Friday 17 March 2017

त्यांनी फक्त चांगलं माणूस व्हावं

मुलांना एका विशिष्टच पद्धतीनं वाढवायचं अशा काहीही कल्पना मनात नव्हत्या. मी आणि माझा नवरा निरंजन मोकळ्या वातावरणात वाढलो. मला मुलगी म्हणून कधी वेगळी वागणूक, बंधनं नव्हती. वडलांना मी मुलांशी मैत्री करणं थोडं इनसिक्युअर करायचं खरं; पण म्हणून त्यांनी कसलीही बंधनं घातली नाहीत. बाबांना मी academic काही करावं असं वाटायचं. मी राज्यशास्त्रात एमए केलं. त्यात गोल्ड मेडल्सही मिळाली. पण आता वाटतं की कदाचित मी डिझायनिंग सारखं काहीतरी करायला हवं होतं.
आम्हाला दोन मुली. त्यांनी फक्त चांगलं माणूस व्हावं इतकी आणि इतकीच अपेक्षा होती आणि आहे. मोठी मुलगी सावनी शाळेत असताना अतिशय उत्साही होती. ती स्वतःहून स्पर्धात्मक परीक्षांना बसायची. तिला गणिताची प्राविण्य आणि सातवीची स्कॉलरशिप मिळाली. अशा परीक्षा त्यांच्या हिताच्याच असतील, इतकं आम्ही सांगत असू पण त्याचा आग्रह धरला नाही. धाकट्या शर्वरीनं ‘मी काहीही करणार नाही’ असं आधीच जाहीर केलेलं!
सावनीनं बारावीनंतर आर्ट्सला जाणार हे बारावीच्या सुरूवातीलाच सांगितलं. त्यानुसार तिनं तिची शाखा बदलली. पण तो तिचा निर्णय होता. सायन्सला जाण्याचा निर्णयही तिचाच होता. धाकट्या शर्वरीनं पहिल्यापासूनच आर्ट्सला जाणार हे नक्की केलं होतं.
अवतीभवती वेगवेगळ्या संधी उपलब्ध असताना आपल्याला नेमकं काय आवडतंय, कशात रस आहे हे जाणून घेण्यासाठी निदान त्यांची ओळख करून घेतली पाहिजे. त्या संधी एक्स्प्लोअर करून बघितल्या पाहिजेत. त्यानुसार दोन्ही मुलींना सुचवत गेलो पण त्यांनी ज्यात निरुत्साह दाखवला त्याचा आग्रह धरणं व्यर्थ होतं. तरी पर्यायांचा अनुभव घेत राहावा, असं वाटतंच राहातं.
आपली अपत्यं ही स्वतंत्र व्यक्ती आहेत हे आम्हा दोघांनाही मान्य आहे. माझ्यापेक्षाही माझ्या नवऱ्याला ते फारच मान्य आहे. एक प्रसंग सांगते– बाहेर जाण्याची तयारी चाललेली. ६-७ वर्षांच्या शर्वरीनं स्वतःचे कपडे स्वतः निवडले. ते मॅचिंग नाहीत, ते बदल असं मी तिला सुचवल्यावर निरंजन म्हणाला, ‘तुला कधीतरी कळलंच ना की कसे कपडे घालावेत, कशावर काय घालावं? तसंच तिलाही एक दिवस कळेल. आता तिचं तिला काय घालायचं ते ठरवू दे.’
दोघीही मुली लहानपणापासून खूप वाचतात. सावनीचं वाचन इंटरनेटवर अधिक तर शर्वरी भरपूर पुस्तकं घेणारी, त्यांचा फडशा पाडणारी. नवीन लेखक, संगीतकार, नवीन संगीत, नवीन अभिनेते याबद्दल आम्हाला त्यांच्याकडून कळत असतं.
मुली आमच्या मैत्रिणी आहेत. मी मित्रमंडळींमध्ये जास्त गुंतते, मग काही अप्रिय अनुभव आले तर मुलीच मला कसं वागावं हे सांगत असतात. आम्ही चौघेही एकमेकांशी याबाबतीत बोलत असतो. आता तर मुलींना घरातल्या आर्थिक निर्णयांचीही माहिती असते.
पालकांच्या तुलनात्मक वागण्याचे आघात मनावर कायमचे राहतात. मुलींमध्ये कसलाही भेदभाव करायचा नाही ही गोष्ट कटाक्षानं पाळली. आणि जेव्हा सावनी – फक्त आई Impartial आहे असं म्हणते तेव्हा मला बरं वाटतं. सावनी लहान असताना एकदा मी तिला रागानं थप्पड मारली. तेव्हा तिनं केविलवाणेपणानं – आई, मारू नकोस गं... असं म्हटलं त्याक्षणी ठरवलं की हे पुन्हा कधीही घडता कामा नये. त्या दिवसानंतर पुन्हा कधीही मी मुलींवर हात उगारला नाही. कारण मला कायम सावनीचा तो असहाय चेहरा आठवत राहिला.
१३-१४ वर्षांच्या झाल्यापासून मुली मुंबईत एकट्या फिरायला लागल्या. त्यांच्या क्लासेसना,मित्रमंडळींकडे एकट्या जायला लागल्या. त्यांचा बाबा त्यांना बरेचदा आणायला-सोडायला जायचा,लाडानं त्यांना अजूनही कधीतरी आणायला जातो. पण त्या अवलंबून नाहीत. भूक लागली तर हातानं करून खाण्याइतक्या त्या स्वतंत्र आहेत.
आईवडलांचंही एक स्वतंत्र आयुष्य असतं हे त्यांना मान्य आहे. आम्ही एकत्र सिनेमांना, जेवायला बाहेर जातो, प्रवास करतो. पण याच गोष्टी कधीतरी फक्त आईबाबा करणार आहेत हे त्यांना फार लवकर उमगलं.
लवकरच सावनी २१ तर शर्वरी १८ वर्षांची होईल. आता जगाबद्दल त्यांच्याकडून आम्हाला कळत असतं. या दोघी- किंबहुना ही पिढीच- जजमेंटल नाही. त्यांचे विचार इतके मोकळे आहेत की कधीकधी मी स्तिमित होते. त्यांच्यामुळे माझे विचारही अजून मोकळे झाले आहेत. जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक खुली झाली आहे. मुली आता नवीन चित्रपटांबद्दल सांगतात, आम्ही बाहेर निघालो तर कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जावं ते सुचवतात. वागण्यात काही चुकलं तर सौम्यपणे आमची चूक लक्षात आणून देतात. घरात काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी आपुलकीनं, आदरानं वागतात. आपल्या आजीबरोबर रोज वेळ घालवतात. आठवणीनं तिच्यासाठी खायला आणणं, तिचं काही काम करणं, तिला दवाखान्यात नेणं सहज घडतं. एक पालक म्हणून माझ्यासाठी हे पुरेसं आहे.
(सायली राजाध्यक्ष या ब्लॉगर आहेत. 'अन्न हेच पूर्णब्रह्म' आणि 'साडी आणि बरंच काही' हे त्यांचे ब्लॉग्ज आणि फेसबुक पेजिस आहेत. निरंजन राजाध्यक्ष हे 'मिंट' या अर्थविषयक वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.)
सायली राजाध्यक्ष

No comments:

Post a Comment