपणे म्हणाली, “आई, शाळा-कॉलेजात जाऊन आपण आयुष्यातली शिकण्याची वर्षं वाया घालवतो असं वाटत नाही तुला?” या प्रश्नाचा विचार मी तेव्हापासून करते आहे. शिक्षणपद्धतीवरचा तिचा विश्वास उडू न देणं हे मला आव्हान वाटतं. विविध क्षेत्रांतल्या मित्रमैत्रिणींचा या स्थितीत आधार मिळतो. ते राहीशी बोलतात, अडचणी सोडवायला मदत करतात. 
क्रिकेटवरची पुस्तकं मिळेल तिथून गोळा करणारी राही हर्ष भोगलेसारखं करिअर करायचं म्हणते. स्वत:ला अपडेट ठेवते. जाणीवपूर्वक स्वत:ला घडवणाऱ्या अशा मुलांकडूनच आपलं पालकपण घडत असतं, असंच वाटतं.
सुजाता पाटील

No comments:

Post a Comment